Thursday, March 23, 2006

निरोप

हा प्रवास काही चुकत नाही. म्हणजे त्यात तसा आमचाही हात होताच. शीडे उभारून आम्ही कायमचे तयार. मग वारा वाहतो म्हणून तक्रार तरी का करावी? पण शीडं उतरवली तरी या लाटा काय स्वस्थ बसू देतात? आमची आपली भटकंती चालूच. तसं थांबतो घडी दोन घडी इथं तिथं. असेलच नशीबात तर मुक्कामही घडतो एखादा. कधी कधी काळ आ वासून बघत रहातो आपल्याच तोंडाकडे मख्खासारखा. पण यात स्वेच्छेचा भाग कितपत असतो देव जाणे. म्हणूनच कशातही न अडकता एखाद्या फकीराप्रमाणे भणंग रहावं. मागच्या मुक्कामी हे गणित चुकलं कुठेतरी. मुक्कामही तसा फारसा नव्हता. असेल फार तर एखाद्या वामकुक्षी इतका. पण त्यातल्या स्वप्नांशी रेषीम धागे जोडले गेले नकळत. जशी झोप उडाली ही स्वप्नही उडाली भुर्ररकन. आणि मी अस्वस्थ झालो.

निरोप

ते घरटं सोडल्याला आता बरेच दिवस झाले
सगळे झरोके बंद केले
पार्‍यासारखी विखुरलेली माझी सावली
आटोपशीरपणे आवरून मी निघालो

पण कसं कोण जाणे
एक खिडकी उघडीच राहिली आठवणींची
त्यामुळे भूतकाळातील चिमण्या अशा कधीही भुरभुरत आत शिरतात
आणि मी चिवचिवाटानं काठोकाठ भरून जातो

प्रकाशाच्या वाटेलाच पाऊलं दान केली
अन डोळे बांधलेत अज्ञाताला
मागे यायला वाट नाही
मागं यायचं कारणही नाही
काही कवडसे मात्र ठेवलेत घट्ट मुठीत धरून
नशीब, या चिमण्यांची तरी सोबत आहे

इथेही तंबोरे लागलेत
षड्ज अगदी नेमका गवसलाय
पण तशी मारव्याची तान पुन्हा गाणं अवघड आहे
हा सव्यापसव्य कशासाठी?
तर निरोप घ्यायचा राहून गेला
अर्थात निरोप कसचा घ्यायचा म्हणा
तुमच्या अन माझ्या दोघांच्याही अंगणात याच तर दाणे टिपतायत
चिवचिवत भुरभुरणार्‍या याच चिमण्या

................. प्रसाद

1 comment:

hemant_surat said...

खरंच आपण निरोप घेतो का?
विसरलो म्हणून सारं काही सरतं का?
चांदणं तेच, पक्षी तेच, चिमण्याही त्याच
आठवणींचा बाज तसा राहतो का?
ज्याला आपण खिडकी म्हणतो
ते तर आपले आभाळ असते
आपल्यावरच ते कोसळणार ही खात्री असते
तरीही ते पेलायला आपण धावतो का?
हेमंत पाटील