Friday, September 24, 2010

माझे अक्षर प्रयोग

बरेच दिवस झाले काहीच लिहायला सवड नाही. काम खूप आहे ही सबब तितकीशी योग्य़ नाही पण काम आवडते आहे त्यामुळे सध्या त्यालाच प्राधान्य दिले जात असावे. मग आज मनात आलं की कामाबद्दलच का लिहू नये? आणि माझा जो काही प्रयोग सध्या चालू आहे त्याची इथे चर्चा करायला नक्कीच आवडेल.

थोडेसे प्रास्ताविक -
मी व्यवसायाने डिझाईनर (अभिकल्पक) आहे आणि सध्या IIT Bombay  मधे प्रा. शिल्पा रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करतो आहे. माझा विषय "डिझाईन मधे वापरले जाणारे मार्गदर्शक आराखडे (Grids in graphic design)" यांच्याशी संबंधित आहे. त्याबद्दल परत कधीतरी सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण आज मी आमचा एक प्रयोग इथे मांडतो आहे. अजून त्याच्यावर बरेच काम करायचे आहे पण निदान ती कल्पना मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन अशी आशा बाळगून सुरूवात करतो. शक्यतो संशोधनाची भाषा टाळून रोजच्या शब्दांमधे आणि तेही मराठीत लिहिणे हेच सगळ्यात मोठे आव्हान आहे.

माझे अक्षर प्रयोग
प्रयोगाची पार्श्वभूमी:
आपल्या भारताची वैभवशाली परंपरा, त्याचा इतिहास, इथून निघणारा सोन्याचा धूर ब्ला... ब्ला...
हे सगळे आपण वाचून ऐकून असालच. त्याबद्दल अभिमान बाळगत असाल किंवा त्याची चेष्टा करत असाल किंवा त्याबद्दल तटस्थ असाल. या पलिकडे त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही...
हीच समस्या कुठेतरी माझ्या संशोधनाच्या मुळाशी असावी. (’आहेच’ म्हटले तर सुरू होणारे आक्षेप आणि चर्चा पुढेच जाऊ देणार नाहीत म्हणून ही अनिश्चितता ) तर महत्त्वाचे हे की सगळी कृतिशून्य चर्चा बाजूला ठेऊन सक्रीय होणे. उपयोगवादाच्या पायावर उभे डिझाईन हे क्षेत्र (कृतिहीन) चर्चेला महत्व देत नाही असे नाही पण ते काम इतरांवर सोडून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हेच अधिक जिव्हाळ्याचे ठरते. असो.. तर परत मुद्द्यावर येऊ.
आपल्या पारंपारिक चित्रकला आणि मूर्तिकला या कलाक्षेत्रात लक्षणीय ठराव्यात अशा आहेत. पण आता त्याचा कुठे फारसा मागमूस नाही. त्यातील काही ज्ञानशृंखला इतस्तत: विखुरलेल्या आहेत. त्यातून माझ्या विषयाच्या संदर्भात जे काही थोडेफार मिळेल ते वेचून त्याचा आधुनिक काळात काही उपयोग आहे का, इतकाच मर्यादित प्रयत्न माझा आहे.

कला-इतिहास संशोधक आणि चित्रकार ऍलिस बोनर यांचे संशोधन माझ्या खूपच उपयोगाचे ठरले. पद्मभूषण पुरस्काराने विभूषित या विदुषी वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी भारतात येऊन स्थायिक झाल्या आणि त्यांनी कला-इतिहासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी इथल्या देवळातील भित्तिचित्र व मूर्ती यातून शोधून काढलेल्या (आकृतीत दाखवल्या प्रमाणे) कोनात्मक पंजर (angular grid) चा वापर अक्षरनिर्मितीसाठी करता येईल का यासाठीचा हा प्रयोग आहे.

भारतीय परंपरेमधे अक्षरनिर्मिती आणि रूपनिर्मिती  यामधे समधर्मता आहे. अक्षरांचे मनुष्यस्वरूप केलेले वर्णन आणि देवतांचे एकांक्षरी रूपकात्मक मंत्र यातूनच हे साधर्म्य आणि परस्पर रूपांतरण दिसून येते. पण तरीही हे angular grid अक्षरनिर्मितीमधे वापरणे इतके सहज साध्य नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे या सर्व प्रक्रियांमधे झालेला आमूलाग्र बदल. दुसरी गोष्ट अशी की नवीन काळाबरोबर न जाऊ शकणार्‍या कुठल्याही प्रयोगाचे फारसे भविष्य नाही. तर आपल्या समोरील तिहेरी कोडं असं- angular grid--font design--current technology.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक म्हणजे संगणक. अभिकल्पक्षेत्रात संगणकाच्या सहाय्याने अनेक गोष्टी अधिक प्रभावी आणि सुकर झाल्या आहेत. पण अक्षरनिर्मितीचा विचार केला तर तंत्रज्ञानाचा विकास हा रोमन लिपीसाठी मुख्यत्वेकरून झाला. भारतीय तंत्रज्ञांच्या मदतीने NCST (आताचे C-DAC) मधे भारतीय लिप्या संगणकावर आणण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्या आणि देशभरातील तशा अनेक प्रयत्नांतून आज आपण सगळे संगणकावर देवनागरी लिहितो, वाचतो आहोत. पण तरीही आपल्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत. जसे की जोडाक्षरांची संख्या आणि त्यांचे स्वरूप यात करावा लागलेला बदल. असो... हा एक मोठा विषय आहे. तो नंतर कधी तरी....

या प्रयोगासाठी संगणक शास्त्रज्ञ डोनाल्ड क्नूथ यांनी केलेले काम मार्गदर्शक ठरले. त्यांनी विकसित केलेले METAFONT (अधिक माहीतीसाठी वाचा: "Digital Typography", California : CSLI Publications, Stanford, 1999 ) ज्या तत्वावर आधारित आहे (’कुठल्याही अक्षराचा आकार गणिती भाषेमधे मांडता येऊ शकतो’) त्याचा उपयोग इथे अक्षरनिर्मितीसाठी केला आहे. परंतु क्नूथ यांचा प्रयोग हा मुळात अस्तित्वात असलेला font नवीन digital छपाई तंत्रज्ञानासाठी कसा रूपांतरित करता येईल यावर भर देणारा आहे. काही प्रयोगिक उदाहरणे वगळता नवीन font तयार करण्यासाठी त्याचा फारसा कोणी उपयोग केला नाही. इथे METAFONT चा वापर न करता फक्त त्याचे मूलतत्त्व  आमच्या प्रयोगामधे वापरले आहे. या प्रयोगामधे प्रत्येक अक्षराचा सांगाडा तयार करण्यात आला. त्यापासून निरनिराळे अक्षरसंच बनवणे शक्य होईल. उदाहरणार्थ जसे 3D ऍनिमेशन मधे सांगाडा बनवून त्यावर वेगवेगळी शरीरे चढवता येतात आणि त्याला विविध वेशभूषाही देता येतात. त्याप्रमाणे इथे एका सांगाड्यापासून विविध fonts बनवणे शक्य आहे. पण ते नंतर, त्यासाठी आधी सांगाडा तयार करणे आणि तो गणिती भाषेमधे आणणे हे गरजेचे आहे.

संगणकावर कुठलाही आकार तयार करण्यासाठी बेझियर पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे प्रत्येक रेषा ही काही बिंदू आणि त्या बिंदूपाशी होणारा स्पर्शिकेचा कोन यानी बांधलेली असते. आता इथे आकारनिर्मितीच्या कोनांशी असलेल्या संबंधाने आमचे लक्ष वेधून घेतले. वर उद्धृत केलेल्या कोनात्मक पंजराचा वापर करून अक्षराच्या रेखांकनातील प्रत्येक बिंदूची स्पर्शिका ही त्या कोनात्मक रेषेला समांतर ठेवून अक्षरनिर्मिती शक्य होते का? असा प्रश्न आमच्या समोर होता. आणि त्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले. खाली दिलेल्या आकृतीवरून थोडाफार अंदाज येऊ शकेल.
इथे ३०-१२० अशा कोनात्मक पंजराचा वापर केला आहे. वर दाखवलेला क्ष हा कशा प्रकारे बनला आहे हे त्याच्या बेझियर नियंत्रकांवरून समजू शकेल. त्याच्याच शेजारी त्याच्या सांगाड्यावर सारख्या जाडीचे आकारमान चढवल्यानंतर त्याला प्राप्त झालेले रूप दर्शविले आहे.
तसेच कोनात्मक पंजराचा कोन बदलल्याने अक्षरात होणारा बदल वरील आकृतीत दाखवलेला आहे. त्यात ३०-१२०, ४०-१२५ आणि ६०-१५० अशा तीन कोनांवर आधारीत क्ष मधील बदल दाखवलेला आहे.

यावर अजून बरेच काम होणे बाकी आहे. पण सद्यस्थितीत या तयार झालेल्या फॉण्टचा वापर करून केलेले लेखन पुढे देत आहे. त्यावरून रोजच्या वाचनासाठी या अक्षराची उपयुक्तता कितपत आहे याचा अंदाज बांधणे शक्य होईल.
(टीप: खाली दिलेले लेखन हे इमेज स्वरूपात आसल्याने त्याची स्पष्टता प्रत्यक्ष लेखनाइतकी असणार नाही )