Sunday, January 17, 2010

The Champa Flower- III

मी किनै मनोर्‍यांच्या जंगलात रहाते.. उंच.
सगळंच काही निराळं आहे इथे. पण-
आई, कधी घरची आठवण आली ना
की या तेलकट धुरालाही सोनचाफ्याचा वास येतो
छान बहरला असेल नाही तो आता?
दिनूला सांग ते बयोचं घरटं मोडू नकोस
आताशा जाग आली असेल त्यात
त्या चिवचिवाटानं तुझा रितेपणा भरून निघेल थोडा.

पाण्याचा जागता आसरा नसला तरी
घरबसल्या भेटीला येतं नियमित
दुरून आणावं नाही लागत
समुद्र आहे म्हणे इथे
पण शांतपणे पाय पसरायला किनारा नाही बघ.
मिन्टामिन्टाला आगगाडी धावते आणि
सगळे तिच्या मागे धावत असतात
घाई आणि गर्दी मुक्कामालाच असते

मी खूप सुखात आहे.
घरात एक अंगण सोडलं तर कशाला कमी नाही बघ
आई, तुला माहीतेय!
माझ्या खोलीचं एक दार किनै आभाळात उघडतं
घराची छोटीशी फांदी हात बाहेर काढून
आकाशाच्या तळहातावर पसरते
तिथेच मी चार रोपट्यांत माझं अंगण साठवलंय
रात्री दिवे खूप छान दिसतात तिथून

माझं आता काही नाही गं तिकडे
दान एकानं दिलं दुसर्‍यानं घेतलं
पण वेडं आठवणींचं पाखरू येतं अजून तिकडे
दारात वाकलेल्या फांदीवर- घटकाभर
म्हणून म्हणते गं आप्पांना म्हणाव
हौद बांधा की हवा तिथं
पण
तो सोनचाफा तोडायचं तेवढं राहूद्यात...

4 comments:

Samved said...

awo dada, jar fasht liwa ki....tumcha sundar vachaychya nadat aamcha bandar hotay baga

Saee said...

Agree with samved. :)
Mastach..khup goad lihilays. Made me a little homesick. :(

Mandar Gadre said...

काय लिहिलंयंस!
पहिली, दुसरी वाचून ’वाह! सुरेख’ निघालं तोंडातून. तिसरीनं टचकन् भरला डोळा.

वाहता रहा :)

prasad bokil said...

अधुनमधून काही लिहावसं वाटत नाही. कदाचित तशी स्वस्थता किंवा अस्वस्थता येई पर्यंत लिहीलं जात नसावं. म्हणून खंड पडतो असा.
संवेद, सई आणि मंदार.. धन्यवाद.