सगळं सोडलंस म्हणतोस? अगदी सगळं?
प्रत्येक सूत, प्रत्येक धागा, प्रत्येक नातं, प्रत्येक प्रेम, प्रत्येक द्वेष... सगळं.
मग तो आत्ताचा उसासा......
सगळ्या जगाला माफ केलंस पण स्वतःला केलंस का मुक्त त्या एका अपराधातून? का म्हणूनच घेऊन आलास ते मातृत्वाचं स्वप्न कोणाच्या नकळत? मला माहीत आहे- हा सृजनाचा ध्यास त्याशिवायचा नाहीच मुळी.
नवीन जमीन कसतोयस. नवी सृष्टी स्थापतोयस. नवा कसा वसवतोयस. नव्यानं जगायचं म्हणतोयस- त्या एका अपराधाला कुशीला घेऊन. पेर, पेर ते दुःख प्रत्येक नव्या स्वप्नाच्या मुळाशी. ती तांबडी आई ’नाही’ नाई म्हणायची. सगळं पोटाशी घेईल आणि फक्त आनंद देईल भरभरून. आई अशीच असते रे! ती नाही राग ठेवायची मनात.
तू काय ओळखत नव्हतास तुझ्या आईला? पण कर्तव्य मोठं असतं असंच शिकलास तू. तिनंच तर शिकवलं होतं. त्या कर्तव्यापोटी तर घाव घातलास त्या कल्पद्रुमेवर आणि मग नंतरच्या एका वणव्यात सगळं घरटच जळालं. तू सार्या जगावर रागेजलास. जळालेल्या एकेका काटकीसाठी सूड घेत राहीलास परत परत. जळत राहिलास आतल्या आत. जाळत राहिलास पुन्हा पुन्हा. एकवीस वेळा.
त्या वणव्याचा सूड तर कधीचाच संपला होता घेऊन पण तरी ती आग काही शमत नव्हती. रागाचा भडका उडतच होता आणि परत एकदा त्याचा स्फोट झाला. इतका जिवापाड जपलेला तो शिवांश, तो काय पोरखेळ आहे की खेळायला घ्यावं अन मोडावं. तू परत एकदा विनाश यज्ञाचे आवर्तन आरंभायला सज्ज झालास.
पण तो शाम वर्ण, ते करुणामय डोळे...
काय जादू केली त्याने कोण जाणे? सगळा अंगार शमला. धग शीतल झाली. राखेचा जणू चंदन लेप बनला.
मागे उरलं फक्त त्या एका घावाचं दुःख! सगळ्या संहाराला पुरून उरलेलं दुःख! ते विनाशानं उद्ध्वस्त होणारं नव्हतं, ते अनुतापानं विरघळणारंही नव्हतं. एकच मार्ग होता- सृजनाचा. आणि तू सगळं सोडून इथे आलास या वैराण भूमीत.
हे द्विजरामा, आता थांबू नकोस.
हा सह्याद्री तुझ्या पाठीशी आहे आणि अख्खा समुद्र त्याच्या फेसाळत्या लाटांनी तुझ्या स्वागताच्या गर्जना करतो आहे. आता मागे वळून पाहणे नाही. थकायला उसंत नाही. हे आभाळभर दुःख या भूमीला वहायचं आहे. आता मुक्तीचा हाच एक मार्ग!
जुनाट काळे कुरतडलेले
खुशाल आलो घरटे मोडुन
धुरकट दुबळे चिंधीचिरगुट,
गडवी- मडकी आलो सोडुन
दृष्टीपुढती अभिनव सृष्टी
उधळी मोती अथांग सागर
इंद्रधनूने महिरपलेले
गगन नव्या स्वप्नांचे आगर
भिती कशाला काळोखाची
मनी जागते नित्य ऊषा
खुणवी तारे खुलवी वारे
दाखवी रवी नित् नवी दिशा
धरेस सीमा क्षितिजाची पण
आकाशाला नाही कुंपण
तमा कशाची तन मन माझे
निळ्या निळाईसाठी अर्पण
पोलादाच्या आकांक्षांना
एकच सलते शल्य बोचरे
पंखावरुनी हात फिरविण्या
माझे नाही कुणीच दुसरे
2 comments:
surekh!
काय लिहू? संह्याद्री लंघून आलेल्या परशुरामाला सृजनाला असे काही कारण असेल हे कसे सुचले रे?
वसलेले कोकण पाहून खरेच रेणुका प्रसन्न झाली असेल,केले असेल माफ तिने आपल्या लाडक्याला,
आई आहे ना ती, क्षमाशील असायलाच हवे ना तिला?
आई
Post a Comment