Friday, September 25, 2009

The Champa Flower- I

समज मी सोनचाफ्याची कळी झाले
गंमत म्हणून,
आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर
लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्‍यावरती झोके घेत;
तर सांग ना आई, तू ओळखशील मला?

तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील,
’अगं चिऊ, कुठे गेलीस?’
आणि मी हासेन माझ्याशीच-
मनातल्या मनात, गालातल्या गालात

मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून
बघत राहीन तुला रांगोळी घालताना

आंघोळीनंतर ओले केस खांद्यावर तसेच घेऊन
तू चाफ्याच्या सावलीतून चालत तुळशी वृंदावनाशी पोचशील
चाफ्याचा ओळखीचा दरवळ तुझ्या गालाला चाटून जाईल
पण तुला माहीत नसेल की ती मीच आहे

दुपारी जेवणानंतर
तू खिडकीशी बसशील रामायण वाचायला
झाडाची जाळीदार सावली तुझ्या केसांमधून निसटून मांडीवर विसावेल
तेव्हा माझी इवलीशी सावली हात पुढे करून
तू वाचत असलेल्या पानावर मधे मधे करत राहील
तुला कळेल का तेव्हा की ही तुझ्याच फुलाची खोडी आहे!

आणि मग दिवेलागणीला
जेव्हा हातात कंदील घेऊन तू गोठ्याकडे जाशील
मी परत तुझं कोकरू होऊन खाली उडी मारेन
आणि घरात लपून बसेन
तू आत आल्या आल्या तुझ्याकडे गोष्टीचा हट्ट धरेन
"अगं लाडोबा, कुठे होतीस दिवसभर?" तू विचारशील
"आमची किनै गंमते" तू कित्ती विचारलंस तरी नाहीच सांगायचे मी ....

****
हा रवींद्रनाथांच्या एका कवितेचा स्वैर अनुवाद. स्वैर अशासाठी की त्यात मला वाटले तिथे काही बदल केले आहेत कवितेचं शीर्षक कायम ठेवलं आहे. ही कविता अनुवादीत करून झाली आणि त्यातून अजून काही कवितांना पालवी फुटली. पण एकाच ठिकाणी त्या लिहीण्याचा मोह टाळतो आहे. कारण एक धाग्यात गुंफलेल्या असल्या तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.

8 comments:

Nandan said...

सुरेख! बाकीच्या कवितांचीही वाट पाहतो.

Pramod said...

फारच सुन्दर! हे भाषांतराच्या पलिकडील आहे! पुढील कविता कधी?

Shubhangee said...

रविंद्र नाथंच्या या कवितेचे इंग्रजी भाषांतर मी वाचले होते, तसेच अशाच प्रकारच्या कवितेचे कुसुमाग्रजांनी केलेला अनुवादही वाचला आहे.तुझी कविताही तेवढीच सुंदर आहे.
शुभा मावशी

चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar said...

Robi Thakur and Indian Marathi Polysystem branches:a bakhtinian understanding of Prasad Bokil's Translations....असं काही लिहू का? हे जस्ट किडींग! मस्त आहे ओनुबाद!
ऍकदोम बांग्लार गॉन्धो आशे एरूम किछु....
निजेथेके निजेके हारिये निजेकेई पाई जेरूम किछु! (अगदी बांग्ला़चा गंध येतो असा काही...
स्वतःतून स्वतःला हरवून स्वतःलाच सापडतो जसा काही).

चिन्मॉय धारूरकर।

Saee said...

Awww!
So innocent! And so so so beautiful. I think you have done more than justice to the original one. :)
Cheers
Saee

Saee said...

And whats with all the Bengali in the comments! I am so jealous!!!

Samved said...

SUNDAR!! APratim....

Priya said...

surekh!