Thursday, November 25, 2010

The Champa Flower- V

परवाच केशव येऊन गेला
फारा दिवसांनी आला होता
का रे? आला नाहीस इतक्यात?
म्हणाला- कामात होतो
आठवतं याच्या मुंजीच्या वेळी...
आठवणींच्या पाखरांनो
दमला असाल गाता गाता
मधाळ गाणं पुरे आता
आता तरी जाऊ द्या
आभाळ होऊन पाहू द्या
सुमीच्या लग्नात तिच्या मावस नण्देची ओटी भरायची राहून गेली
देणी घेणी जिथली तिथे
हात रिते मन रिते
उणीदुणी राहू द्या
निर्मळ गंगा वाहू द्या
भाऊ, माझ्या चाफ्याला तेवढं पाणी घाल बाबा नेमाने
चाफ्याच्या झाडा,
तुला एकदा पहायचं होतं
एकदा रडून घ्यायचं होतं
वसंत कधी खुलला होता
जीव कधी भुलला होता
गुपित तसंच राहू दे
राख होऊन जाऊ दे
चिमखडी राधा सकाळी फुलं देऊन गेलीय
फुलदाणीत ठेवायला हवीत
ओंजळ थकलीय, फुलांनी वाकलीय,
फुलंही सुकलीयत,
औषधांचा वास येतोय त्यांनाही...

***
The Champa Flower चं सत्र सुरू केल्याला बरेच दिवस झाले. हे त्यातलं पाचवं फूल आणि शेवटचं. अजून थोडं लिहीता आलंही असतं पण काही चाफ्याच्या कळ्या न उमलता तश्याच राहू दे. रवींद्रनाथांच्या एका कवितेच्या स्वैर अनुवादातून या सत्राची सुरुवात झाली आणि मग चाफ्याच्या झाडाचं बदलत जाणारं नातं उलगडत नेण्याचा प्रयत्न करून पाहिला.  ही त्यातली शेवटची कविता.

ही कविता वाचून सखी म्हणाली, "एकदम अर्ध्यात खुडल्यासारखी वाटते आहे". पण तेच मला अपेक्षीत आहे. त्या वयात आणि त्या परिस्थितीत सगळ्या आठवणी आणि इच्छा सोडायच्याही असतात आणि धरायच्याही असतात. त्यात सुसूत्रता नसते आणि एकवाक्यताही नसते.

आठवणींचा गोफ विणला जात असतो; मधेच वर्तमानाची सतर्कता डोकावून जाते आणि मधेच औषधांची गुंगी आपला हक्क बजावत असते. तसेच काहीसे आहे इथेही. ही कविता परिस्थितीचं पूर्ण वर्णन करत नाही तर काही तुकडे समोर मांडते आहे.

हा प्रवास संपत नाही, तर परत आणून सोडतो पहिल्या कवितेशी जिथे आपण सुरुवात केली होती.

Wednesday, October 13, 2010

पुन्हा एकदा...

दिवसाचा उडला टवका सरपटती मिटती जाग
क्षितिजाशी उठला मागे रात्रीचा काळा डाग

आकाश कोंडले जागी पक्ष्यांची विरली गाणी
ती सतेज नाव किनारी तांबूस गढूळले पाणी

हे झाड उभे दारात फांदीत शोधते छाया
चुळबुळती कण्हती पाने देठांशी सुकली माया

असवांना फुटती कोंभ पायात सरकते वाळू
अस्वस्थ उमटली साद हुंदका उठे अळुमाळू

उडणारे शोधित पंख उबदार उशाशी घरटे
डोळ्यात पेटले पाणी तरि एक पापणी झुरते

तो वत्सल हात फिरावा ती मिठी निरागस व्हावी
त्या दुधाळ बोलफुलांना केशरी खुमारी यावी

पुन्हा एकदा...

Friday, September 24, 2010

माझे अक्षर प्रयोग

बरेच दिवस झाले काहीच लिहायला सवड नाही. काम खूप आहे ही सबब तितकीशी योग्य़ नाही पण काम आवडते आहे त्यामुळे सध्या त्यालाच प्राधान्य दिले जात असावे. मग आज मनात आलं की कामाबद्दलच का लिहू नये? आणि माझा जो काही प्रयोग सध्या चालू आहे त्याची इथे चर्चा करायला नक्कीच आवडेल.

थोडेसे प्रास्ताविक -
मी व्यवसायाने डिझाईनर (अभिकल्पक) आहे आणि सध्या IIT Bombay  मधे प्रा. शिल्पा रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करतो आहे. माझा विषय "डिझाईन मधे वापरले जाणारे मार्गदर्शक आराखडे (Grids in graphic design)" यांच्याशी संबंधित आहे. त्याबद्दल परत कधीतरी सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण आज मी आमचा एक प्रयोग इथे मांडतो आहे. अजून त्याच्यावर बरेच काम करायचे आहे पण निदान ती कल्पना मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन अशी आशा बाळगून सुरूवात करतो. शक्यतो संशोधनाची भाषा टाळून रोजच्या शब्दांमधे आणि तेही मराठीत लिहिणे हेच सगळ्यात मोठे आव्हान आहे.

माझे अक्षर प्रयोग
प्रयोगाची पार्श्वभूमी:
आपल्या भारताची वैभवशाली परंपरा, त्याचा इतिहास, इथून निघणारा सोन्याचा धूर ब्ला... ब्ला...
हे सगळे आपण वाचून ऐकून असालच. त्याबद्दल अभिमान बाळगत असाल किंवा त्याची चेष्टा करत असाल किंवा त्याबद्दल तटस्थ असाल. या पलिकडे त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही...
हीच समस्या कुठेतरी माझ्या संशोधनाच्या मुळाशी असावी. (’आहेच’ म्हटले तर सुरू होणारे आक्षेप आणि चर्चा पुढेच जाऊ देणार नाहीत म्हणून ही अनिश्चितता ) तर महत्त्वाचे हे की सगळी कृतिशून्य चर्चा बाजूला ठेऊन सक्रीय होणे. उपयोगवादाच्या पायावर उभे डिझाईन हे क्षेत्र (कृतिहीन) चर्चेला महत्व देत नाही असे नाही पण ते काम इतरांवर सोडून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हेच अधिक जिव्हाळ्याचे ठरते. असो.. तर परत मुद्द्यावर येऊ.
आपल्या पारंपारिक चित्रकला आणि मूर्तिकला या कलाक्षेत्रात लक्षणीय ठराव्यात अशा आहेत. पण आता त्याचा कुठे फारसा मागमूस नाही. त्यातील काही ज्ञानशृंखला इतस्तत: विखुरलेल्या आहेत. त्यातून माझ्या विषयाच्या संदर्भात जे काही थोडेफार मिळेल ते वेचून त्याचा आधुनिक काळात काही उपयोग आहे का, इतकाच मर्यादित प्रयत्न माझा आहे.

कला-इतिहास संशोधक आणि चित्रकार ऍलिस बोनर यांचे संशोधन माझ्या खूपच उपयोगाचे ठरले. पद्मभूषण पुरस्काराने विभूषित या विदुषी वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी भारतात येऊन स्थायिक झाल्या आणि त्यांनी कला-इतिहासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी इथल्या देवळातील भित्तिचित्र व मूर्ती यातून शोधून काढलेल्या (आकृतीत दाखवल्या प्रमाणे) कोनात्मक पंजर (angular grid) चा वापर अक्षरनिर्मितीसाठी करता येईल का यासाठीचा हा प्रयोग आहे.

भारतीय परंपरेमधे अक्षरनिर्मिती आणि रूपनिर्मिती  यामधे समधर्मता आहे. अक्षरांचे मनुष्यस्वरूप केलेले वर्णन आणि देवतांचे एकांक्षरी रूपकात्मक मंत्र यातूनच हे साधर्म्य आणि परस्पर रूपांतरण दिसून येते. पण तरीही हे angular grid अक्षरनिर्मितीमधे वापरणे इतके सहज साध्य नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे या सर्व प्रक्रियांमधे झालेला आमूलाग्र बदल. दुसरी गोष्ट अशी की नवीन काळाबरोबर न जाऊ शकणार्‍या कुठल्याही प्रयोगाचे फारसे भविष्य नाही. तर आपल्या समोरील तिहेरी कोडं असं- angular grid--font design--current technology.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक म्हणजे संगणक. अभिकल्पक्षेत्रात संगणकाच्या सहाय्याने अनेक गोष्टी अधिक प्रभावी आणि सुकर झाल्या आहेत. पण अक्षरनिर्मितीचा विचार केला तर तंत्रज्ञानाचा विकास हा रोमन लिपीसाठी मुख्यत्वेकरून झाला. भारतीय तंत्रज्ञांच्या मदतीने NCST (आताचे C-DAC) मधे भारतीय लिप्या संगणकावर आणण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्या आणि देशभरातील तशा अनेक प्रयत्नांतून आज आपण सगळे संगणकावर देवनागरी लिहितो, वाचतो आहोत. पण तरीही आपल्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत. जसे की जोडाक्षरांची संख्या आणि त्यांचे स्वरूप यात करावा लागलेला बदल. असो... हा एक मोठा विषय आहे. तो नंतर कधी तरी....

या प्रयोगासाठी संगणक शास्त्रज्ञ डोनाल्ड क्नूथ यांनी केलेले काम मार्गदर्शक ठरले. त्यांनी विकसित केलेले METAFONT (अधिक माहीतीसाठी वाचा: "Digital Typography", California : CSLI Publications, Stanford, 1999 ) ज्या तत्वावर आधारित आहे (’कुठल्याही अक्षराचा आकार गणिती भाषेमधे मांडता येऊ शकतो’) त्याचा उपयोग इथे अक्षरनिर्मितीसाठी केला आहे. परंतु क्नूथ यांचा प्रयोग हा मुळात अस्तित्वात असलेला font नवीन digital छपाई तंत्रज्ञानासाठी कसा रूपांतरित करता येईल यावर भर देणारा आहे. काही प्रयोगिक उदाहरणे वगळता नवीन font तयार करण्यासाठी त्याचा फारसा कोणी उपयोग केला नाही. इथे METAFONT चा वापर न करता फक्त त्याचे मूलतत्त्व  आमच्या प्रयोगामधे वापरले आहे. या प्रयोगामधे प्रत्येक अक्षराचा सांगाडा तयार करण्यात आला. त्यापासून निरनिराळे अक्षरसंच बनवणे शक्य होईल. उदाहरणार्थ जसे 3D ऍनिमेशन मधे सांगाडा बनवून त्यावर वेगवेगळी शरीरे चढवता येतात आणि त्याला विविध वेशभूषाही देता येतात. त्याप्रमाणे इथे एका सांगाड्यापासून विविध fonts बनवणे शक्य आहे. पण ते नंतर, त्यासाठी आधी सांगाडा तयार करणे आणि तो गणिती भाषेमधे आणणे हे गरजेचे आहे.

संगणकावर कुठलाही आकार तयार करण्यासाठी बेझियर पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे प्रत्येक रेषा ही काही बिंदू आणि त्या बिंदूपाशी होणारा स्पर्शिकेचा कोन यानी बांधलेली असते. आता इथे आकारनिर्मितीच्या कोनांशी असलेल्या संबंधाने आमचे लक्ष वेधून घेतले. वर उद्धृत केलेल्या कोनात्मक पंजराचा वापर करून अक्षराच्या रेखांकनातील प्रत्येक बिंदूची स्पर्शिका ही त्या कोनात्मक रेषेला समांतर ठेवून अक्षरनिर्मिती शक्य होते का? असा प्रश्न आमच्या समोर होता. आणि त्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले. खाली दिलेल्या आकृतीवरून थोडाफार अंदाज येऊ शकेल.
इथे ३०-१२० अशा कोनात्मक पंजराचा वापर केला आहे. वर दाखवलेला क्ष हा कशा प्रकारे बनला आहे हे त्याच्या बेझियर नियंत्रकांवरून समजू शकेल. त्याच्याच शेजारी त्याच्या सांगाड्यावर सारख्या जाडीचे आकारमान चढवल्यानंतर त्याला प्राप्त झालेले रूप दर्शविले आहे.
तसेच कोनात्मक पंजराचा कोन बदलल्याने अक्षरात होणारा बदल वरील आकृतीत दाखवलेला आहे. त्यात ३०-१२०, ४०-१२५ आणि ६०-१५० अशा तीन कोनांवर आधारीत क्ष मधील बदल दाखवलेला आहे.

यावर अजून बरेच काम होणे बाकी आहे. पण सद्यस्थितीत या तयार झालेल्या फॉण्टचा वापर करून केलेले लेखन पुढे देत आहे. त्यावरून रोजच्या वाचनासाठी या अक्षराची उपयुक्तता कितपत आहे याचा अंदाज बांधणे शक्य होईल.
(टीप: खाली दिलेले लेखन हे इमेज स्वरूपात आसल्याने त्याची स्पष्टता प्रत्यक्ष लेखनाइतकी असणार नाही )Friday, April 30, 2010

मर्ढेकरांची कविता

मर्ढेकरांच्या काही निवडक कवितांचे पुस्तक बनवण्याचा योग आला. त्यातली काही पाने (एकावेळी एक) इथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. या कविता वेगळ्या प्रकारे दृष्य माध्यमातून सादर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मर्ढेकरांनी त्यांच्या कवितांचे अर्थ कधी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. ज्याला जो समजेल तो त्याचा अर्थ. ज्याला अर्थ नाही समजला त्याच्या साठी ती कविता मी लिहीलेली नाही अशी काहीशी त्यांची भूमिका कायमच होती. त्यामुळे एक विशिष्ठ अर्थ दाखविण्याचा मुळीच खटाटोप इथे केलेला नाही. फक्त कवितेच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही इतकी काळजी घेतलेली आहे. ही पाने छापील पुस्तकासाठी असल्याने संगणकीय पटलासाठी खरेतर तितकीशी अनुकूल नाहीत याची नोंद घ्यावी.

मर्ढेकरांच्या कवितेतला प्रामाणिकपणा, खरेपणा हेच त्यांचे सौंदर्य आहे. उगचच देखण्या शब्दांचा वर्ख चढवून सत्यपरीस्थितीला बेगडी गुळगुळीतपणा देण्याचा (त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर- ब्रासबॅंडकी) त्यांना तिटकारा असावा. कवितेच्या अर्थाचा प्रवाह आणि त्याची संरचना याचा वेधक प्रयोग या कवितांतून केलेला दिसतो. शब्द रचनेनुसार आपापली जागा घेतात पण ते वाचत असताना त्यांतून अभिप्रेत असलेला अर्थ त्याची पुनर्मांडणी करत असतो. कधी कधी त्यातून एकाच वेळी एकापेक्षा जास्त अर्थ निर्माण होतात आणि कविता अजूनच खुमासदार होते.

इथे जी दृष्य मांडणी केलेली आहे ती या अनेकार्थाची शक्यता अबाधीत ठेऊन केलेली आहे. पण तरीही मर्ढेकरांच्या कवितेतलं शहरी जीवन- इमारती, ते रस्ते, ती गर्दी याच्याशी नातं जोदणारी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेतरी परत परत व्यक्त होणारा एक असहायपणा, बंदीस्त असल्याची जाणीव आणि त्यातून निर्माण होणारा क्षोभ, उपहास, शरणागती हे सारे कदाचीत साकार व्हावेत अशी कल्पना केली होती. ती कितपत यशस्वी झाली आहे ते ज्याने त्याने ठरवावे.

Monday, February 01, 2010

रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना...

भाषाशास्त्रात चवीनं चर्चिलेलं एक वाक्य- colorless green ideas sleep furiously. या वाक्याने अर्धवट झोपमोड झालेल्या काही स्वप्नाळू कल्पना.... यांना जोडणारा काही एक धागा आहेच असे काही खात्रीने नाही सांगता येणार. याला सुरूवात आणि शेवट नाही. गढूळलेलं नितळ होत गेलं तसा थांबलो.. इतकंच!
****

स्वातंत्र्याला झाली पन्नास वर्ष. मग तो रंग दे बसंती वाला रंग गेला कुठे? स्वातंत्र्याचं स्वप्न होतं आणि सगळ्याच स्वप्नात एक झिंग असते.. झोपेची झिंग. पण मग ती झिंग उतरली, झोप उडाली की नुसताच रंग उडाला? आम्हाला काय हवं होतं हे जर इतकं आम्हाला काय नको आहे यावर आवलंबून होतं तर नको असलेल्या झोपेत कितीही हवंहवंसं वाटणारं स्वप्न असलं तरी काय टिकवण्याची धडपड करायची- झोप की स्वप्न?
आमच्या स्वतंत्र राष्ट्रात आम्हाला जागायची सक्ती नाही, जगायची सक्ती नाही. मरणाची झोप मनापर्यंत झिरपलेली.. त्या निर्बुद्ध बधिरपणाचं स्वातंत्र्य. सायलेन्सर फुटलेल्या कर्कश्य अ-, ब-, क- कारणावर मात करणारी झोप.
पण
उसनवारीनं घेतलेल्या स्वप्नांना मेहनतीनं लावलेल्या चकमकत्या किनारी, गिरवून गिरवून झिजलेली वेलबुट्टी, या मातीतून उगवलेल्या हिरव्या स्वप्नांना केलेलं झोपेचं कलम,
कधीतरी असह्य होऊन शांत होतं सार काही.
उचकटलेली विस्कटलेली खडबडीत जाग येते झोपेला.

जागेपणी स्वप्नांना गुंगी येते... उरतो एक रंगहीन संताप
****

"माझाही रंग हिरवा होता" ती झोपेतच पुटपुटली.
मग आता काय झालं त्याचं? आणि बाकी सगळ्यांचं?
पलंगाच्या पायाशी चुरगाळलेला रंग तर नक्कीच हिरवा नव्हता आणि ती उमटलेली कोकमकळी- तीही!
पण मग.. काही वेळापूर्वी कदाचित काही वर्षांपूर्वी ती समुद्रकिनारी चालता चालता अचानक थांबली होती आणि माझ्या गालावरील ओरखाडा एकटक न्याहाळत तिनं विचारलं होतं..
सांग माझा रंग कुठला?
सूर्यास्ताचा तांबूस रंग तिच्या रापलेल्या गालांवर उतरला होता. खरपूस वासाचा तो रंग कोणता? तिच्या निळट ओढणीवर झिरपून जांभळ्या पाण्यासारखा रंग, तो कोणता?
’गुलाबी’ मी बोलून गेलो. खडूच्या पेटीत नसलेल्या त्या एकाच रंगाचं नाव मला नक्की माहिती होतं.
ती खळखळून हसली. उत्तर पटलं नाही तरी ते देतानाचा माझा गोंधळ आवडला तर ती तशी हसते. मग गळ्यात हात टाकून म्हणाली, " खुळ्या खुळखुळ्या, माझा रंग विचारते मी. माझ्या कपड्यांचा नाही"
माणसाला रंग असतो का? माझा प्रश्न न विचारताच तिला कळतो.
माझं अज्ञान लपवण्यासाठी मी तिला एक मिठी मारतो.
त्या ओलसर गोलसर स्पर्शात सारे प्रश्न खोचून ठेवतो तात्पुरते. वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा काढून गिरवायला.

तेव्हाचा तिचा रंग हिरवा होता का? पण मग त्याचं काय झालं? आणि बाकी सगळ्याचं?
****

पण काहीतरी लिहायला हवं. काहीतरी लिहायला हवंच.. त्यांच्या हिरवेपणाला साजेसं असं काहीतरी.
पणं काय ते सुचत नाही. तो न हसणारा चष्मेवाला मुलगा परवा म्हणाला, " तू लिहीत जा. चांगला लिहितोस. काय ते कळत नाही पण वाचावंसं वाटतं. उगच सुविचार लिहिल्यासारखं लिहू नकोस. निरर्थक असलं तरी खरं खरं लिहीतोस ते मला आवडतं"
मला कळलं नाही की त्याच्या बोलण्याचा मला आनंद व्हावा का?
मग ती हिरवी स्वप्नं? त्यालाही पडत असतील का? पण मी त्याला काहीच विचारलं नाही.
तो कधी कधी डोक्यात जातो माझ्या... उगीचच.
एकाच वेळी त्याला मुस्काटात मारावी की मिठी मारावी कळेना. एकच क्रियापद असलं तरी क्रियेचा गोंधळ उडालेला.
झक मारली आणि याला चहा पाजला.

आजचा चहा महागात पडला!
****

तू असं म्हणलासच कसं?
असं काय म्हणालो मी?
पण तिला संतापाने बोलवेना पुढे. ती हिरवी झाली.
लोक रागाने लाल होतात पण ती हिरवी होते. निदान मला तरी तसंच वाटतं दरवेळी.
आताशा रागाचं एक खातं तिनं माझ्याकडेही उघडलंय.
तिच्या रागाची हिरवट नशा चढते तिला आणि मग उतरत जाते हळूहळू. मग नंतरचा तो रंगहीन होत जाणारा अबोला.
आजचा साडे अकरा तास अठ्ठेचाळीस सेकंद चाललेला,
काल सतरा मिनिटात ती विरघळली होती.
आज कदाचित मी काहीतरी विसरतोय...
रंग संपलेत, आणायला हवेत.
कदाचित त्या चित्राबद्दल... बरं झालयस वाटतंय?

भिंतीच्या चित्रावर सगळेच रंग खुलून दिसतात पण हाताला लागलेला हिरवा रंग जाता जात नाही आणि कडू पण लागत राहतो चवीला.
***

पोटाची खळगी भरायला हवी. जगायला कोणाची ना नाही आणि आपली आडचण होत नाही जगण्यात तोवर हरकत नाही खात रहायला. भाताचा तो पिवळा ढीग खाता खाता तो विचार करत होता. फक्त खाताना त्याचे विचार त्याचं ऐकतात.
बाजूलाच ती आळणी काहीसं खातीय. तिला सोसत नाही जास्त तिखट.

तिच्या त्या चारांपैकी एकाचे तरी बाप आपण असण्याची शक्यता आहे किंवा चारांचेही.
पण तिनं कधीच तसा उल्लेख केलेला नाही. तशी ती पहिल्यापासूनच स्वतंत्र विचारांची आहे.
कधी कधी बरं असतं समोरचा अशा विचारांचा असला की!
अचानक आलेला तो मिठाईचा वास... किमान तीन आठवड्यांपूर्वीची असावी. एकदम तोंडाला पाण्याची धार सुटली. पण तो रंग...
त्याला मिठाईत खोटा रंग घातलेला मुळीच खपत नाही. खायचा असला तरीही. जीभ हिरवी होते त्यानी आणि मग विचारही हिरवटतात. सगळ्या जेवणाचा बेरंग...
त्यानं मोठ्या खुशीनं तो तिच्याकडे सारला.
तिला त्याच्या सगळ्य़ाच सवयी माहितीच्या. तिनं चेहर्‍यावरचे तुसडे भाव न बदलता तो उचलून पोरांसमोर टाकला. तिघांनी तो चिवडला थोडावेळ. एक कुरकुरत बाजूला झालं... तोंड वाकडं करून
"बापावर गेलय कार्ट" या अर्थाची तिनं नजर फेकली एक.
तो बाजूला जाऊन मुटकुळं करून आपलीच शेपटी हुंगत पडून राहिला.
’चला, निदान ते काटकुळं पोर तरी आपलं असणार,
जगवायला हवं.’

रंगहीन आयुष्यात तेवढाच एक हिरवा कोपरा...
****

"काय सायब, काय पेशल बेत?" बाबूनं पान बनवता बनवता विचारलं.
असंच काहीसं पण खूप जास्त ठसठसणारं शब्बोनंही विचारलं होतं घरातनं निघतानाच. कितीदा सांगितलं तिला की निकलते वक्त असं टोकायचं नाही म्हणून. पान खायच्या आधीच त्यानं मनातल्या मनात बाबूच्या प्रश्नावर एक पिंक टाकली. बाबूनं विषय न वाढवता पानाला शेवटची दुमडी घालून रेहमानच्या हातात टेकवलं.
हा बाबू बरा. त्याला कळतं कुठं थांबायचं ते. येवढं जरी शब्बोला कळलं असतं तर...
तर चंद्रीची आणि त्याची भेट नसतीच झाली. आहे तेच बरं आहे.
आज तो त्याचा चकचकीत कुडता घालून आला होता वर जरीवाला जाकीट. ठरवून आला होता की- आज विचारायचं चंद्रीला.. निकाह करशील? येताना चंद्रीसाठी मस्जीदच्या बाहरची चुनरी घेऊन आला होता.. चंद्रीला तो हराभरा रंग खूब पसंत होता.
"चंद्री तो कोठेवाली..." मी तरी कुठे अल्लाघरचा पाक बंदा आहे!

दारातच जुम्मन वाट आडवून उभा होता.

त्यालाही गालावर शब्बोसारखा मस्सा होता. त्याला एखादा सिगरेटचा चटका द्यावा असं त्याला परत एकदा वाटून गेलं. गोडघट्ट वासाचा एक भपकारा आला त्याच्या भडक कपड्यातून.
"पंछी तो गेला उडून मिया..."
?
"अच्छी नोकरी मिळाली तिच्या आदमीला. गेली ती.
परत नाही यायची."

...
डोक्यात विचारांची अन तोंडात विड्याची अडचण एकदमच.
पचक!
त्याच्या जखमी स्वप्नांचे शिंतोडे त्याने जिन्याच्या कोपर्‍यात उडवले.

त्या रंग उडल्या भिंतीवर अशा कित्येक स्वप्नांच्या गोवर्‍या झाल्या होत्या
****

तुझं बरंय रे! काही झालं तरी तुला झोपेची वेळ झाली की झोप येते. माझं नाही ना तसं. माझा विचार सुरू होतो तोच मुळी झोपेच्या चिंधड्या उडवत. प्रश्न जितका गहन तितकी तुझ्या घोरण्याची आवर्तनं उत्तुंग होत जातात.
तू नेहमी म्हणतोस की तू झोपेत विचार करतोस. पण उठतोस तेव्हा तुला फक्त प्रश्न नीट कळलेला असतो फारतर. त्याची उत्तरं तू कायमच माझ्यावर सोडतोस. संताप संताप होतो माझा. सगळंच कसं रंगहीन, नीरस वाटायला लागतं अशावेळी. तुझ्या झोपेला सुरूंग लावण्याची एकच कल्पना येते डोक्यात. हिंस्त्र कल्पना...
त्या कल्पनेचीही नखं बोथट होतात कारण तू गालात हासत असतोस झोपेत.
कमाल आहे तुझी. अशातही तुला स्वप्नं पडतात?
मला वाटायचं निदान स्वप्नात तरी आपण सोबत चालतोय एकमेकांच्या. असूही... पण स्वप्नांनी डिवचलय झोपेला आताशा.

सकाळ होईल आता, तू उठशील आणि स्वप्नाळू डोळ्यांनी माझ्या तारवटलेल्या डोळ्यात बघत राहशील. माझा सारा संताप पिऊन कानाची पाळी लाल होईल तुझी. सगळेच प्रश्न, सगळेच विचार वाहू लागतील वाट फुटेल तसे. झोप येईल मुरत गेल्यासारखी माझ्या डोळ्यांवर.
आता घाई करून उठवू नकोस मला. मी खूप थकलेय रे.
असंच तुझ्या कुशीत शिरून राहू दे.
नको जागं करूस मला.
थोपटत राहूदे मला डोळे मिटून-

रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना...
****

Tuesday, January 26, 2010

The Champa Flower- IV

सुनीताबाई गेल्या... शनिवार होता तो. ना त्यांच्या प्रकृती-अस्वास्थ्याची बातमी पसरत राहिली ना त्या गेल्या त्याचा काही गाजावाजा झाला. समईच्या वातीसारख्या तेवता तेवता शांत झाल्या. कळलं तेव्हा का कोण जाणे, कोणीतरी अगदी ओळखीतलं अचानक नाहीसं झाल्यासारखी एक पोकळी तयार झाली मनात. राहून राहून त्यांच्या दोन कविता फिरून फिरून ओठांवर येत होत्या. त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेल्या नव्हे पण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या (असे त्यांनीच म्हटले होते)

त्या कविता मी पहिल्यांदा ऐकल्या त्या त्यांनी वाचलेल्या. पु.ल. जाऊन वर्ष झालं तेव्हाच्या ’कवितांजली’ या कार्यक्रमात त्यांनी त्या सादर केल्या अगदी ... शेवटच्या दोन. तो काव्यवाचनाचा कार्यक्रम सुंदर आहेच पण त्या दोन कवितांचं सुनीताबाईंनी केलेलं सादरीकरण हे केवळ अविस्मरणीय आहे. दोन्ही कविता पद्माबाईंच्या आहेत. पण त्या आपल्या कशा झाल्या याचा खुमासदार किस्सा सांगून पुढे त्या कविता सुनीताबाईंनी समोर जिवंत उभ्या केल्या आणि त्या खरंच त्यांच्या झाल्यासारख्या वाटल्या.
कार्यक्रमाचा शेवट केला तो या कवितेने-

आताशा मी नसतेच इथे..
जरी माझी इथे ये जा असली तरी
आताशा मी नसतेच इथे

मला तोपर्यंत माहीत नव्हतं की कविता वाचतानाही रागदारीसारख्या मोक्याच्या जागा घेता येतात आणि ऐकणार्‍याच्या तोंडून आपसूक दाद बाहेर पडते. काही जागा कवीने घेतलेल्या असतात : कविता वाचताना त्या अधिक खुलवून दाखवाव्या लागतात
आणि काही जागा कविता वाचणारा स्वतः निर्माण करत असतो. त्यातून किती तरी नवे अर्थ तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या कवितेत किती तरी जागा अशा होत्या की अंगावर सरसरून काटा यावा..

सोबत ना? आहे की आपल्या त्या यांची...
नावही आहे त्यांना, पण मला ना आता काही आठवतच नाही
किंवा
ते काठाकाठाने जे निर्माल्य वाहताय ना
त्यात आणि त्याच्या ताज्या ताज्या स्वप्ना
किंवा
वस्त्रं कधीचीच गेलीयेत कदंबावर अंतरपाट व्हायला
मी झालीय एक गाणं निळ्या नदीत वाहणारं

ते निळं गाणं थांबलं आता.. ही शांतता हुरहूर लावणारी आहे.
*****

चाफ्याच्या झाडाचं हे सत्र जसं सुरू केलं तेव्हापासून राहून राहून त्या दोनपैकी एका कवितेची आठवण येते आहे. ही कविता पद्मा गोळ्यांची आहे आणि सुनीताबाईंनी आधीच आपला हक्क त्यावर नोंदवला आहे. तरीही या साहित्याचे जे कोण प्रकाशक असतील त्यांची माफी मागून ही कविता इथे नोंदतो आहे. या कवितेखेरीज चाफ्याचा हा दरवळ अधुरा आहे... बाईंनी भरून ठेवलेली ही फुलांची ओंजळ....
यातील
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
इथे सुनीताबाईंनी घेतलेली ’कळतंय ना’ वरची तिहाई... वेदनेत रुतत जाणारी.
आह!

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं
दु:ख उरलं नाही आता मनात

फुलांचा पांढरा पानांचा हिरवा
रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी
मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळखीच्या तालात ओळखीच्या सुरात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं
ओंजळ फुलांनी भरलीय ना
- पद्मा गोळे