परवा पूजा करून चाफ्याकडे निघालेल्या
दिनूला केवढ्यांदा ओरडलीस,
"तुळशीत वाहव ते पाणी, चाफ्याला घालू नकोस!"
तुझी चाफेकळी आता बहराला आलीय.
आई, म्हणून का गं पाखरं घराकडे यायच्यावेळी
तुझ्या डोळ्यात अशी सांज उतरून येते?
तुळशीपुढे दिवा लावताना
रामरक्षेचा तुझा कुटुंबवत्सल सूर कातर होतो आताशा
विचारांना पाय फुटतात आणि त्याच त्याच वळणाशी
परत परत ठेचकाळतात.
तुझ्या चाफ्यावर वसंत उतरला यावेळी
सोनपाकळ्या आभाळभर झाल्या
तशी तू अस्वस्थ झालीस
पावसाआधीच वैशाखात तू कधी नव्हे ते
परसाला कुंपण घालवलंस.
भर पावसात स्वतःचं म्हणून तांब्याभर पाणी घालणार्या
तुझी छाती भरून येते अभिमानाने
जेव्हा नवी पालवी फुटते दरवेळी -
पण अवेळी आलेल्या मुक्तछंद वार्यावर
पानं झुलू लागतात, फुलं खुलू लागतात तशी
तुझी सारी काळजी एकवटून टपकतो एखादा थेंब!
तुझ्या गालावरून ओघळलेला तो थेंब
जन्मभरासाठी जाणिवेचं गोंदण झालाय गं
अंगणात ही मुळं खोलवर गेलीयेत
काही झालं तरी
आई,
तुझ्या चाफ्याचं निर्माल्य नाही होऊ देणार मी
****
The Champa Flower- I या रवींद्रनाथांच्या कवितेच्या स्वैर अनुवादात आलेलं नातं- आई आणि मुलीचं.
त्या कवितेतून जन्माला आलेली ही कविता. जसं वय वाढतं तसं प्रत्येक नात्यातील रंग बदलत जातात. आधीच्या निरागस नात्याला सामजस्याचा आलेला हा निराळा रंग. यात रवींद्रनाथांच्या अनुकरणाचा प्रयत्न नाही. कारण या कवितेची धाटणीही वेगळी आहे आणि माझी तशी योग्यताही नाही.
3 comments:
योग्यता बिग्यता काय बोलतोस? सर्जकांमध्ये असतो का योग्यतेचा सूर? रोबि ठाकूर काय चला मी लई योग्यतेचा म्हणून लिहतो असं करत नक्कीच नसावेत. तुला एक मस्त शैली आहे आणि तुला माझ्यासारखी स्वस्त प्रसिद्धीची हावही नाहीये! त्यामुळे तुझी अभिव्यक्ती खरी आणि उत्कट आहे. मी असतो तर ही कविता कधीच कविता-रती मधून छापून यावी यासाठी पाठविता झालो असतो. पण तू तुझ्या ब्लॉगसाठी लिहतोस. म्हणजे खरंतर असंच लिहतोस. हा गुण आहे. या प्रासादिक खरेपणाला आणि तुझ्या शैलीविशेषाला सलाम!
Wah..post is nice..but the comment is even nicer. :)
Masta. Itkya diwsanni lihunahi transitions khup sundar zaliyet. tinhi kavita ekatrach kelyas asa wattay. Well done. :)
Mala kahi "abhivyakti" wagaire mhanta yet nai hun! So goad manun ghe. :)
चिन्मय,
अरे बाबा असं काहीतरी लिहून मला घाबरवून सोडू नको. आपलं म्हणून करावं थोडं कौतुक पण इतकं??
आणि सई,
तू नकोच असले काही अवघड शब्द वापरूस. तू फार छान लिहीतेस. ते तसच राहू दे.
Post a Comment