Friday, September 25, 2009

The Champa Flower- I

समज मी सोनचाफ्याची कळी झाले
गंमत म्हणून,
आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर
लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्‍यावरती झोके घेत;
तर सांग ना आई, तू ओळखशील मला?

तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील,
’अगं चिऊ, कुठे गेलीस?’
आणि मी हासेन माझ्याशीच-
मनातल्या मनात, गालातल्या गालात

मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून
बघत राहीन तुला रांगोळी घालताना

आंघोळीनंतर ओले केस खांद्यावर तसेच घेऊन
तू चाफ्याच्या सावलीतून चालत तुळशी वृंदावनाशी पोचशील
चाफ्याचा ओळखीचा दरवळ तुझ्या गालाला चाटून जाईल
पण तुला माहीत नसेल की ती मीच आहे

दुपारी जेवणानंतर
तू खिडकीशी बसशील रामायण वाचायला
झाडाची जाळीदार सावली तुझ्या केसांमधून निसटून मांडीवर विसावेल
तेव्हा माझी इवलीशी सावली हात पुढे करून
तू वाचत असलेल्या पानावर मधे मधे करत राहील
तुला कळेल का तेव्हा की ही तुझ्याच फुलाची खोडी आहे!

आणि मग दिवेलागणीला
जेव्हा हातात कंदील घेऊन तू गोठ्याकडे जाशील
मी परत तुझं कोकरू होऊन खाली उडी मारेन
आणि घरात लपून बसेन
तू आत आल्या आल्या तुझ्याकडे गोष्टीचा हट्ट धरेन
"अगं लाडोबा, कुठे होतीस दिवसभर?" तू विचारशील
"आमची किनै गंमते" तू कित्ती विचारलंस तरी नाहीच सांगायचे मी ....

****
हा रवींद्रनाथांच्या एका कवितेचा स्वैर अनुवाद. स्वैर अशासाठी की त्यात मला वाटले तिथे काही बदल केले आहेत कवितेचं शीर्षक कायम ठेवलं आहे. ही कविता अनुवादीत करून झाली आणि त्यातून अजून काही कवितांना पालवी फुटली. पण एकाच ठिकाणी त्या लिहीण्याचा मोह टाळतो आहे. कारण एक धाग्यात गुंफलेल्या असल्या तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.

Monday, September 14, 2009

रेघांमागून

केस पिंजारलेले ते दोघं चौघं (माड)
घाईनं आंघोळी उरकून घेतात
कुंपणाशी राखणीला बसलेली म्हातारी (भिंत)
हिरवं लुसलुशीत इरलं अंगभर ओढून घेते.
फाटकाशी पाठीत कुबड काढून ओणावलेला तो (प्राजक्त)
उभ्याउभ्याच आळस दिल्यासारखा करतो
ओल्या रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेली फुलवाली (कोरांटी)
आपली मळकट छत्री झटकते
...
पागोळ्य़ांतून मारलेल्या उभ्या रेघांमागून हे सगळं बघत
मी दारात उभा असतो
आणि
माझं मन एखाद्या वांड मुलासारखं
प्रत्येक थेंबात उड्या मारून पाणी उडवत राहतं
...
जेव्हा श्रावण माझ्या घरी पाहुणा म्हणून येतो.

Sunday, September 06, 2009

थेंब एक...

सखी,
आज सक्काळपासून पाऊस वस्तीला आलाय. आठवतं ना तो यावा म्हणून काही दिवसांपूर्वीच तर जोगवा घातला होता बयोनं. पण आता त्याचं येणं तस रोजचंच नसलं तरी नित्याचं झालंय. म्हणून काय सगळंच कौतुक संपावं? नाकं मुरडत जिथे तिथे काळ्या छत्र्यांचा निषेध! आपल्या दोघांची छत्री विसरायची सवय एकसारखीच. आता ’यामध्ये ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण?’ हे सांगणे कठीणच. तस आपलं काहीच सरळ सोप्पं नसतं.
बरं ते जाऊदे.

हं तर काय सांगत होतो? आठवलं!
तो पण अस्सा आहे ना की पसरून राहिलाय दिठीभरून, सुस्तावल्यासारखा. आपल्या विहिरीपासचा तो ’अवलीया’ आठवतोय? अगदी त्याच्यासारखाच निरीच्छ. ए पण मला अजूनही वाटतं की त्या नावात त्याचा तो हिरवटपणा येत नाही. त्याचं नाव ’गजारू’च असायला हवं होतं. पण आपल्या वादात कायम तूच जिंकतेस आणि तो तसाही निरीच्छच. अवलीया काय आणि गजारू काय? त्याला काहीच फरक पडणार नाहीये. तू गेल्यापासून तो अजूनच निरीच्छ वाटू लागलाय. त्याच्या एका बाजूच्या पारंब्या सुकून गेल्यात. यावेळी वसंतही अगदी कसनुसाच उतरला होता त्याच्यावर.एक शामा घरटं करू गेली होती त्याच्या आसर्‍याला पण अर्धवटच सोडलंन्‌. त्यानीच हिडीसफिडीस केलं असणार. बरं बरं, तुला त्याचा भारी पुळका!
नसेल केला तुसडेपणा पण जराशी आपुलकी तरी दाखवायची होती.

ते असो. तर मी काय बोलत होतो?
... हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आजकाल मी सलग एका विषयावर बोलूच शकत नाही.तू नसलीस तरी मीच फाटे फोडत राहतो माझ्याच विचारांना. तू जाताना सगळे प्रश्न इथेच सोडून गेलीस जणू माझ्या आजूबाजूला.

हं, पाऊस!
आमचं पूर्वीचं नातं खूप धसमुसळं होतं. तोही धबधबत राहायचा आणि मीही हुंदडत रहायचो. शीरूची सोबत होती. तो फक्त काही दिवसांचा होता तेव्हापासूनचा आमचा पावसाशी लळा. बांधावरनं चौखूर उधळायचो. माईचा जीव वरखाली व्हायचा. ती माजघरातल्या माजघरात आतबाहेर करत रहायची आणि त्याच वेगानं विठोबा तिच्या पायात पायात घोटाळत रहायचा. मग पावसाचा फारच जोर वाढला तर विठोबाला पेकाटात एक लाथ बसायची आणि मग ती भाऊला पिटाळायची आमच्या शोधार्थ. तो इरलं घेऊन आम्हाला शोधत यायचा. आम्ही मस्त आमच्यातच. तो बरोबर येऊन माझा कान आणि शीरूचं शेपूट पिरगाळायचा. मला फार वाटायचं आपल्यालाही शेपूट असायला हवी होती म्हणजे जरा कमी दुखलं असतं. म्हणजे तसा माझा अंदाज होता. कारण मी बेंबीच्या देठापासून बोंब मारायचो पण शीरू मात्र निमूट असायचा. अशी आमची वरात भर पावसात घराकडे परतायची. मग तोही गडगडाटी हसायचा आणि त्याचा जोर आवरता घ्यायचा. घरात आल्या आल्या शीरू मालीच्या पोटाखाली शिरायचा. तीही रवंथ थांबवून त्याला चाटायला लागायची.
माई माझं डोकं पुसताना म्हणायची," भाऊ, यालाही बांध रे दावणीला."
चुलीपाशी बसून गरम सुंठ घातलेलं दूध प्यायला लागायचं. माराची भरपाई म्हणून मग विठोबालाही इवलसं जास्तच मिळायचं.तो मिशीवरचा राग पुसत माझ्या मांडीशी येऊन बसायचा. मी त्याच्या शेपटीच्या गोंड्याकडे कौतुकाने बघत दूध संपवायचो. बाहेर दमलाभागला पाऊस ठिबकत रहायचा.

शीरू माझ्या आधीच मोठा झाला. औताला जुंपला गेला. त्याला मग पावसाचं तितकंसं राहिलं नाही. माझ्या गटातला एक गडी फितूर झाला. पाऊस जरा कमीच पडला त्या वर्षी.

त्यानंतरचा, माझा आणि पावसाचा आवडता प्रसंग म्हणजे आम्हांला दोघांनाही तू पहिल्यांदाच भेटलीस तेव्हाचा.
शाळेच्या शेवटच्या वर्षाला होतो मी. शाळेतनं घरी येत होतो. ’पावसाचा जोर ओसरेपर्यंत आम्ही येत नाही’ म्हणून बाकी दोस्त मागे राहिलेले. मी मात्र पावसाच्याच सोबतीनं वारं कानात गेल्यागत धावत निघालो. चावडीपासची चढण चढून आलो आणि घराकडे वळलो तर समोर चिखलात एक गाडी रूतलेली.गाडीवान आणि एक टक्कल पडलेले गृहस्थ ती ढकलण्याचा प्रयत्न करून राहिलेले. गाडीचा बैलही तसा बेताचाच होता. त्या तिघांच्याही ताकदीच्या पलीकडे ती गाडी अडकलेली होती.मला बघून त्यांच्या जिवात जीव आला. "ए पोरा, जरा हात लाव रं" असं तो गाडीवान ओरडला तसे ते कोटटोपीवाले गृहस्थ म्हणाले," अरे लहान आहे तो. बाळ, आमची गाडी अडकली आहे. जरा कोणा मोठ्याला बोलावशील तर बरं होईल बाबा." मी म्हणलं," आत्ता बोलावतो बघा." मी निघणार इतक्यात गाडीची ताडपत्री सारून एका पोरीनं उडी मारली खाली.
"मी पण येणार तुझ्य़ाबरोबर"
"मग चल की"
आणि मग गाडीतून येणार्‍या हाकांकडे सपशेल कानाडोळा करून आम्ही धूम ठोकली. चार पावलं गेलो असू अन्‌ ती रप्पकन चिखलात पडली. अगदी दंडवत घातला. मला वाटलं की च्यामायला आता ही भोकाड पसरणार. पण तू उभी राहिलीस आणि तुझ्या चिखलमाखल्या चेहर्‍यावर विश्वविजयाचा आनंद होता.
"चल की रे"
"पण तो चिखल"
"तो काय जाईल पावसाने वाहून"
तेव्हाच कळलं की आपली गट्टी जमणार. आणि मग दोन वांड चिंबभिजली पोरं सुसाट धावत सुटली फुलारलेल्या हादग्याच्या ताटव्यातून. पावसानंही वेग वाढवला. त्याला जणू सगळा चिखल धुवून काढायचा होता तुझ्या अबोली परकरावरचा. पावसापाण्याच्या खेळातला एक गडी वाढला.

नंतरचे काही पावसाळे कसे अगदी भुर्र्कन उडून गेले. मैत्र जुळत गेलं. अचानक पावसाने रंग बदलला. अचानक नसेलही कदाचित. पण अधिकच गहिरा होत गेला तुझ्या माझ्यासाठी. अनेक संदर्भ बदलत गेले.

पण तो असा कधी वागला नाही. याआधीचा पाऊस कधीच असा निरीच्छ नव्हता. असा उगचच कुढतखाऊ नव्हता आपला पाऊस. तू जाताना मी खूप लपवलं त्याला. नाही वाहू दिलं डोळ्यातून. तू तर सर्दीचा बहाणा करून सारखी डोळ्याला रूमाल लावत होतीस. तू जाताना आठवणीचा म्हणून एक थेंब घेऊन गेलीस. माझ्या सोबतीला उरला पाऊस इथेच ठेवलास. पण काहीतरी बिनसलंय गं त्याचं.एक थेंब हारवलाय त्याचा.

****

श्रावणाची हवा पावसाळी कुंद
आपल्यात धुंद थेंब एक

अत्तराची कुपी केवड्याचा गंध
दरवळ मंद थेंब एक

आठवांचा वसा पापणीत बंद
थोडा मुक्तछंद थेंब एक

चातकाला जडो पावसाचा छंद
उरो आत्मानंद थेंब एक

सरींवर सरी कोसळले नभ
कुठे शोधू सांग थेंब एक?

थेंबासाठी एका केला आटापिटा
गालावर तुझ्या सापडला...

Thursday, July 23, 2009

वेदनेची अर्धुके..

का? असं का व्हावं?
मी अस्तित्वाच्या जाणिवेला संवेदनेचा स्पर्श करतो आणि वेदनेची जी वर्तुळे उठतात ती कुठेतरी तुझ्या काठावर पोचतील आणि तिथून उमटणारी प्रतिक्रियेची वर्तुळे एकमेकांत गुंफत परत माझ्यापर्यंत उचंबळून येतील असं मला उगचच वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. ती वेदना तुझ्यापर्यंत पोचतच नाही का तुझ्या संशयाच्या भोवर्‍यात ती केविलवाणी होत नाहीशी होते कदाचित. मी मधूनच नारायण सुर्व्यांप्रमाणे लेखणीचे बंड उभारून "सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे" च्या थाटात काहीतरी लिहून जातो आणि तुला वाटतं की मी मोझेसचा बुरखा घालून उपदेशाचे दहा खिळे तुझ्य़ा स्वातंत्र्याचा सीमेवर ठोकणार आहे. पण त्या सर्व लिखाणात मी आणि तू असा दुजाभाव राखलेला नसतो. मी काही सांगतोय आणि म्हणून तू ते ऐक अशी अपेक्षाही नसते तिथे. मी फार शहाणा आणि तूच नाठाळ असा भाव त्यामागे नसतो. तो सगळा माझा माझ्याशी चाललेला प्रतिवाद असतो. तरीही मला तो तुझ्यापर्यंत पोचवायचा असतो जसाच्या तसा. कारण तो चालू असताना तुझ्या तिथे असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. तुझ्या सहभागाची अपेक्षा असतेही कधीकधी पण हट्ट मुळीच नसतो. तुझी नुसती मूकपणे दिलेली साक्षही पुरेशी असते. कारण माझे विचार माझ्या भावनांना फितूर होऊन मी माझ्याकडून फसवला जाण्याची भीती मला भावनाशून्य आणि विचारहीन बनवते कधी कधी, तेव्हा दहा मिनिटं थांबून शिळोप्याच्या गप्पा मारायला कोणी तिथे असलं तरी मला चालणारं असतं.

जेव्हा काहीतरी अस्वस्थ करणारं वाचतो, बघतो तेव्हा प्रश्नांचं एक वादळ उठतं जे स्वतःलाच निर्ढावलेला षंढ म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतं. त्या रागानेच शब्दांना कधी धार चढते पण त्यात कोणाला दुसर्‍याला दुखावण्याचा हेतू नसतो आणि तुला तर नाहीच नाही. पण वाटतं कदाचित तुझ्य़ाकडे उत्तरं असतील तर मला परत त्यावर विचार करायची गरज नाही. आणि जर उत्तरं नसतील आणि असे प्रश्न तुझ्याही डोक्यात उठत असतील तर....
प्रश्नांना प्रश्न जोडून त्यांचं अर्धुक इतकं विस्तारावं की आकाशाला नेऊन भिडवावं. मग कदाचित उत्तरं जागोजाग उगवतील झाडाझाडातून अगदी जसं की ग्रेस त्या कवितेत उगवतो- झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया!

जेव्हा आरती प्रभू गाण्यातून ऐकत असतो आपण. आता उशाचा दगड मधे आशाताई असा काही जीवघेणा खर्ज लावते, जो बाळासाहेबांनी अगदी तासून बसवलेला असतो तिथे. आणि तरी गुलजार-पंचमदाचं मेरा कुछ सामान ऐकल्यासारखं फक्त विरहाच्या काठापर्यंतच तुझा प्रवास संपतो तेव्हा मी आक्रंदत असतो ते त्या द्यायचे राहून गेलेल्या नक्षत्राच्या देण्याबद्दल. मी बोलत असतो ते त्या व्यथेबद्दल ज्या का कोण जाणे पोचतच नाहीत तुझ्या पर्यंत. आणि माझ्य़ापाशी उरतात काही कळ्य़ा आणि कोवळी पाने.........

माझी व्यथा वेदनेचं रूप घेऊन येते एखाद्या हळव्या क्षणी पण चिंता होऊन डोक्यावर बसत नाही. कारण ’चिंता करतो विश्वाची’ म्हणत कपाटात स्वतःला बंद करून घ्य़ायचं धाडस नाही माझ्यात. ते ओझं सहन होण्य़ाची कुवत नाही आपल्यात अशी भीती असेलही कुठेतरी पण त्याहीपेक्षा तू मला शोधत दार उघडशील की नाही याची शहानिशा नाही करायची मला. पण मग अशावेळी डोळ्यांनी दगा दिलाच आणि एखादा दर्द गझल न होताच टपकला बाहेर तर तुझ्यासाठी त्याचा तमाशा का व्हावा?

तुला असं का वाटतं की मला विनोद कळत नाही? आठव बरं तूच - असं कधी झालंय का पूर्वी, की चेष्टा-विनोदापासून विडंबनापर्यंत मी कधी टाळ्या पिटलेल्या नाहीत? नाक रंगवून विदूषकी चाळे करायचीही तयारी असते आमची. हं पण माकड बनून मदार्‍याच्या टिमकीवर नाचण्याचा उपहास नाही सोसत. आता त्याला काही स्वाभिमान वगैरेचं नाव देऊन उगच मोठं करायचं नाही मला. पण काही सवयी जपतोच ना आपण जिवापाड! त्या सवयी म्हणजे स्वाभिमान नसतो काही पण ते जपणं असतं ना त्यालाच स्वाभिमान म्हणत असतील कदाचित.

मला मान्य आहे की हे सगळंच आपल्या कुंपणाबाहेरचं आहे. खिडकीतून हात बाहेर न काढण्याची खबरदारी घेत आपण आपापल्या चौकोनात सुरक्षित आहोत. तू अजाण नाहीस आणि भावनाशून्यही नाहीस. जगरहाटीचं शहाणपणही आहे तुझ्याकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप जास्त. पण काही अंशी .... नाही नाही पूर्णांशी तटस्थ मात्र आपण दोघेही आहोत. पण आपण फक्त सुपात आहोत. जेव्हा वेळ आपल्यावर येईल तेव्हा आत्ता जात्यात असणारे आणि तेव्हा सुपात असणारेही, "राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" असा रोखठोक सवाल उभा करतील. आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल. पण काळजी करू नकोस, तेव्हाही मी तुझीच बाजू घेईन.

आता मी हे असं काहीतरी बोलतो कारण तुझ्याशी बोलताना शब्द मोजून मापून बोलण्याचा ताण नसतो मनावर. आणि बोलून दम लागला की असं मध्यात तोडलं तरी चालतं तुला.

Saturday, June 13, 2009

रोता सूरज, जलता सूरज

कोण ते टिळक, गांधी, नेहरू, आझाद, पटेल, आंबेडकर?
आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला लोकशाही दिली
"अरेरे साहेब गेला! तो होता तेच भलं होतं" असं आम्ही चारचौघात म्हणू शकतो इतपतच काय ती आमची लोकशाही-
आम्ही काय मनात येईल ते बोलू शकतो. आणि काहीही न करता बसू शकतो. आणि का नाही? आम्ही रामायणं लिहीत नाही नुसती तर ती घडवतो महाराजा.
बाकी चोर्‍यामार्‍यापुरते आम्ही वाल्याचे वारस.
वाल्मिकी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही परंपरेशी नाळ तोडून
आधुनिक म्हणवायला मोकळे- शेपट्या उडवत. कोणाच्या शेपट्या? थांबा थांबा बोलू नका. लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. आजकाल शेपट्यांच्याही वाटण्य़ा झाल्यात. मालकासमोर हालवता झुलवता येत नसतील तर मग नुसत्याच पायात घाला. उरल्याच का तरीही? मग छाटून टाका.

आम्ही खुश होतो. का तर मिलीजुली सरकार... जरा एकमेकांचा वचक राहील. एकाची सद्दी नको बुवा. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ. आता आम्ही खुश येवढ्यासाठीच की एकसंध सरकार आलं. तुकड्या तुकड्याचं नको. पायात पाय अडकून तोंडघाशी पडणं नको. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ.
पण कुठला अनुभव कधी बरा होता? सांगा ना?
कोण दगड? कोण वीट? सांगा ना?
शेवटी आपल्या हाती काय- दगड आणि विटा!
कोणीतरी आपल्या डोळ्यात धूळफेक करायची
आणि मग आम्ही मोकळे एकमेकांवर दगडफेक करायला
तुमचा पक्ष कोणता? तुमचा गट कोणता?
तुमचा कोण? राम, नानक, बुद्ध, अल्ला की येशू?
का या यादीत नसलेले किंवा असलेले कोणी?
आम्ही बुवा शिकलेले.
गट नसलेल्यांच्या गटातले, धर्म नसलेल्यांच्या धर्मातले
आमचा कशाशीच संबंध नाही. आम्ही तटस्थ.
नेरोनी रोममधे माणसं जाळली जिवंत तेव्हा आम्ही तटस्थ होतो
डायरचं जालियनवाला झालं तेव्हाही आम्ही तटस्थ होतो
आणि अशा कित्येक घटना घडून गेल्या मधे
आणि आता कित्येक घडताहेत प्रत्येक दिवशी पण आम्ही तटस्थ
काहीच कसं करत नाही म्हणता?
आम्ही बोलतो ना- संयमाने, संतापाने, पोटतिडकीने
आम्ही लिहीतो ना असं काही तरी- गुळमुळीत, खुसखुशीत आणि जळजळीतही
आणि स्वप्न बघतो हे सगळं बदलण्याची
कायदा आहे ना हे सगळं बदलायला.....

कायदा समाज व्यवस्था बदलू शकत नाही
कारण कायद्याला पळवाटा असतात.
कायदा फक्त समाजव्यवस्था राखत असतो.
त्यामुळे समाज व्यवस्थेमधे जे शिखरावर त्यांच्या हाती कायदा, ते म्हणतील तो कायदा. चाबूक गाडीवाल्याच्या हातात द्या नाहीतर बैलांच्या वळ उठायचे ते उठणारच. कारण ज्याच्या हातात चाबूक तो दिशा ठरवणार. सोय इतकीच की त्यातल्या त्यात आलटून पालटून मार खा आणि दिशा बदलत दिशाहीन वाटचाल करत रहा. त्यातच आम्हाला लोकशाहीचे सार्थक झाल्याचे समाधान
***

सूरजको भी रोते हुए यहाँ हमनें देखा है ।
पहली किरण की मौत होते यहा हमनें देखा है ।।
चांदनीसे झुलस गयी रात कितनी काली है ।
चंदा के माथेपर किसने लिखी हुई एक गाली है ॥१
आधा खाया आधा छोडा बरगद अकेला खडा है ।
भूखा प्यासा काला बादल पत्थर होके पडा है ।।
मधुशालाके बाहर सुस्ताया काला जहरीला सपना है ।
जिसने अपना खून पिया वह समय भी तो अपना है ।।२
लंगडी, अंधी, काली बिल्ली रास्ता रोके खडी है ।
मंदिरसे निकली बूढी चुडैल दीवारोंपर चढी है ।।
रोशनीमे टंगी परछाई सायेसे भी डरती है ।
नसीब बुननेवाली मकडी जाल में फसकर मरती है ।।३
भीष्म-द्रोण की मुंडी काटे दुर्योधन सब झूम रहे हैं ।
दधीचि की हड्डी लेकर पागल कुत्ते घूम रहे हैं ।।
कुरुक्षेत्रका वस्त्र माँगकर सूतपुत्र पछताया है ।
पांचजन्यकी राह देखकर रण में अर्जुन सोया है ।।४

पलकें जलकर राख हो गयी
पडा हुआ था लकडी बनकर ।।
आएगा आएगा गिरिधर
नवजीवन की वर्षा लेकर ।।५

क्षितीज किनारे आँखे डाले कितने ही युग बैठा था ।
बैठा था; बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा.........

.

Saturday, June 06, 2009

आवर रे सावर रे.....

स्निग्ध संधिप्रकाशाच्या आडोशाला लपली होती अभिसारिका रजनी!
वासरांच्या पापण्या मिटू लागल्या तशी ती रात्र मेघांचं अवगुंठन दातांत धरून हलक्या पावलाने पुढे आली. तूही तशीच आलीस सभागारात, शरावतीच्या तरंगांच्या जीवघेण्या संथ लयीत.
इंदीवर कमळासारख्या निळ्या रंगाचं लज्जावस्त्र ओढून. आज म्हणे त्या सुप्रसिद्ध पखवाजियाचा सारा अभिमान आपल्या नृत्यकौशल्यानं उतरवून टाकण्याचा पण केला होतास तू.
’माझ्या वादनाच्या गतीच्या तोलाची नर्तिका अजून जन्मली नाही’
हे त्याचे बोल ऐकलेस तेव्हा खदिरांगार उतरला होता म्हणे तुझ्या डोळ्यांत.
स्वीकारलंस ते आवृत्त आव्हान!
आतल्या अग्निशिखेचा तो दाह शमवायला का गं अशी शीतल निळाई लेवून आली होतीस? सभेला वंदन करण्यासाठी एका लयदार झोक्यात तू ते अंशुक दूर केलंस आणि तुझ्या डोळ्यांतल्या किरणप्रभेनं दीपून गेलो मी.

पण पखवाजावर स्थिरावलेल्या हातांचा स्वामी शांत होता.
एक अभिनिवेशी हास्य त्याच्या चेहर्‍यावर विसावलं होतं.
कत्‌ धि ट धि ट, धा - ,ग ती ट, ती ट ता -
गम्भीर बोल उमटले त्याच्या मुखातून.

तू हातांचा नागबंध कानाशी नेऊन अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतीस भुवया उंचावून.
धमार!
क्षणैक लवलेली तुझी मान आणि लगोलग सुरू झालेला तो पदन्यास.
एकेका तुकड्यासरशी त्याच्या हातांची गती वाढत होती आणि तुझे पाय सहजपणे त्या गतीवर विहरत होते.
तू कथा सुरू केलीस...
एकपट.
तो भांडून तंटून निघून गेला आहे..ती सुन्न, विमनस्क बसून आहे तरुतळी.
दुप्पट.
थरथर..दाह.. ती उठते..त्यांचं गूज ठाऊक असलेल्या वेलीवेलीला, पानापानांना विचारू लागते..असाकसा निघून गेला तो मला एकटीला टाकून?

चौपट..
वर्तुळाकार घुमणं तिचं..काय करू? कुठे शोधू?..ये ना, सख्या ये ना..सजणा, जिवीच्या जिवलगा.. माझ्या अमृतमय प्राणा, ये ना!
पखवाजियाच्या हातांमध्ये दाहक कली शिरला. त्या शांत मुद्रेवरचं हास्य कधीच विरलं. भरून आले त्याचे डोळे. देवचार अंगात शिरल्याप्रमाणे तांडव सुरू झालं पखवाजाच्या गालांवर.
तुझ्या कपाळी स्वेदबिंदू डबडबलेले. पण तरीही नाचतच होतीस तू धूम्रवेलीसारखी वेगात..वेगात..अजून वेगात!
पण नाही साहवत आता..तिचा चेहरा बोलत होता..नको अंत पाहू..
डोळे मिटण्यापूर्वी एकवार दर्शन दे.. केवळ एकवार!
धूम्रवेल थरथरली..तू आता कोसळणार!
पण समेवर त्या एका क्षणात तुझी त्याच्याशी दृष्टभेट झाली...
तुझ्या डोळ्यांची आभा आणि त्याच्या डोळ्यांचं पाणी
एक इन्द्रधनू प्रकट होताना मी पाहिलं!
पुनश्च एकपट.

आवर रे, सावर रे मन तुझे खुळे
स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

पावसाचे मोती येती गंधवती माती
ओलावला वारा सारा थरारती पाती
दिशा कशा वेड्यापिशा झालेनासे कळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

आकाशीच्या कपाशीच्या वाती राती निळ्या
अंधाराच्या गंधाराला प्रकाशाच्या कळ्या
पुनवेच्या चांदण्याला पंचमीचे झुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

कोकिळेला गळामिठी मारव्याची खूण
भ्रमराच्या अधरावर मकरंदी ऋण
चंदनाच्या झाडालागी प्राजक्तीची फुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

अधीर तरू मदिर झरे मोहरली काया
रानी वनी जपे कानी आठवांचा फाया
केतकीच्या बनी मनी कस्तुरीचे मळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

..

Tuesday, May 26, 2009

खुशाल आलो घरटे मोडून

सगळं सोडलंस म्हणतोस? अगदी सगळं?
प्रत्येक सूत, प्रत्येक धागा, प्रत्येक नातं, प्रत्येक प्रेम, प्रत्येक द्वेष... सगळं.
मग तो आत्ताचा उसासा......

सगळ्या जगाला माफ केलंस पण स्वतःला केलंस का मुक्त त्या एका अपराधातून? का म्हणूनच घेऊन आलास ते मातृत्वाचं स्वप्न कोणाच्या नकळत? मला माहीत आहे- हा सृजनाचा ध्यास त्याशिवायचा नाहीच मुळी.
नवीन जमीन कसतोयस. नवी सृष्टी स्थापतोयस. नवा कसा वसवतोयस. नव्यानं जगायचं म्हणतोयस- त्या एका अपराधाला कुशीला घेऊन. पेर, पेर ते दुःख प्रत्येक नव्या स्वप्नाच्या मुळाशी. ती तांबडी आई ’नाही’ नाई म्हणायची. सगळं पोटाशी घेईल आणि फक्त आनंद देईल भरभरून. आई अशीच असते रे! ती नाही राग ठेवायची मनात.

तू काय ओळखत नव्हतास तुझ्या आईला? पण कर्तव्य मोठं असतं असंच शिकलास तू. तिनंच तर शिकवलं होतं. त्या कर्तव्यापोटी तर घाव घातलास त्या कल्पद्रुमेवर आणि मग नंतरच्या एका वणव्यात सगळं घरटच जळालं. तू सार्‍या जगावर रागेजलास. जळालेल्या एकेका काटकीसाठी सूड घेत राहीलास परत परत. जळत राहिलास आतल्या आत. जाळत राहिलास पुन्हा पुन्हा. एकवीस वेळा.

त्या वणव्याचा सूड तर कधीचाच संपला होता घेऊन पण तरी ती आग काही शमत नव्हती. रागाचा भडका उडतच होता आणि परत एकदा त्याचा स्फोट झाला. इतका जिवापाड जपलेला तो शिवांश, तो काय पोरखेळ आहे की खेळायला घ्यावं अन मोडावं. तू परत एकदा विनाश यज्ञाचे आवर्तन आरंभायला सज्ज झालास.

पण तो शाम वर्ण, ते करुणामय डोळे...
काय जादू केली त्याने कोण जाणे? सगळा अंगार शमला. धग शीतल झाली. राखेचा जणू चंदन लेप बनला.
मागे उरलं फक्त त्या एका घावाचं दुःख! सगळ्या संहाराला पुरून उरलेलं दुःख! ते विनाशानं उद्ध्वस्त होणारं नव्हतं, ते अनुतापानं विरघळणारंही नव्हतं. एकच मार्ग होता- सृजनाचा. आणि तू सगळं सोडून इथे आलास या वैराण भूमीत.

हे द्विजरामा, आता थांबू नकोस.
हा सह्याद्री तुझ्या पाठीशी आहे आणि अख्खा समुद्र त्याच्या फेसाळत्या लाटांनी तुझ्या स्वागताच्या गर्जना करतो आहे. आता मागे वळून पाहणे नाही. थकायला उसंत नाही. हे आभाळभर दुःख या भूमीला वहायचं आहे. आता मुक्तीचा हाच एक मार्ग!

जुनाट काळे कुरतडलेले
खुशाल आलो घरटे मोडुन
धुरकट दुबळे चिंधीचिरगुट,
गडवी- मडकी आलो सोडुन

दृष्टीपुढती अभिनव सृष्टी
उधळी मोती अथांग सागर
इंद्रधनूने महिरपलेले
गगन नव्या स्वप्नांचे आगर

भिती कशाला काळोखाची
मनी जागते नित्य ऊषा
खुणवी तारे खुलवी वारे
दाखवी रवी नित् नवी दिशा

धरेस सीमा क्षितिजाची पण
आकाशाला नाही कुंपण
तमा कशाची तन मन माझे
निळ्या निळाईसाठी अर्पण

पोलादाच्या आकांक्षांना
एकच सलते शल्य बोचरे
पंखावरुनी हात फिरविण्या
माझे नाही कुणीच दुसरे

Friday, May 08, 2009

चल तर जाऊ

हे कृष्णसखे,
आवर गं आवर तुझे अश्रू. यमुनेला पूर कसा अनावर झालाय बघ. वासरं अगदी कासावीस झालीत. आयांच्या मानेखाली तोंड खुपसून भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत. हा पूर आवरायला तो नाही गं इथे कुठे. एका करंगळीवर अख्खा दुःखाचा डोंगर लीलया पेलणारा तो नाही येणार आता. बेईमान, आता कसा डोंगरायेवढं दुःख तुझ्या पदराशी बांधून गेलाय. तू तर कधी कुंतीसारखं दुःख मागितलं नव्हतंस! किंबहुना तू तर कधी काही मागितलंच नव्हतंस. मागणारा तो होता, हट्ट करणारा तो होता, झाकून दडवून ठेवलेलं चोरून नेणारा तो होता आणि लाडीगोडीनं बळजोरी करणाराही तोच होता. तू फक्त कायम होकार भरत राहिलीस. अगदी जेव्हा तो जाण्यासाठी निघाला तेव्हासुद्धा तू मुक्यानेच फक्त हो म्हणालीस. तुला खात्री होती की जर तू म्हणाली असतीस," कान्हा, नको रे जाऊस" तर तो गेला नसता. खरंच?

तो यशोदेचा पोर त्या वेळूच्या बनातून त्याला घरी पोचवताना काही पावलांत बाल्य ओलांडून तरूण झाला. तो कदंब साक्षी आहे. त्या बासरीनं जणू गारुड केलं होतं आसमंतावर. तो अशोक बहरला फुलांनी तशी मालती अजूनच बिलगली त्याला. यमुनेच्या डोहावर सारंग पक्षाचं एक जोडपं उतरलं होतं ते उगच एकमेकांवर पाणी उडवत होते. किती युगांचं अंतर गेलं मधे कोण जाणे.

अजूनही पाण्यावरून येताना, करवंदामागून खडा मारल्यासारखा त्याचा प्रश्न येईल, "चल, येतेस?"
पण तुझा निश्चय मात्र पक्का आहे यावेळी.
आता काही तू हो म्हणायची नाहीस. खरंच ना?
राधे!!

चल तर जाऊ-
पण, नको जिन्यावर, नको गच्चीवर
आम्रतरूंच्या घनरानातील, बकुळफुलांची अस्फुटलेली
शय्या कधीची झुरते आहे
मुरलीची धुन विरते आहे
आठवणीने आठवणींचे मोरपीस ते ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नकोच दिवसा, नकोच रात्री
अंधाराला उसवत फसवत, आकाशाची रेशीम छत्री
फुले चमकती वेचुन गेली
धुके गुलाबी वरती खाली
आठवणीने अबोलकीशी चंद्रकोर ती ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नको बोलणे, नको अबोला
चित्तचोरटी नेत्रपल्लवी, सलज्ज हळवे सजल इशारे
कवितेच्या विस्मरल्या ओळी
दोन आसवे शापित भोळी
आठवणीने भैरवीतले सूर अभोगी ठेव बरोबर

Thursday, April 23, 2009

व्हाग आनि मानूस (V)

मित्रांनो तुम्ही वर नावाच्या पुढील कंसात दिलेला उलटा डोंगर वाचला ना नीट? म्हणजे मग नंतर म्हणायचं नाही आम्ही सांगितलं नाही म्हणून. ज्याना कळलं नसेल त्यांच्यासाठी त्याचा अर्थ इथे देतो आहे. आमच्या गच्चीच्या कठड्यापेक्षा कमी उंची असलेल्यांना काही सिनेमे बघू देत नाहीत असे नीरूदादा म्हणाला. त्यांच्या वर A असा सुलटा डोंगर काढलेला असतो म्हणे. तर आमच्या गच्चीच्या कठड्याहून लहान असलेल्यांसाठी ही गोष्ट आहे म्हणून कंसात उलटा डोंगर म्हणजे दरी काढली आहे. आता त्यात मधे आडवी रेघ दिलेली नाही कारण डोंगर मधे कापता येतो पण दरी कशी कापणार? तर फक्त लहान मुलांनी वाचायची ही गोष्ट आहे. पण आईनं, ताईनं आणि प्रज्ञाताईंनी वाचली तरी चालेल. बाबांनी वाचली तरी चालेल पण त्यांना कळायची नाही.

ही गोष्ट माझ्या आयडीयातली आहे त्यामुळे गोष्टीमधे मी नाहीये तर आमच्या सखूमावशींचा मुलगा दिगू आहे. पण बर्‍याच लोकांना दिगू माहीत नसल्यामुळे मी गोष्टीत त्याचं नाव बदललं आहे. मी त्याला हे सांगितलं तर त्यालाही पटलं, तो रागावला नाही. दिगू चांगला आहे. त्यानी मला तीन छोटे मासे ओढ्यातून पकडून आणून दिले होते ते मी चार दिवस ताईच्या जून्या वॉटरबॅग मधे पाळले होते. पण एक दिवस तिला कळलं तशी ती झुरळ दिसल्यासारखी किंचाळली आणि घाणेरडा म्हणून मला जोरात धपाटा घातला. मला लागलं नव्हतं पण मी जोरात रडायला लागलो. मी रडायला लागलो की आई ताईला ओरडते म्हणून मग ताईने आईला न सांगण्याचं कबूल केलं तसं मी रडायचा थांबलो. मग मी दिगूबरोबर ते मासे परत ओढ्यात सोडायला गेलो. तिथे खूपच घाण वास येत होता. दिगू म्हणाला त्यांच्या घरामागूनच हा ओढा जातो त्यामुळे त्याला या वासाची सवय झालीय. शी! आमच्या घरामागूनही हा ओढा जायला हवा होता म्हणजे मग मलाही सवय झाली असती मग मला अजीबात घाण वाटली नसती आणि मग मला ओढ्यातच मासे पाळता आले असते. तेवढ्यात दिगूनं तिथलं एक पान चुरगाळलं आणि माझ्या नाकाला घासलं त्याला खूपच छान वास येत होता भेंडीच्या भाजीसारखा. मग आम्ही ओढ्यात उतरलो. माझा एक पाय चुकून अर्धा गुडघ्यापर्यंत चिखलात बुडला. मला तर खूप मजा आली. अगदी आजोबांचं कैलासजीवन लावल्यासारखं वाटलं. मला आजोबांची आठवण झाली. आई म्हणाली आता ते देवाघरी गेले. जाताना बहुतेक कैलासजीवनही घेऊन गेले असावेत. आता ते घरात कुठेच दिसत नाही.

आम्ही परत येताना जोश्यांच्या हौदावर पाय धुतले. मला तर चिखलात खेळावस वाटत होतं पण दिगू म्हणाला "आय मारल". सखुमावशी कधी कधी दिगूला काठीनं मारते. पण माझ्याशी ती चांगली आहे. ती मला शीदार्त म्हणते. माझं नाव तेच असायला हवं होतं. मला जोडाक्षरं आवडत नाहीत. ती अवघड असतात. पण मी शीदार्त म्हणलं तर आई चिडते. ती मला वाघाला व्हाग पण म्हणू देत नाही आणि हो आणि ला आनि म्हणलेलंही तिला चालत नाही. कधी कधी आमची आई क्रूरपणा करते. पण ती मला कधी काठीनं मारत नाही. आणि ती फोडणीची पोळी खूप छान करते.

तर मग मी ठरवलं की आपण दिगूवर गोष्ट लिहायची. आणि नाव पण ठरवलं गोष्टीचं- व्हाग आनि मानूस. आता जेवण झाल्यावर मी गोष्ट लिहायला बसणार आहे. अय्या! आज आईनं मस्त कढी बनवली आहे. अय्या म्हणलं की मला बाबा रागावतात. पण ताईनं म्हणलेलं चालतं त्यांना. मी लहान आहे म्हणून सगळेच माझ्याशी असं वागतात.

Monday, March 23, 2009

मला भेटलेला कार्व्हर

दोन दिवसांपूर्वी आमच्या इथे एक व्याख्यान झाले. विषय, वक्ता, भाषण तिन्ही गोष्टी प्रभावी होत्या. काही "साधीसुधी" असामान्य माणस सहजपणे भेटतात तसा काहीसा अनुभव होता.
त्या व्यक्तीची अधिक माहिती इंटरनेट वर मिळेलच. http://en.wikipedia.org/wiki/John_Francis_(environmentalist)
त्याचं काहीसं भाषणही उपलब्ध आहेच.
http://www.youtube.com/watch?v=NlYJQ0psZYA
त्यामुळे जास्त तपशिलात न शिरता. जसं ते माझ्यापर्यंत पोचलं तसं ते इतरांपर्यंत पोचविण्याचा हा क्षीण प्रयत्न.
****************
मला भेटलेला कार्व्हर

वीणा गवाणकरांच्या "एक होता कार्व्हर" मधला कार्व्हर आज भेटला. कुठलेही पुस्तक, मग ते काल्पनिक असो अथवा चरित्रात्मक, त्यातील कथाव्यक्तींना (हिंदीमधे किती छान शब्द आहे- किरदार. मराठीतपात्रम्हणताना ती मजा येत नाही) एकेक चेहरा आपसूकच बहाल केला जातो. आपल्या आठवणीतले चेहरे, कधी ओळखीचे चेहरे एखाद्या गोष्टीत अगदी चपखल बसतात.पण कधी असं होतं की एखादी गोष्ट चेहर्‍याविना तशीच राहिलेली असते. एखाद दिवशी कोणीतरी भेटतं आणि त्या गोष्टीतला चेहरा आपल्याला मिळतो. तस्सचं आज त्याला पाहिलं
आणि मला माझा कार्व्हर मिळाला. तो कदाचित बहुपैलू शास्त्रज्ञ नसेलही पण आपला बहुताल बदलण्यासाठी कुठलाही गाजावाजा करता एका विशिष्ट ध्येयानी प्रेरित होऊन आपले काम करत राहण्यातली सहजता मात्र तीच.

हातात घेतलेलं बॅंजो वाजवत वाजवत तो व्यासपीठाच्या तीन पायर्‍या चढला तेव्हाच त्यानी ते जिंकलेलं होतं. त्या कलंदर वाद्याच्या तारांवर काही मुक्तछंद सुरावटी अगदी सहजतेनं छेडून त्याने ते बाजूला खुर्चीवर ठेवून दिलं.
मग एक दिलखुलास स्मितहास्य....
त्या अनवट सुरांनी सभागृहभर ओसंडू पहाणारं चैतन्य त्या प्रेमळ स्मितहास्यानं सैलावलं आणि आरामखुर्चीत विसावल्यासारखं ज्या त्या खुर्चीत स्थिरावलं. काही काळ तिथे शब्दांना जाग नव्हती. नंतर तो बोलला. ते वाक्य जे तो सतरा वर्षाच्या मौनानंतर बोलला होता.
"धन्यवाद! आपण इथे आलात त्याबद्दल."
आज तो माझ्यासारख्या दोनशे लोकांनी भरलेल्या सभागृहासमोर बोलत होता. गांधीजयंती (ची सुट्टी) साजरी करणार्‍या, त्या दिवसाची खरेदी तरी श्रद्धेनी एमजी रोड वरच करणार्‍या, थेटरात जाऊन आदराने मुन्नाभाई पाहणार्‍या, ड्राय डे च्या त्यागावर गांधींच्या पुतळ्याला हार चढवणार्‍या लोकांसमोर तो बोलत होता. तो मात्र भारावला होता कारण तो मौन आणि पदयात्रा यांच्या जोरावर सत्याचा आग्रह धरणार्‍या गांधींच्या देशात बोलत होता.

पण जेव्हा अठरा वर्षांपूर्वी त्यानी मौन सोडलं तेव्हा त्याच्या समोर त्याची म्हातारी आई, वडील आणि काही जवळचे नातेवाईक होते. तो बोलला तेव्हा आपलं नुकतं रांगायला लागलेलं मूल प्रथमच बोलायचा प्रयत्न करतं तेव्हा त्याच्या आईची जी स्थिती होते तशीच काहीशी प्रतिक्रिया त्याच्या माऊलीची झाली. ती गहिवरून एकदम ओरडली- अहो बघा, बघा जॉन बोलतोय!
जॉन तर एक संपूर्ण वाक्य एका दमात म्हणाला होता.
"धन्यवाद! आपण इथे आलात त्याबद्दल."
त्यानी मागे वळून बघितलं. त्याला क्षणभर कळलंच नाही की हा आवाज कोणाचा. मग आपलाच आवाज ओळखून त्याचं त्यालाच हसू आलं. त्याला हसताना बघून वडील म्हणाले, "तरी मी म्हणलं नव्हतं याचं डोकं अजून ताळ्यावर नाहीये म्हणून" तरी ते खूपच खूश होते. जॉननी त्यांची दोनापैकी एक तरी इच्छा पूर्ण केली होती. जॉननी जे दोन निश्चय केले होते ते त्यानी सोडावेत याच दोन इच्छा त्याच्या वडिलांनी धरलेल्या होत्या. त्या दोनीही जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जॉन काही कामाचा नाही ही त्यांची पक्की खात्री होती. तो आज सतरा वर्षांनी बोलत होता पण अजूनही शारीरिक श्रमाखेरीज इतर कुठल्याही इंधनावर चालणार्‍या गाडीत बसायला तो तयार नव्हता.

भारताची औद्योगिक राजधानी म्हणवणार्‍या एका अवाढव्य शहरात, संध्याकाळची वेळ, मोटारींचा प्रचंड लोंढा अतिशय संथ गतीने रस्त्यावरून वहात होता. प्रत्येक गाडी आपल्या भोवती एक धूम्रवलय विणत होती. शहरातील प्रदूषण संवर्धनाच्या उदात्त कार्यात आपापला हातभार लावत होती. त्यातच एका गाडीत खिडकीतून त्या धुराकडे एकटक बघत जॉन शांतपणे बसला होता. अशाच मोटारीतून हिंडणार्‍या लोकांसमोर आज त्याला बोलायचं होतं.
बावीस वर्ष जे तो अमेरीकेत पायी फिरला त्या बद्दल बोलायचं होतं. खर तर उशीरच झाला होता पण आज तो गाडीत होता. धुराचा एक गुदमरून टाकणारा वास सगळीकडे पसरला होता.

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या गोल्डन ब्रिजजवळ दोन तेलवाहू जहाजांची धडक झाली होती.(१९ जानेवारी, १९७१) त्यात लागलेल्या आगीत ते तेल बराच वेळ जळत होतं. त्याचा धूर आकाशभर झाला होता. जॉन गाडीत बसला होता, शेजारी त्याची मैत्रीण. दोघं जवळच्याच एका गावातले. नक्की काय झालंय बघायला निघालेले. बराच खटाटोप करून शेवटी ते अस्वस्थ करणारं दृश्य त्यांना बघायला मिळालं.धुराचा एक गुदमरून टाकणारा वास सगळीकडे पसरला होता आणि पाण्यात दूरपर्यंत पसरलेला तो तेलाचा काळा तवंग. काठाला पक्षांची आणि माशांची गोठलेली प्रेतं. परतताना तो तिला म्हणाला,
"आपण काहीतरी करायला पाहिजे."

"काहीतरी म्हणजे काय?"
"काहीतरी म्हणजे..... उदाहरणार्थ गाडी सोडून देऊन पायी फिरणे"
"हे बघ जॉन, जर एखादा श्रीमंत माणूस पायी चालायला लागला तर लोक म्हणतील त्याचा नक्कीच उदात्त हेतू असणार. पण तुझ्या माझ्या सारखे लोक तसे करतील तर आपल्या दरिद्रीपणाची फक्त कीवच केली जाईल."
ती म्हणाली ते अगदीच खरं होतं. तो फक्त एक हिप्पी होता. एक काळा हिप्पी.

होणार्‍या उशिरामुळे इकडे संयोजकांनी समयसूचकतेने चहाची व्यवस्था केली. चहाच्या निमंत्रणाबरोबरच कार्यक्रमाला थोडा उशीर होईल अशी घोषणा करण्यात आली. वाहतुकीची कोंडी हे कारण सगळ्यांनी न सांगताच ओळखलेलं होतं. चहाच्या घोटाघोटाला मुंबईतील रहदारी यावरील चर्चेलाही रंग चढत होता. चहाच्या प्रत्येक कपाचं प्लॅस्टीक तापलं होतं. कपातल्या कपात कर्कश्य चरचरत होतं. काहींचे चहा संपले तर काहींच्या चर्चा आणि मग कपांचा कचरा झाला. कदाचित प्रत्येक कप रीसायकल होणार होता... परत परत. आणि परत परत. एका स्वरूपातून दुसर्‍या स्वरूपात... भौतिकशास्त्रातल्या ऊर्जेसारखा. अखेरीस अमरत्वाचा शाप भोगत... कोडग्यासारखं... इकडे तिकडे... असून नसल्यासारखं! हे थांबायचं कधी?
गर्दीतला एक जण, ज्याला चहानंतर सिगरेट लागते, नाकातून गंभीरपणे धूर सोडत म्हणाला, "कोणीतरी सुरूवात करायलाच लागते"

"सुरवात तर करायलाच हवी" जॉननी स्वतःशीच ठरवलं आणि तो घरातून बाहेर पडला. तेव्हा तो सव्वीस वर्षाचा होता. बायकोनी त्याला सांगितले की तिला काही असले जमायचे नाही. तो एकटाच निघाला. पुरेसं शिक्षण नाही, पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, काळेपणाच्या खोलवर रूतलेल्या धडधडीत सत्याखेरीज कुठलेही अस्तित्व नाही.
करायचे
काय?
कुणी गमतीत म्हणले, " जॉन, तुला काहीतरी करायचंय ना? मग पूर्वेकडे तोंड कर आणि चालायला लाग. आणि हो, थोबाड बंद ठेवायला विसरू नकोस."
पाठीवर संसार बाधून जॉन खरंच निघाला. वाटेतून त्याने आईवडिलांना फोन केला आणि त्याच्या पदयात्रेची कल्पना दिली. पर्यावरण हा शब्दही ऐकलेल्या आपल्या आईवडिलांना समाधानकारक असं कारण मात्र त्याला देता येईना.
यावर तो फक्त म्हणाला, "आई, मी आनंदात आहे"

परिणाम इतकाच झाला की आया जसं काहीतरी नेहमी आईछाप बोलतात तसं त्याची आई म्हणाली,
"तू खरचं आनंदात असतास तर तसं म्हणाला नसतास"
आणि
वडील बरच काही शहाणपणाचं बोलले जे चालण्याचं वेड घेतलेल्या जॉनच्या काहीच कामाचं नव्हतं. मात्र त्यानी एक ठरवलं- आधी आपलं शिक्षण पूर्ण करायचं.
तो चालत चालत एका शाळेत येऊन पोचला.

जॉन पोचला तसे सभागृहाबाहेर रेंगाळणारे लोकही आत येऊन बसले. सभागृह अगदी तुडुंब भरून गेलं होतं. जॉनचा परिचय म्हणून एक छोटीशी चित्रफीत दाखवण्यात आली. ज्यात परिचयापेक्षा जाहिरातच अधिक होती. पण त्यामुळे उत्सुकता अजूनच वाढली. कौशल्याने विणलेल्या साडीतील एक विदुषी जॉनच्या स्वागतपर बरच काही बोलली.

बोलण्यातच आपला बराचसा वेळ जातोय हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. आपल्या चालण्याचं समर्थन करण्यातच तो दमून जाई. म्हणून एका वाढदिवसाला त्यानी ठरवलं की आजच्या दिवस तरी मौन पाळायचं. त्या दिवशी त्याला कळलं की आज पर्यंत आपण कधी नीट ऐकतच नव्हतो. समोरचा बोलायच्या आधीच आपण वाक्याची जुळवाजुळव करायला लागतो केवळ हे दाखवण्यासाठी की आपण समोरच्यापेक्षा किती हुशार आहोत. मग तो एका दिवसाचा निश्चय पुढे सतरा वर्षे टिकला. जसे त्यानी ठरवले की आता आपण बोलायचे नाही. त्यानी आईला तशी चिठ्ठी लिहीली. उलट तार आली की तुझे वडील तुझ्याकडे यायला विमानात बसले आहेत. अर्थात कोणाच्या समजावण्याचा काही परिणाम झाला नाही आणि जॉन ने आपला हट्ट कायम ठेवला. तो वडिलांना म्हणाला मी चालत तुम्हाला भेटायला येतो. याला रस्त्यातच काहीतरी होणार आणि आपला मुलगा आता काही आपल्याला परत दिसणार नाही म्हणून आईने गळा काढला.
वडील
म्हणाले, "इकडे यायच्या फंदात पडू नकोस. आम्हाला इथे लोक ओळखतात. इथे तुझे असले चाळे चालायचे नाहीत"
तोपर्यंत त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालेलं होतं. दक्षिण ओरेगॉन विश्वविद्यालयातून त्याने पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अर्थात हे सगळे मौन पाळून. आता त्याला वेध लागले होते उच्चशिक्षणाचे.
तो लवकरच मजल दरमजल करत वॉशिंग्टनला पोचला. तिथे राहून पुढच्या समुद्रप्रवासासाठी त्याने स्वतः एक नाव तयार केली. हे काम करता करता मोंटाना विश्वविद्यालयात पर्यावरण विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मी येऊ इच्छितो असे पत्र त्याने संबंधित अधिकार्‍यांना धाडले होते. त्यावर त्यांचे प्रोत्साहन देणारे उत्तरही आले. त्यात त्यांनी विचारले की या अभ्यासक्रमासाठी कधीपर्यंत यायचा त्याचा मानस आहे. यावर त्याने कळवलं,
"उद्या इथून निघत आहे. बोट वल्हवत आणि चालत तिथे पोचायला साधारण दोन वर्ष लागतील."
आणि मग त्याची सुरस चमत्कारिक सफर चालू झाली.

"तुमच्या प्रवासात तुम्हाला कधी वाईट अनुभव नाही का आले?" एका चुणचुणीत मुलाने जॉनला विचारले. सतरा वर्षे मौनांची खुणांमधे जी भाषांतरे करण्याची त्याला सवय लागली होती. ती अजूनही तशीच होती. जरी आता तो बोलत असला तरी सोबत त्याचे हातवारे चालूच होते. नुसतेच हातवारे नाहीत तर सर्वांगाने त्याचा अभिनय चालू होता.
"वाईट अनुभवही आले. कदाचित संख्येने जास्त वाईट अनुभव आले. पण जे चांगले अनुभव आले ते हिमालयाएवढे (आल्प्सएवढे) भव्य होते त्यापुढे वाईट अनुभव फारच खुजे वाटतात. त्यामुळे मागे वळून
बघताना फक्त चांगले अनुभवच दिसतात. जसे की मोंटाना मधला अनुभव."

दोन वर्षे संपता संपता बोलल्याप्रमाणे तो मोंटाना विश्वविद्यालयात जाऊन त्या प्राध्यापकांसमोर उभा ठाकला. काही सांगताच याच्या अवताराकडे पाहून त्यांनी ताडलं की हाच तो जॉन. ते लगबगीनं म्हणाले बरं झालं आलास आज नोंदणी करायचा शेवटचा दिवस आहे. उद्या आला असतास तर अजून एक सत्र वाया गेलं असतं तुझं. ताबडतोब जाऊन प्रवेश घे. मग त्याने त्याची आवडती खूण केली. खिशातून आतलं अस्तर बाहेर काढलं आणि अर्थिक असहायता व्यक्त केली. ते म्हणाले "त्याचं बघू कसं करायचं ते. आधी हे दीडशे डॉलर घे आणि एका विषयासाठी तुझं नाव नोंदव. म्हणजे मग इथला विद्यार्थी म्हणून तुला इथली विभागाची किल्ली मिळेल आणि ग्रंथालयाचा वापरही तुला करता येईल. आपण बाकी प्राध्यापकांशी बोलू. तू त्यांच्या वर्गात बसायला सुरूवात कर. ते तुझे क्रेडिट्स बाजूला राखून ठेवतील. जसजशी पैशाची सोय होईल तसतसे आपण ते तुझ्या नावावर करून घेऊ" हे असं होऊ शकतं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

असं इथेही होऊ शकतं का?
त्यानी समोर बसलेल्या काही प्राध्यापकांकडे बघत विचारलं. त्याच्या चेहर्‍यावर अजूनही तिच कृतज्ञता उमटलेली दिसत होती. पुढची काही वाक्य तो भरभरून बोलला त्याच्या मास्टर्सबद्दल. एकदम थांबून म्हणाला," माझ्या पदवीदान समारंभास माझे वडील आले होते मुद्दामून. मला म्हणाले की त्यांना दोघांनाही माझा खूप अभिमान वाटतो. पण या शिक्षणाचा काय उपयोग? तू तर गाडी चालवत नाहीस आणि हे न बोलणं तर चालूच आहे. थोडक्यात काय तर मी अजूनही काही कामाचा नव्हतो!"

काम करणं तर भागच होतं त्याखेरीज पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. तो एका छापखान्यात काम करू लागला. ते काम शिकताना त्याच्या लक्षात आलं की या छोट्या गावात शहरातली वृत्तपत्रं तर येतात पण त्यात या गावातल्या बातम्या नसतात. त्यानी तिथल्या स्थानिक लोकांसाठी एक पत्रिका चालू केली ज्यात आजूबाजूच्या घडणार्‍या घटना आणि तिथल्या लोकांना समर्पक अशा बातम्या येऊ लागल्या. पण त्याला इथे थांबायचं नव्हतं. त्या जळक्या तेलाचा वास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेरीस पी एच डी साठी तो University of Wisconsin-Madison येथे येऊन पोचला. १९७१ मधे समुद्रामधे झालेल्या तेलगळतीचे पर्यावरणावरील परिणाम या विषयावर त्याने काम सुरू केलं. त्याला कुणीतरी सुचवलं- अरे अशा विषयावर काम केलंस तर तुला नोकरी कशी मिळणार? यावर तो काहीच बोलला नाही. अशा काही वेळी त्याच मौन फार कामास येई. खाणाखुणा आणि लिखाण यावर त्याने त्याची PhD पूर्ण केली.

२४ मार्च १९८९, अलास्का येथे आजपर्यंत मनुष्याप्राण्याकडून निसर्गाची सर्वात जास्त हानीकारक अशी घटना घडली. अमेरीकेचे एक तेलवाहू जहाज फुटले आणि ते तेल समुद्रात पसरले. थोडाथोडका नाही तर तब्बल ११,००० चौरस मैल एवढा परिसर त्याने व्यापला. बाकी रहात्या जगापासून हे फार दूरवर घडत असल्यामुळे त्याचे गांभीर्य सर्वसामान्यांना फारसे जाणवले नाही. पण जगभरातील पर्यावरणवादी मात्र अतिशय अस्वस्थ झाले. त्यावेळेस जगभरात फक्त एकच विद्यार्थी या विषयामधे संशोधन करत होता- जॉन फ्रान्सिस. त्याला फोन आला.
फोनवर एका शासकीय अधिकार्याची सहायिका बोलत होती. तिला सांगण्यात आलं की नाही तो फोनवर नाही येऊ शकत कारण तो बोलत नाही. "मग त्याला ताबडतोब इकडे पाठवून द्या. आम्ही उद्याच्या विमानाचं तिकीट पाठवतो."
"नाही तो विमान प्रवास करत नाही"
"ट्रेनचं पाठवतो"
"नाही तो कुठलंही वाहन वापरत नाही"
"मी परत फोन करते"
त्याच्या मनात आलं- चला ही तर संधी गेली.
पण तिचा परत फोन आला. "लगेच चालत नीघ. आम्ही वाट बघतो."
इथून अमेरिकेच्या पर्यावरण आणि तेलगळती या संबंधीच्या कायदेविषयक योगदानामधे त्याचा सक्रीय सहभागाला सुरूवात झाली. पीएचडी पूर्ण करून तो वॉशिंग्टन डीसी ला कामावर रूजू झाला. तिथेही तो सायकलचाच वापर करत असे. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण समितीचा तो सभासद झाला. तरी त्याचे वडील त्याला म्हाणाले, "जॉन, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. पण जोवर तू गाडी चालवत नाहीस आणि बोलत नाहीस तोवर याचा काय उपयोग?" अखेरीस १९९० मधे त्यानी परत बोलायला सुरूवात केली. कारण इतके वर्ष ऐकून घेतल्यावर आता त्याच्या कडे बोलण्यासारखं खूप काही होतं.

त्याचं बोलणं संपलं. तसं टाळ्याचा कडकडाट झाला. बर्‍याच वेळ लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याची कहाणी ऐकून सगळेच भारावले होते. मलाही सतरा वर्ष न बोललेल्या जॉनचं भारी आश्चर्य वाटलं.
बावीस वर्ष पर्यावरणासाठी पायी फिरण्यासाठी भयंकर आदर वाटला आणि अशात पीएचडी करण्याच जाम कौतुक वाटलं. पण मला जॉन खरा भिडला जेव्हा व्हेनेझुएला-ब्राझीलच्या सीमेवर मनातलं वादळ शमल्यानंतर, बावीस वर्षाच्या पायपिटीनंतर शांतपणे बसला हात करून जो बसमधे बसला. ते सांगताना तो म्हणाला,
"गेली बावीस वर्ष पर्यावरणासाठी गाडी वापरणारा जॉन, ज्याला लोक ओळखत होते, ज्याला मी ओळखत होतो तो जर गाडी वापरायला लागला तर कसं चालेल? जॉन "जॉन" राहणारच नाही. त्याची ओळख बदलून जाईल. कदाचित नाहीशी होईल. मग उरलेला जॉन कसा असेल. त्याला लोक स्वीकारतील का? त्याहीपेक्षा त्याला आपण स्वीकारू का? असे अनेक प्रश्न मनात गोंगाट करत होते. मी केलेल्या निश्चयाचा माझ्यासाठीच एक तुरूंग बनला होता. माझ्या अनुभवाने, माझ्या शिक्षणाने माझ्यावर आलेली जबाबदारी ही फक्त माझ्यापुरती मर्यादित नव्हती.
मी या समाजाचे आणि पर्यायाने या पर्यावरणाचेही देणे लागत होतो. त्यासाठी सर्व मार्गांनी मी समाजापर्यंत पोचणं गरजेचं होतं. हा जॉन बदलायलाच हवा. आणि मी मागून आलेल्या बसला हात केला."

माणूस आणि निसर्ग यांना एकमेकांपासून वेगळं करणं अशक्य आहे. महत्वाचं हेच आहे की ते एकमेकांशी कसे वागतात. यावर सगळ भवितव्य अवलंबून आहे- इति जॉन.