जीवनाची वाट ... खाच खळगे, काटेकुटे, कभीन्न काळोख....
नाही नाही, उगीच खोटे कशाला बॊलू. आमचा प्रवास सुरू झाला तो मुळी गाडीरस्त्यावरून. आता तर महामार्गाला लागलो आहोत. आणि प्रकाशाचं विचाराल तर शतसूर्य सोबतीला आहेत. काही प्रत्यक्श्य भेटले काही वाचनातून अनुभवले. त्यामुळे अंधाराची भिती कधी वाटली नाही. भीती होती वेगाची. धावता धावता पावले जड होतात, पाय अडखळतो, ठेच लागते, डोळ्यासमोर अंधारी येते..............अचानक काही उबदार कवडसे चमकून जातात. जखमेवर हळुवार फुंकर घातल्यासारखी. वाटतं रस्ता सोडून खाचखळग्याच्या वाटेला वळावं. तिथेच अंधारात एखाद्या दगडाला टेकून मिणमिणत्या निरांजनाची ऊब अनुभवत रहावं.
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणु नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
माझ्या वडीलांची आजी आणि आईची आजी दोघीही दीर्घायुषी होत्या. त्या अमृताचा अनुभव मी आत्ता आत्ता पर्यंत घेतला. त्या ओथंबलेल्या प्रेमाला कुठलीच अपेक्शा नव्हती. तो सुरकुतलेला स्पर्श, जाळीदार नक्शीचा चेहरा, कातर आवाज, दंतविहीन मुखातून कोलांट्या खाणारे शब्द आणि किलकिल्या डोळ्यातून जीवापाड ओसंडणारी माया........................
मला चटकन बोरकरांच्या कवितेतला एक शब्द सुचला "कांचनांची निरांजने". ही निरांजने हळूहळू मालवताना मी पाहीली. त्या भावनांचे स्पंदन असे काहीसे शब्दात उमटले.
कधी कधी सगळे शब्दचं बोजड वाटतात. तरीही.........................
***********
तुळस
काळ आमच्या दारासमोरली तुळस वारली
परसाला सुतक लागलं
बहुदा आसपास ती अखेरचीच असावी... तिच्यासारखी
वृंदावन छत्र गमावल्यागत मुकं मुकं झालं
त्याचा आधारच गेला जणू
समईने हुंदका आवरत पदर लावला डोळ्याला
वारा बासरीचे सूर शोधतोय वाळलेल्या मंजिर्यातून
उंबरठा कळवळला ठेच लागल्यासारखा
अन गोठा मुसमुसतोय कालपासून
तिच्या राखेचे कण वेचत रांगोळी सुन्न
दूरस्थात उभा कोणी
थरथरत भिजतोय
केशरी देठांच्या आसवांतून
पारिजात होऊन!
................. प्रसाद
5 comments:
प्रसाद, अतिसुंदर! कवितेबद्दल आधी सांगितलं होतंच तुला, पण 'कांचनांची निरांजने'..आहा! बाकीबाबांचा शब्द अचूक निवडलायस.
kavita aani visheshan (Kanchananchi niranjane) donhi apratim.
प्रसाद, तुझे ब्लॉग खूपच सुरेख आहेत. प्रतिमा, शब्द आणि मांडणी, सर्वच अप्रतिम.
Dear prasad,
your blog is befitting to the status of IDC. Please keep the audio-visual treat continuously being presented to us. Long back during our research days (1987-91), in the deptt. of civil engg. at iitb, we used to give frequent visits to IDC. Not surprisingly, we used to get refreshed, looking at the creative synergy being depicted at idc.
Your assignments of pen-stand, exhibitions of paintings and products, are still vividly clear in my memory. Thanks for your equally stimulating blog
आपल्या ओळी वाचून जयमाला शिलेदार ह्यांच्या नाटकातिल एक ऒल लक्षात आली. नायिका जेव्हा नायकाची वाट पहाते तेंव्हाची अवस्था सांगितलीय,"अवयव सगळे नयनी आले"
बस! हीच अवस्था फ़ार परीक्षेची.
Post a Comment