पाणीभरला घडा घेऊन बांधावरून जाताना
खरं सांग,
तुला बघून झुकलेला तो बाभूळ
तुला कधी दिसलाच नाही का ?
पाण्यावरून येताना तू दूरवर दिसलीस तसा
अंगभर नवी हळद लेऊन
तो एकटक बघत राहीला
तुला जवळ येताना.
झिम्मा खेळून, दंगा करून
घडाभरलं थोडं पाणी
हेंदकाळून तिच्या कानशिलावर उतरलं
अन चोळी भिजवत आत शिरलं
तो शहारला अंगभर
त्याच्या अंगावर काटा आला
वाऱ्यावर पोरांसारखा
सैरावैरा धावणारा तो पदर
अडकला वेंधळ्या काट्यामधे
तर अलगद सोडवताना त्या कट्यालाही जखम झाली
त्या पायदळी फुलांकरता
जखमी घायाळ काट्याकरता
तुझा सहानभूतीचा सुस्कारा....................
त्या वेड्याला कळलंच नाही
तो त्या नखभर फाटल्या पदरासाठी होता.
- प्रसाद
2 comments:
विलक्षण.
आणि 'आधारवेल' लवकर लिही !
exam time now!
Post a Comment