Saturday, July 12, 2008

उशीर

रविंद्रनाथांबद्दल बरेच काही ऐकून होतो. पाठ्यपुस्तकातून त्यांचे धडेही होते आम्हाला. त्यांना मिळालेले नोबेल (जे आता चोरीला गेलेले आहे)- त्याचा अभिमानही कायमचा. त्यांचे शांतिनिकेतन, बिनभिंतींची शाळा, प्रत्यक्ष पाहिली तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यांची पेंटींग्ज, कविता, नाटके, कथा, भाषणे जे जे जसे जसे मिळत गेले तसा तसा वाचत गेलो. ते साहित्य वाचताना आपण अनंत निळ्या आकाशाखाली उभे आहोत, समोर फेसाळणारा समुद्र पसरलेला आहे, खारा वारा लाडीकपणे आपल्या आजूबाजूला घोटाळतो आहे आणि बघता बघता त्यात आपण विरघळून जात आहोत - आपल्या आकाश होण्याचा आनंद सोहळा आपणच लाटालाटांमधून साजरा करत आहोत असा काहीसा अनुभव येत राहतो.
त्यांच्या साहित्याशी माझी पहिली गाठ पडली कधी तरी महाविद्यालयात. घरातल्या आजोबांच्य़ा जुन्या लोखंडी ट्रंकेमधे एक छोटेसे पुस्तक सापडले. हार्ड बाऊंड, मळकट रंगाचे कापडाचे कव्हर. कधीकाळी ते सुंदर आकाशी रंगाचे असावे. त्यावर वेगवेगळे डाग पडलेले, पिवळी पडलेली पाने आणि काही कीटकांनी सहयोगाने बनवलेली ठिपक्यांची कलाकॄती. मला जास्त गंमत वाटली ती त्यावरची किंमत वाचून. किंमत फक्त दोन रूपये. कव्हरवर Trajan च्या देखण्या अक्षरात पुस्तकाचे नाव लिहिलेले- Crescent Moon.
वेळ रात्रीची दोनची. (परीक्षा जवळ आलेली असली की असे अभ्यासाव्यतिरिक्तचे उद्योग मी रात्री सगळे झोपले की करायचो.) मी ते पुस्तक वाचायला घेतले. एकेका कवितेने मला वेड लावायला सुरूवात केली. काही कविता तर मी परत परत चार चारदा वाचल्या. एकेक करत मी साडेतीनच्या सुमारास वाचन संपवले. त्यानंतर माहीत नाही मी किती वेळ तसाच स्तब्ध बसून होतो. तोच अनुभव आकाशात विरघळून जाण्याचा तरीही कणन्‌ कण नाचतोय लाटांवर. लहान मुलांचे काहीही वाचताना त्यात माझे हरवून जाणे आता नित्याचेच. मग ते तोतोचान असो वा डेंजर स्कूल, प्रिय बाईस किवा दिवास्वप्न. पण तो माझा पहिलाच अनुभव.
नंतर कुठेतरी वाचलेला एक प्रसंग असा-
रविंद्रनाथ आपल्या मित्राकडे लंडनमधे उतरले होते. त्यांच्या मित्राने त्यांच्या काव्यवाचनाचा छोटासा कार्यक्रम योजिला. काही मोजक्या इंग्लिश मित्रमैत्रिणींना आमंत्रण धाडले. घरातल्या दिवाणखान्यात तीस चाळीस लोक जमले होते. टागोरांनी Crescent Moon मधल्या कवितांचे वाचन केले. दीडएक तासाचा कार्यक्रम संपला. लोक आपापल्या घरी परतले. टागोरांच्या मित्राला फार वाईट वाटले. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत, कोणी कौतुकाची दाद दिली नाही, नंतर थांबून कोणी काही बोलले नाही. रविंद्रनाथ मात्र शांत होते. पण दुसर्‍या दिवशीपासून जो पत्रांचा रतीब सुरू झाला. तिथे आलेला प्रत्येक जण इतका भारावला होता की प्रतिक्रिया देण्यासाठी काही शब्द नव्हते.
असाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीतही झाला. मग बर्‍याच वर्षांनी काहीतरी लिहिले गेले पण त्याचे मूळ कुठेतरी त्या crescent moon मधे असावे. त्याला कविता म्हणावे की नाही इतपत त्याच्या दर्जाची मला शंका आहे पण तरीही .........
*****************

खरच सांगतो आई मी लवकर येणार होतो
तुझी शपथ मी अगदी लवकर येणार होतो

किनार्‍यावरचा खेळ संपवून मी वेळेवर निघालोच होतो
तर एक मोठी लाट फेसाळत माझ्या पायाशी आली
गुदगुल्या करायला
आणि हे बघ!
काय सुंदर सुंदर शंख शिंपले देऊन गेली
तिथेच थांबला कनू
गोळा करायला शंख
अजून पुढच्या लाटेनं येणारे
पण मी मात्र निघालो येवढेच घेऊन... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई मी लवकर येणार होतो
तुझी शपथ मी अगदी लवकर येणार होतो

निघालो तर सूर्य तिथे समुद्रात बुडत होता
काय लालबुंद झाला होता
अगदी तुझ्या या कुंकवासारखा
मग समुद्रही काय मागे राहणार होता
त्यानेही बदलला रंग- तांबूस केशरी थोडसा अबोली
अगदी तुझ्या त्या साडीसारखा
मी झोपल्यावर जी तू हळूच मला पांघरतेस
बघायचं होतं मला पाणी कसं रंगीत होतं ते
पण मी मात्र तसाच निघालो काही न बघता ..... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

समुद्रही झाकून घेत होता लाटांनी त्याचा रुपेरी किनारा
अगदी जशी तू लपवतेस तुझी पावलं बसल्याबसल्या
आत्तासारखी
येताना वाटेत फक्त वेणूकडे गेलॊ
ती देणार होती ना मला
काचेचे निळेशार मणी या शंखांच्या बदल्यात
तिने खूप शोधले पण मिळालेच नाहीत
मी मात्र तसाच निघालो मणी न घेताच... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

कबूल मला जरा उशीरच झाला
अगदी अंधार पडला काळाकुट्ट
पण मी घाबरलो नाही काई
खरंखरं सांग आहे की नाही मी शूर
कालच्या गोष्टीतल्या राजपुत्रासारखा
चांदोमामा सुद्धा कित्ती मोठा दिसत होता
विचारायचं होतं त्याला
म्हणजे मीही झालो असतो बाबांएवढा मोठ्ठा
अगदी पंधरा दिवसात
पण मी मात्र तसाच निघालो काही न बोलता ... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

मला वाटलंच तू आता रागावली असणार
अगं वळणावरचा विजेचा दिवासुद्धा लागला
मी येते होतो धावत तर एक गंमतच झाली
दिव्यापासची लहानशी सावली
पुढे आलो तर माझ्याहूनही मोठी झाली
मी कितीदा मागे गेलोन्‌ आलो
तरी मला कळलंच नाही
माझीच सावली कधी लहान कधी मोठी होते तरी कशी?
पण मी मात्र तसाच निघालो कळलं नाही तरी ... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

पण दाराशी आलो तर सावली येवढी मोठी झाली
आणणार होतो तुला दाखवायला
पण ती दारातनं मावेच ना
तू लवकर चल उंबर्‍याशी दाखवतोच तुला
हे काय गं आई,
मगा रागावलीस अन आता हासतेस काय?
उगीच हासतं का कुणी असं वेड्यासारखं?
आणि लवकर मला काहीतरी खायला दे
मला खूप खूप भूक लागलीय
आलो ना आता मी घरी ... तुझ्यासाठी

9 comments:

Shubhangee said...

अप्रतिम! शब्द अपुरे आहेत वर्णन करायला
शुभा मावशी

Dhananjay said...

Good article.. mee pan 'Cresent moon' cha fan ahe

Priya said...

कित्ती॓ऽऽऽ गोड! मला खूप म्हणजे खूपच आवडली कविता... समुद्राचं वर्णन, सावलीचा मजा, सगळंच! जियो!

मी रविंद्रनाथांच्या लघुकथा, काही मोजक्या कविता वाचल्या होत्या पूर्वी पण त्यांच्याबद्दलचं fascination अलिकडचं. सध्या खूप रविंद्रसंगीत ऐकते आहे आणि इंटरनेट वर त्यांचं जे काही साहित्य उपलब्ध आहे, ते वाचते आहे. तुला काही चांगलं माहित असेल तर मला लिंक कळव नक्की. Cresent Moon बघायला हवं, इथे लायब्ररीत वगैरे मिळतंय का ते.

Hemangj said...

Khup chan, yaadhi PuLancha likhan ravindranathan baddal vachala ahe aata ajun vachavas vatata ahe, baghuya kadhi jamel. Ajun kay lihu ? Thank you very much.

Anonymous said...

ekdam uLTiMATE.. .sagle kase dolyasamorach yet ahe.. .lahanpan.. .:-)

tu chaan lihtos.. .ekdam lahanasarkha.. .ani tech tar.. .kathin aste.. .ekda MOOOOOOOOOOOThe zhale ki.. .

Anonymous said...

खरच सांगतो प्रसाद,
एवढं चांगलं लिहायचं नसतं
कोणाची द्रुष्टं लागली
तर हळहळायचं नसतं!

prasad bokil said...

धन्यवाद!

anjali said...

किती
सुंदर लिहितोस तू....
वाचताना डोळ्यात पाणी आल माझ्या....
रवींद्रनाथांच " गीतांजलि" तर तू नक्कीच वाचल असशिल...नसेल तर लवकर वाच.
मनात खोलवर रूजतात त्यांचे शब्द....

Saee said...

It is very difficult to think like a kid when you grow up. When I write about my childhood memories I really have to have a coffee and refresh myself first. :)
But I think writing for a kid when you are all grown up is the most beautiful experience in this world. :)
Very beautiful.
I have been a fan of Robindrashongeet ever since I was four. I know many of the songs by heart even though can't speak Bengali. But the words, the tunes are so endearing that it does not matter if you don't know what it means. Many years later I found a good friend in a Bengali girl and she explained the words. That was a very tender and beautiful experience of my life. To find out the meaning after years of singing.
Cheers
Saee