Thursday, April 23, 2009

व्हाग आनि मानूस (V)

मित्रांनो तुम्ही वर नावाच्या पुढील कंसात दिलेला उलटा डोंगर वाचला ना नीट? म्हणजे मग नंतर म्हणायचं नाही आम्ही सांगितलं नाही म्हणून. ज्याना कळलं नसेल त्यांच्यासाठी त्याचा अर्थ इथे देतो आहे. आमच्या गच्चीच्या कठड्यापेक्षा कमी उंची असलेल्यांना काही सिनेमे बघू देत नाहीत असे नीरूदादा म्हणाला. त्यांच्या वर A असा सुलटा डोंगर काढलेला असतो म्हणे. तर आमच्या गच्चीच्या कठड्याहून लहान असलेल्यांसाठी ही गोष्ट आहे म्हणून कंसात उलटा डोंगर म्हणजे दरी काढली आहे. आता त्यात मधे आडवी रेघ दिलेली नाही कारण डोंगर मधे कापता येतो पण दरी कशी कापणार? तर फक्त लहान मुलांनी वाचायची ही गोष्ट आहे. पण आईनं, ताईनं आणि प्रज्ञाताईंनी वाचली तरी चालेल. बाबांनी वाचली तरी चालेल पण त्यांना कळायची नाही.

ही गोष्ट माझ्या आयडीयातली आहे त्यामुळे गोष्टीमधे मी नाहीये तर आमच्या सखूमावशींचा मुलगा दिगू आहे. पण बर्‍याच लोकांना दिगू माहीत नसल्यामुळे मी गोष्टीत त्याचं नाव बदललं आहे. मी त्याला हे सांगितलं तर त्यालाही पटलं, तो रागावला नाही. दिगू चांगला आहे. त्यानी मला तीन छोटे मासे ओढ्यातून पकडून आणून दिले होते ते मी चार दिवस ताईच्या जून्या वॉटरबॅग मधे पाळले होते. पण एक दिवस तिला कळलं तशी ती झुरळ दिसल्यासारखी किंचाळली आणि घाणेरडा म्हणून मला जोरात धपाटा घातला. मला लागलं नव्हतं पण मी जोरात रडायला लागलो. मी रडायला लागलो की आई ताईला ओरडते म्हणून मग ताईने आईला न सांगण्याचं कबूल केलं तसं मी रडायचा थांबलो. मग मी दिगूबरोबर ते मासे परत ओढ्यात सोडायला गेलो. तिथे खूपच घाण वास येत होता. दिगू म्हणाला त्यांच्या घरामागूनच हा ओढा जातो त्यामुळे त्याला या वासाची सवय झालीय. शी! आमच्या घरामागूनही हा ओढा जायला हवा होता म्हणजे मग मलाही सवय झाली असती मग मला अजीबात घाण वाटली नसती आणि मग मला ओढ्यातच मासे पाळता आले असते. तेवढ्यात दिगूनं तिथलं एक पान चुरगाळलं आणि माझ्या नाकाला घासलं त्याला खूपच छान वास येत होता भेंडीच्या भाजीसारखा. मग आम्ही ओढ्यात उतरलो. माझा एक पाय चुकून अर्धा गुडघ्यापर्यंत चिखलात बुडला. मला तर खूप मजा आली. अगदी आजोबांचं कैलासजीवन लावल्यासारखं वाटलं. मला आजोबांची आठवण झाली. आई म्हणाली आता ते देवाघरी गेले. जाताना बहुतेक कैलासजीवनही घेऊन गेले असावेत. आता ते घरात कुठेच दिसत नाही.

आम्ही परत येताना जोश्यांच्या हौदावर पाय धुतले. मला तर चिखलात खेळावस वाटत होतं पण दिगू म्हणाला "आय मारल". सखुमावशी कधी कधी दिगूला काठीनं मारते. पण माझ्याशी ती चांगली आहे. ती मला शीदार्त म्हणते. माझं नाव तेच असायला हवं होतं. मला जोडाक्षरं आवडत नाहीत. ती अवघड असतात. पण मी शीदार्त म्हणलं तर आई चिडते. ती मला वाघाला व्हाग पण म्हणू देत नाही आणि हो आणि ला आनि म्हणलेलंही तिला चालत नाही. कधी कधी आमची आई क्रूरपणा करते. पण ती मला कधी काठीनं मारत नाही. आणि ती फोडणीची पोळी खूप छान करते.

तर मग मी ठरवलं की आपण दिगूवर गोष्ट लिहायची. आणि नाव पण ठरवलं गोष्टीचं- व्हाग आनि मानूस. आता जेवण झाल्यावर मी गोष्ट लिहायला बसणार आहे. अय्या! आज आईनं मस्त कढी बनवली आहे. अय्या म्हणलं की मला बाबा रागावतात. पण ताईनं म्हणलेलं चालतं त्यांना. मी लहान आहे म्हणून सगळेच माझ्याशी असं वागतात.

5 comments:

Shubhangee said...

मोठ्या माणसांसाठीचे ’A' वाले सिनेमे मुले चोरून,किंवा घरी कॅसेट आणून बघतात तशी ही गोष्ट आम्ही चोरुन वाचणार , पण वाचल्यावर आवडली असे सांगता कसे येणार शीदार्त तुला?, नाहितर वाचणार्यांच्या य़ादीत मावशीचे नावही घाल ना !

Saee said...

This is so cute!!! :)
LOved it. :D
Mug whag ani manoos kadhi lihinar?
-Saee

prasad bokil said...

thank you. आता उरलेली गोष्ट लहर आली की...

Makarand MK said...

हे हे ही ही :D :) (टाळ्याच टाळ्या ) किती शान !! अले पण पुडची गोष्ट कधी मिल्नाल आमाला ?

Hemangj said...

Nehmi pramane chanach .......
Pudhchya goshtichi vat baghate ahe .....