Friday, September 25, 2009

The Champa Flower- I

समज मी सोनचाफ्याची कळी झाले
गंमत म्हणून,
आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर
लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्‍यावरती झोके घेत;
तर सांग ना आई, तू ओळखशील मला?

तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील,
’अगं चिऊ, कुठे गेलीस?’
आणि मी हासेन माझ्याशीच-
मनातल्या मनात, गालातल्या गालात

मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून
बघत राहीन तुला रांगोळी घालताना

आंघोळीनंतर ओले केस खांद्यावर तसेच घेऊन
तू चाफ्याच्या सावलीतून चालत तुळशी वृंदावनाशी पोचशील
चाफ्याचा ओळखीचा दरवळ तुझ्या गालाला चाटून जाईल
पण तुला माहीत नसेल की ती मीच आहे

दुपारी जेवणानंतर
तू खिडकीशी बसशील रामायण वाचायला
झाडाची जाळीदार सावली तुझ्या केसांमधून निसटून मांडीवर विसावेल
तेव्हा माझी इवलीशी सावली हात पुढे करून
तू वाचत असलेल्या पानावर मधे मधे करत राहील
तुला कळेल का तेव्हा की ही तुझ्याच फुलाची खोडी आहे!

आणि मग दिवेलागणीला
जेव्हा हातात कंदील घेऊन तू गोठ्याकडे जाशील
मी परत तुझं कोकरू होऊन खाली उडी मारेन
आणि घरात लपून बसेन
तू आत आल्या आल्या तुझ्याकडे गोष्टीचा हट्ट धरेन
"अगं लाडोबा, कुठे होतीस दिवसभर?" तू विचारशील
"आमची किनै गंमते" तू कित्ती विचारलंस तरी नाहीच सांगायचे मी ....

****
हा रवींद्रनाथांच्या एका कवितेचा स्वैर अनुवाद. स्वैर अशासाठी की त्यात मला वाटले तिथे काही बदल केले आहेत कवितेचं शीर्षक कायम ठेवलं आहे. ही कविता अनुवादीत करून झाली आणि त्यातून अजून काही कवितांना पालवी फुटली. पण एकाच ठिकाणी त्या लिहीण्याचा मोह टाळतो आहे. कारण एक धाग्यात गुंफलेल्या असल्या तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.

Monday, September 14, 2009

रेघांमागून

केस पिंजारलेले ते दोघं चौघं (माड)
घाईनं आंघोळी उरकून घेतात
कुंपणाशी राखणीला बसलेली म्हातारी (भिंत)
हिरवं लुसलुशीत इरलं अंगभर ओढून घेते.
फाटकाशी पाठीत कुबड काढून ओणावलेला तो (प्राजक्त)
उभ्याउभ्याच आळस दिल्यासारखा करतो
ओल्या रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेली फुलवाली (कोरांटी)
आपली मळकट छत्री झटकते
...
पागोळ्य़ांतून मारलेल्या उभ्या रेघांमागून हे सगळं बघत
मी दारात उभा असतो
आणि
माझं मन एखाद्या वांड मुलासारखं
प्रत्येक थेंबात उड्या मारून पाणी उडवत राहतं
...
जेव्हा श्रावण माझ्या घरी पाहुणा म्हणून येतो.

Sunday, September 06, 2009

थेंब एक...

सखी,
आज सक्काळपासून पाऊस वस्तीला आलाय. आठवतं ना तो यावा म्हणून काही दिवसांपूर्वीच तर जोगवा घातला होता बयोनं. पण आता त्याचं येणं तस रोजचंच नसलं तरी नित्याचं झालंय. म्हणून काय सगळंच कौतुक संपावं? नाकं मुरडत जिथे तिथे काळ्या छत्र्यांचा निषेध! आपल्या दोघांची छत्री विसरायची सवय एकसारखीच. आता ’यामध्ये ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण?’ हे सांगणे कठीणच. तस आपलं काहीच सरळ सोप्पं नसतं.
बरं ते जाऊदे.

हं तर काय सांगत होतो? आठवलं!
तो पण अस्सा आहे ना की पसरून राहिलाय दिठीभरून, सुस्तावल्यासारखा. आपल्या विहिरीपासचा तो ’अवलीया’ आठवतोय? अगदी त्याच्यासारखाच निरीच्छ. ए पण मला अजूनही वाटतं की त्या नावात त्याचा तो हिरवटपणा येत नाही. त्याचं नाव ’गजारू’च असायला हवं होतं. पण आपल्या वादात कायम तूच जिंकतेस आणि तो तसाही निरीच्छच. अवलीया काय आणि गजारू काय? त्याला काहीच फरक पडणार नाहीये. तू गेल्यापासून तो अजूनच निरीच्छ वाटू लागलाय. त्याच्या एका बाजूच्या पारंब्या सुकून गेल्यात. यावेळी वसंतही अगदी कसनुसाच उतरला होता त्याच्यावर.एक शामा घरटं करू गेली होती त्याच्या आसर्‍याला पण अर्धवटच सोडलंन्‌. त्यानीच हिडीसफिडीस केलं असणार. बरं बरं, तुला त्याचा भारी पुळका!
नसेल केला तुसडेपणा पण जराशी आपुलकी तरी दाखवायची होती.

ते असो. तर मी काय बोलत होतो?
... हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आजकाल मी सलग एका विषयावर बोलूच शकत नाही.तू नसलीस तरी मीच फाटे फोडत राहतो माझ्याच विचारांना. तू जाताना सगळे प्रश्न इथेच सोडून गेलीस जणू माझ्या आजूबाजूला.

हं, पाऊस!
आमचं पूर्वीचं नातं खूप धसमुसळं होतं. तोही धबधबत राहायचा आणि मीही हुंदडत रहायचो. शीरूची सोबत होती. तो फक्त काही दिवसांचा होता तेव्हापासूनचा आमचा पावसाशी लळा. बांधावरनं चौखूर उधळायचो. माईचा जीव वरखाली व्हायचा. ती माजघरातल्या माजघरात आतबाहेर करत रहायची आणि त्याच वेगानं विठोबा तिच्या पायात पायात घोटाळत रहायचा. मग पावसाचा फारच जोर वाढला तर विठोबाला पेकाटात एक लाथ बसायची आणि मग ती भाऊला पिटाळायची आमच्या शोधार्थ. तो इरलं घेऊन आम्हाला शोधत यायचा. आम्ही मस्त आमच्यातच. तो बरोबर येऊन माझा कान आणि शीरूचं शेपूट पिरगाळायचा. मला फार वाटायचं आपल्यालाही शेपूट असायला हवी होती म्हणजे जरा कमी दुखलं असतं. म्हणजे तसा माझा अंदाज होता. कारण मी बेंबीच्या देठापासून बोंब मारायचो पण शीरू मात्र निमूट असायचा. अशी आमची वरात भर पावसात घराकडे परतायची. मग तोही गडगडाटी हसायचा आणि त्याचा जोर आवरता घ्यायचा. घरात आल्या आल्या शीरू मालीच्या पोटाखाली शिरायचा. तीही रवंथ थांबवून त्याला चाटायला लागायची.
माई माझं डोकं पुसताना म्हणायची," भाऊ, यालाही बांध रे दावणीला."
चुलीपाशी बसून गरम सुंठ घातलेलं दूध प्यायला लागायचं. माराची भरपाई म्हणून मग विठोबालाही इवलसं जास्तच मिळायचं.तो मिशीवरचा राग पुसत माझ्या मांडीशी येऊन बसायचा. मी त्याच्या शेपटीच्या गोंड्याकडे कौतुकाने बघत दूध संपवायचो. बाहेर दमलाभागला पाऊस ठिबकत रहायचा.

शीरू माझ्या आधीच मोठा झाला. औताला जुंपला गेला. त्याला मग पावसाचं तितकंसं राहिलं नाही. माझ्या गटातला एक गडी फितूर झाला. पाऊस जरा कमीच पडला त्या वर्षी.

त्यानंतरचा, माझा आणि पावसाचा आवडता प्रसंग म्हणजे आम्हांला दोघांनाही तू पहिल्यांदाच भेटलीस तेव्हाचा.
शाळेच्या शेवटच्या वर्षाला होतो मी. शाळेतनं घरी येत होतो. ’पावसाचा जोर ओसरेपर्यंत आम्ही येत नाही’ म्हणून बाकी दोस्त मागे राहिलेले. मी मात्र पावसाच्याच सोबतीनं वारं कानात गेल्यागत धावत निघालो. चावडीपासची चढण चढून आलो आणि घराकडे वळलो तर समोर चिखलात एक गाडी रूतलेली.गाडीवान आणि एक टक्कल पडलेले गृहस्थ ती ढकलण्याचा प्रयत्न करून राहिलेले. गाडीचा बैलही तसा बेताचाच होता. त्या तिघांच्याही ताकदीच्या पलीकडे ती गाडी अडकलेली होती.मला बघून त्यांच्या जिवात जीव आला. "ए पोरा, जरा हात लाव रं" असं तो गाडीवान ओरडला तसे ते कोटटोपीवाले गृहस्थ म्हणाले," अरे लहान आहे तो. बाळ, आमची गाडी अडकली आहे. जरा कोणा मोठ्याला बोलावशील तर बरं होईल बाबा." मी म्हणलं," आत्ता बोलावतो बघा." मी निघणार इतक्यात गाडीची ताडपत्री सारून एका पोरीनं उडी मारली खाली.
"मी पण येणार तुझ्य़ाबरोबर"
"मग चल की"
आणि मग गाडीतून येणार्‍या हाकांकडे सपशेल कानाडोळा करून आम्ही धूम ठोकली. चार पावलं गेलो असू अन्‌ ती रप्पकन चिखलात पडली. अगदी दंडवत घातला. मला वाटलं की च्यामायला आता ही भोकाड पसरणार. पण तू उभी राहिलीस आणि तुझ्या चिखलमाखल्या चेहर्‍यावर विश्वविजयाचा आनंद होता.
"चल की रे"
"पण तो चिखल"
"तो काय जाईल पावसाने वाहून"
तेव्हाच कळलं की आपली गट्टी जमणार. आणि मग दोन वांड चिंबभिजली पोरं सुसाट धावत सुटली फुलारलेल्या हादग्याच्या ताटव्यातून. पावसानंही वेग वाढवला. त्याला जणू सगळा चिखल धुवून काढायचा होता तुझ्या अबोली परकरावरचा. पावसापाण्याच्या खेळातला एक गडी वाढला.

नंतरचे काही पावसाळे कसे अगदी भुर्र्कन उडून गेले. मैत्र जुळत गेलं. अचानक पावसाने रंग बदलला. अचानक नसेलही कदाचित. पण अधिकच गहिरा होत गेला तुझ्या माझ्यासाठी. अनेक संदर्भ बदलत गेले.

पण तो असा कधी वागला नाही. याआधीचा पाऊस कधीच असा निरीच्छ नव्हता. असा उगचच कुढतखाऊ नव्हता आपला पाऊस. तू जाताना मी खूप लपवलं त्याला. नाही वाहू दिलं डोळ्यातून. तू तर सर्दीचा बहाणा करून सारखी डोळ्याला रूमाल लावत होतीस. तू जाताना आठवणीचा म्हणून एक थेंब घेऊन गेलीस. माझ्या सोबतीला उरला पाऊस इथेच ठेवलास. पण काहीतरी बिनसलंय गं त्याचं.एक थेंब हारवलाय त्याचा.

****

श्रावणाची हवा पावसाळी कुंद
आपल्यात धुंद थेंब एक

अत्तराची कुपी केवड्याचा गंध
दरवळ मंद थेंब एक

आठवांचा वसा पापणीत बंद
थोडा मुक्तछंद थेंब एक

चातकाला जडो पावसाचा छंद
उरो आत्मानंद थेंब एक

सरींवर सरी कोसळले नभ
कुठे शोधू सांग थेंब एक?

थेंबासाठी एका केला आटापिटा
गालावर तुझ्या सापडला...