समज मी सोनचाफ्याची कळी झाले
गंमत म्हणून,
आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर
लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्यावरती झोके घेत;
तर सांग ना आई, तू ओळखशील मला?
तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील,
’अगं चिऊ, कुठे गेलीस?’
आणि मी हासेन माझ्याशीच-
मनातल्या मनात, गालातल्या गालात
मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून
बघत राहीन तुला रांगोळी घालताना
आंघोळीनंतर ओले केस खांद्यावर तसेच घेऊन
तू चाफ्याच्या सावलीतून चालत तुळशी वृंदावनाशी पोचशील
चाफ्याचा ओळखीचा दरवळ तुझ्या गालाला चाटून जाईल
पण तुला माहीत नसेल की ती मीच आहे
दुपारी जेवणानंतर
तू खिडकीशी बसशील रामायण वाचायला
झाडाची जाळीदार सावली तुझ्या केसांमधून निसटून मांडीवर विसावेल
तेव्हा माझी इवलीशी सावली हात पुढे करून
तू वाचत असलेल्या पानावर मधे मधे करत राहील
तुला कळेल का तेव्हा की ही तुझ्याच फुलाची खोडी आहे!
आणि मग दिवेलागणीला
जेव्हा हातात कंदील घेऊन तू गोठ्याकडे जाशील
मी परत तुझं कोकरू होऊन खाली उडी मारेन
आणि घरात लपून बसेन
तू आत आल्या आल्या तुझ्याकडे गोष्टीचा हट्ट धरेन
"अगं लाडोबा, कुठे होतीस दिवसभर?" तू विचारशील
"आमची किनै गंमते" तू कित्ती विचारलंस तरी नाहीच सांगायचे मी ....
****
हा रवींद्रनाथांच्या एका कवितेचा स्वैर अनुवाद. स्वैर अशासाठी की त्यात मला वाटले तिथे काही बदल केले आहेत कवितेचं शीर्षक कायम ठेवलं आहे. ही कविता अनुवादीत करून झाली आणि त्यातून अजून काही कवितांना पालवी फुटली. पण एकाच ठिकाणी त्या लिहीण्याचा मोह टाळतो आहे. कारण एक धाग्यात गुंफलेल्या असल्या तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.
Friday, September 25, 2009
Monday, September 14, 2009
रेघांमागून
केस पिंजारलेले ते दोघं चौघं (माड)
घाईनं आंघोळी उरकून घेतात
कुंपणाशी राखणीला बसलेली म्हातारी (भिंत)
हिरवं लुसलुशीत इरलं अंगभर ओढून घेते.
फाटकाशी पाठीत कुबड काढून ओणावलेला तो (प्राजक्त)
उभ्याउभ्याच आळस दिल्यासारखा करतो
ओल्या रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेली फुलवाली (कोरांटी)
आपली मळकट छत्री झटकते
...
पागोळ्य़ांतून मारलेल्या उभ्या रेघांमागून हे सगळं बघत
मी दारात उभा असतो
आणि
माझं मन एखाद्या वांड मुलासारखं
प्रत्येक थेंबात उड्या मारून पाणी उडवत राहतं
...
जेव्हा श्रावण माझ्या घरी पाहुणा म्हणून येतो.

Sunday, September 06, 2009
थेंब एक...
सखी,
आज सक्काळपासून पाऊस वस्तीला आलाय. आठवतं ना तो यावा म्हणून काही दिवसांपूर्वीच तर जोगवा घातला होता बयोनं. पण आता त्याचं येणं तस रोजचंच नसलं तरी नित्याचं झालंय. म्हणून काय सगळंच कौतुक संपावं? नाकं मुरडत जिथे तिथे काळ्या छत्र्यांचा निषेध! आपल्या दोघांची छत्री विसरायची सवय एकसारखीच. आता ’यामध्ये ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण?’ हे सांगणे कठीणच. तस आपलं काहीच सरळ सोप्पं नसतं.
... हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आजकाल मी सलग एका विषयावर बोलूच शकत नाही.तू नसलीस तरी मीच फाटे फोडत राहतो माझ्याच विचारांना. तू जाताना सगळे प्रश्न इथेच सोडून गेलीस जणू माझ्या आजूबाजूला.
हं, पाऊस!
आमचं पूर्वीचं नातं खूप धसमुसळं होतं. तोही धबधबत राहायचा आणि मीही हुंदडत रहायचो. शीरूची सोबत होती. तो फक्त काही दिवसांचा होता तेव्हापासूनचा आमचा पावसाशी लळा. बांधावरनं चौखूर उधळायचो. माईचा जीव वरखाली व्हायचा. ती माजघरातल्या माजघरात आतबाहेर करत रहायची आणि त्याच वेगानं विठोबा तिच्या पायात पायात घोटाळत रहायचा. मग पावसाचा फारच जोर वाढला तर विठोबाला पेकाटात एक लाथ बसायची आणि मग ती भाऊला पिटाळायची आमच्या शोधार्थ. तो इरलं घेऊन आम्हाला शोधत यायचा. आम्ही मस्त आमच्यातच. तो बरोबर येऊन माझा कान आणि शीरूचं शेपूट पिरगाळायचा. मला फार वाटायचं आपल्यालाही शेपूट असायला हवी होती म्हणजे जरा कमी दुखलं असतं. म्हणजे तसा माझा अंदाज होता. कारण मी बेंबीच्या देठापासून बोंब मारायचो पण शीरू मात्र निमूट असायचा. अशी आमची वरात भर पावसात घराकडे परतायची. मग तोही गडगडाटी हसायचा आणि त्याचा जोर आवरता घ्यायचा. घरात आल्या आल्या शीरू मालीच्या पोटाखाली शिरायचा. तीही रवंथ थांबवून त्याला चाटायला लागायची.
माई माझं डोकं पुसताना म्हणायची," भाऊ, यालाही बांध रे दावणीला."
चुलीपाशी बसून गरम सुंठ घातलेलं दूध प्यायला लागायचं. माराची भरपाई म्हणून मग विठोबालाही इवलसं जास्तच मिळायचं.तो मिशीवरचा राग पुसत माझ्या मांडीशी येऊन बसायचा. मी त्याच्या शेपटीच्या गोंड्याकडे कौतुकाने बघत दूध संपवायचो. बाहेर दमलाभागला पाऊस ठिबकत रहायचा.
शीरू माझ्या आधीच मोठा झाला. औताला जुंपला गेला. त्याला मग पावसाचं तितकंसं राहिलं नाही. माझ्या गटातला एक गडी फितूर झाला. पाऊस जरा कमीच पडला त्या वर्षी.
त्यानंतरचा, माझा आणि पावसाचा आवडता प्रसंग म्हणजे आम्हांला दोघांनाही तू पहिल्यांदाच भेटलीस तेव्हाचा.
शाळेच्या शेवटच्या वर्षाला होतो मी. शाळेतनं घरी येत होतो. ’पावसाचा जोर ओसरेपर्यंत आम्ही येत नाही’ म्हणून बाकी दोस्त मागे राहिलेले. मी मात्र पावसाच्याच सोबतीनं वारं कानात गेल्यागत धावत निघालो. चावडीपासची चढण चढून आलो आणि घराकडे वळलो तर समोर चिखलात एक गाडी रूतलेली.गाडीवान आणि एक टक्कल पडलेले गृहस्थ ती ढकलण्याचा प्रयत्न करून राहिलेले. गाडीचा बैलही तसा बेताचाच होता. त्या तिघांच्याही ताकदीच्या पलीकडे ती गाडी अडकलेली होती.मला बघून त्यांच्या जिवात जीव आला. "ए पोरा, जरा हात लाव रं" असं तो गाडीवान ओरडला तसे ते कोटटोपीवाले गृहस्थ म्हणाले," अरे लहान आहे तो. बाळ, आमची गाडी अडकली आहे. जरा कोणा मोठ्याला बोलावशील तर बरं होईल बाबा." मी म्हणलं," आत्ता बोलावतो बघा." मी निघणार इतक्यात गाडीची ताडपत्री सारून एका पोरीनं उडी मारली खाली.
"मी पण येणार तुझ्य़ाबरोबर"
"मग चल की"
आणि मग गाडीतून येणार्या हाकांकडे सपशेल कानाडोळा करून आम्ही धूम ठोकली. चार पावलं गेलो असू अन् ती रप्पकन चिखलात पडली. अगदी दंडवत घातला. मला वाटलं की च्यामायला आता ही भोकाड पसरणार. पण तू उभी राहिलीस आणि तुझ्या चिखलमाखल्या चेहर्यावर विश्वविजयाचा आनंद होता.
"चल की रे"
"पण तो चिखल"
"तो काय जाईल पावसाने वाहून"
तेव्हाच कळलं की आपली गट्टी जमणार. आणि मग दोन वांड चिंबभिजली पोरं सुसाट धावत सुटली फुलारलेल्या हादग्याच्या ताटव्यातून. पावसानंही वेग वाढवला. त्याला जणू सगळा चिखल धुवून काढायचा होता तुझ्या अबोली परकरावरचा. पावसापाण्याच्या खेळातला एक गडी वाढला.
नंतरचे काही पावसाळे कसे अगदी भुर्र्कन उडून गेले. मैत्र जुळत गेलं. अचानक पावसाने रंग बदलला. अचानक नसेलही कदाचित. पण अधिकच गहिरा होत गेला तुझ्या माझ्यासाठी. अनेक संदर्भ बदलत गेले.
पण तो असा कधी वागला नाही. याआधीचा पाऊस कधीच असा निरीच्छ नव्हता. असा उगचच कुढतखाऊ नव्हता आपला पाऊस. तू जाताना मी खूप लपवलं त्याला. नाही वाहू दिलं डोळ्यातून. तू तर सर्दीचा बहाणा करून सारखी डोळ्याला रूमाल लावत होतीस. तू जाताना आठवणीचा म्हणून एक थेंब घेऊन गेलीस. माझ्या सोबतीला उरला पाऊस इथेच ठेवलास. पण काहीतरी बिनसलंय गं त्याचं.एक थेंब हारवलाय त्याचा.
****
श्रावणाची हवा पावसाळी कुंद
आपल्यात धुंद थेंब एक
अत्तराची कुपी केवड्याचा गंध
दरवळ मंद थेंब एक
आठवांचा वसा पापणीत बंद
थोडा मुक्तछंद थेंब एक
चातकाला जडो पावसाचा छंद
उरो आत्मानंद थेंब एक
सरींवर सरी कोसळले नभ
कुठे शोधू सांग थेंब एक?
थेंबासाठी एका केला आटापिटा
गालावर तुझ्या सापडला...
आज सक्काळपासून पाऊस वस्तीला आलाय. आठवतं ना तो यावा म्हणून काही दिवसांपूर्वीच तर जोगवा घातला होता बयोनं. पण आता त्याचं येणं तस रोजचंच नसलं तरी नित्याचं झालंय. म्हणून काय सगळंच कौतुक संपावं? नाकं मुरडत जिथे तिथे काळ्या छत्र्यांचा निषेध! आपल्या दोघांची छत्री विसरायची सवय एकसारखीच. आता ’यामध्ये ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण?’ हे सांगणे कठीणच. तस आपलं काहीच सरळ सोप्पं नसतं.
बरं ते जाऊदे.
हं तर काय सांगत होतो? आठवलं!
तो पण अस्सा आहे ना की पसरून राहिलाय दिठीभरून, सुस्तावल्यासारखा. आपल्या विहिरीपासचा तो ’अवलीया’ आठवतोय? अगदी त्याच्यासारखाच निरीच्छ. ए पण मला अजूनही वाटतं की त्या नावात त्याचा तो हिरवटपणा येत नाही. त्याचं नाव ’गजारू’च असायला हवं होतं. पण आपल्या वादात कायम तूच जिंकतेस आणि तो तसाही निरीच्छच. अवलीया काय आणि गजारू काय? त्याला काहीच फरक पडणार नाहीये. तू गेल्यापासून तो अजूनच निरीच्छ वाटू लागलाय. त्याच्या एका बाजूच्या पारंब्या सुकून गेल्यात. यावेळी वसंतही अगदी कसनुसाच उतरला होता त्याच्यावर.एक शामा घरटं करू गेली होती त्याच्या आसर्याला पण अर्धवटच सोडलंन्. त्यानीच हिडीसफिडीस केलं असणार. बरं बरं, तुला त्याचा भारी पुळका!
नसेल केला तुसडेपणा पण जराशी आपुलकी तरी दाखवायची होती.
ते असो. तर मी काय बोलत होतो?हं तर काय सांगत होतो? आठवलं!
तो पण अस्सा आहे ना की पसरून राहिलाय दिठीभरून, सुस्तावल्यासारखा. आपल्या विहिरीपासचा तो ’अवलीया’ आठवतोय? अगदी त्याच्यासारखाच निरीच्छ. ए पण मला अजूनही वाटतं की त्या नावात त्याचा तो हिरवटपणा येत नाही. त्याचं नाव ’गजारू’च असायला हवं होतं. पण आपल्या वादात कायम तूच जिंकतेस आणि तो तसाही निरीच्छच. अवलीया काय आणि गजारू काय? त्याला काहीच फरक पडणार नाहीये. तू गेल्यापासून तो अजूनच निरीच्छ वाटू लागलाय. त्याच्या एका बाजूच्या पारंब्या सुकून गेल्यात. यावेळी वसंतही अगदी कसनुसाच उतरला होता त्याच्यावर.एक शामा घरटं करू गेली होती त्याच्या आसर्याला पण अर्धवटच सोडलंन्. त्यानीच हिडीसफिडीस केलं असणार. बरं बरं, तुला त्याचा भारी पुळका!
नसेल केला तुसडेपणा पण जराशी आपुलकी तरी दाखवायची होती.
... हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आजकाल मी सलग एका विषयावर बोलूच शकत नाही.तू नसलीस तरी मीच फाटे फोडत राहतो माझ्याच विचारांना. तू जाताना सगळे प्रश्न इथेच सोडून गेलीस जणू माझ्या आजूबाजूला.
हं, पाऊस!
आमचं पूर्वीचं नातं खूप धसमुसळं होतं. तोही धबधबत राहायचा आणि मीही हुंदडत रहायचो. शीरूची सोबत होती. तो फक्त काही दिवसांचा होता तेव्हापासूनचा आमचा पावसाशी लळा. बांधावरनं चौखूर उधळायचो. माईचा जीव वरखाली व्हायचा. ती माजघरातल्या माजघरात आतबाहेर करत रहायची आणि त्याच वेगानं विठोबा तिच्या पायात पायात घोटाळत रहायचा. मग पावसाचा फारच जोर वाढला तर विठोबाला पेकाटात एक लाथ बसायची आणि मग ती भाऊला पिटाळायची आमच्या शोधार्थ. तो इरलं घेऊन आम्हाला शोधत यायचा. आम्ही मस्त आमच्यातच. तो बरोबर येऊन माझा कान आणि शीरूचं शेपूट पिरगाळायचा. मला फार वाटायचं आपल्यालाही शेपूट असायला हवी होती म्हणजे जरा कमी दुखलं असतं. म्हणजे तसा माझा अंदाज होता. कारण मी बेंबीच्या देठापासून बोंब मारायचो पण शीरू मात्र निमूट असायचा. अशी आमची वरात भर पावसात घराकडे परतायची. मग तोही गडगडाटी हसायचा आणि त्याचा जोर आवरता घ्यायचा. घरात आल्या आल्या शीरू मालीच्या पोटाखाली शिरायचा. तीही रवंथ थांबवून त्याला चाटायला लागायची.
माई माझं डोकं पुसताना म्हणायची," भाऊ, यालाही बांध रे दावणीला."
त्यानंतरचा, माझा आणि पावसाचा आवडता प्रसंग म्हणजे आम्हांला दोघांनाही तू पहिल्यांदाच भेटलीस तेव्हाचा.
शाळेच्या शेवटच्या वर्षाला होतो मी. शाळेतनं घरी येत होतो. ’पावसाचा जोर ओसरेपर्यंत आम्ही येत नाही’ म्हणून बाकी दोस्त मागे राहिलेले. मी मात्र पावसाच्याच सोबतीनं वारं कानात गेल्यागत धावत निघालो. चावडीपासची चढण चढून आलो आणि घराकडे वळलो तर समोर चिखलात एक गाडी रूतलेली.गाडीवान आणि एक टक्कल पडलेले गृहस्थ ती ढकलण्याचा प्रयत्न करून राहिलेले. गाडीचा बैलही तसा बेताचाच होता. त्या तिघांच्याही ताकदीच्या पलीकडे ती गाडी अडकलेली होती.मला बघून त्यांच्या जिवात जीव आला. "ए पोरा, जरा हात लाव रं" असं तो गाडीवान ओरडला तसे ते कोटटोपीवाले गृहस्थ म्हणाले," अरे लहान आहे तो. बाळ, आमची गाडी अडकली आहे. जरा कोणा मोठ्याला बोलावशील तर बरं होईल बाबा." मी म्हणलं," आत्ता बोलावतो बघा." मी निघणार इतक्यात गाडीची ताडपत्री सारून एका पोरीनं उडी मारली खाली.
"मी पण येणार तुझ्य़ाबरोबर"
"मग चल की"
आणि मग गाडीतून येणार्या हाकांकडे सपशेल कानाडोळा करून आम्ही धूम ठोकली. चार पावलं गेलो असू अन् ती रप्पकन चिखलात पडली. अगदी दंडवत घातला. मला वाटलं की च्यामायला आता ही भोकाड पसरणार. पण तू उभी राहिलीस आणि तुझ्या चिखलमाखल्या चेहर्यावर विश्वविजयाचा आनंद होता.
"चल की रे"
"पण तो चिखल"
"तो काय जाईल पावसाने वाहून"
तेव्हाच कळलं की आपली गट्टी जमणार. आणि मग दोन वांड चिंबभिजली पोरं सुसाट धावत सुटली फुलारलेल्या हादग्याच्या ताटव्यातून. पावसानंही वेग वाढवला. त्याला जणू सगळा चिखल धुवून काढायचा होता तुझ्या अबोली परकरावरचा. पावसापाण्याच्या खेळातला एक गडी वाढला.
नंतरचे काही पावसाळे कसे अगदी भुर्र्कन उडून गेले. मैत्र जुळत गेलं. अचानक पावसाने रंग बदलला. अचानक नसेलही कदाचित. पण अधिकच गहिरा होत गेला तुझ्या माझ्यासाठी. अनेक संदर्भ बदलत गेले.
पण तो असा कधी वागला नाही. याआधीचा पाऊस कधीच असा निरीच्छ नव्हता. असा उगचच कुढतखाऊ नव्हता आपला पाऊस. तू जाताना मी खूप लपवलं त्याला. नाही वाहू दिलं डोळ्यातून. तू तर सर्दीचा बहाणा करून सारखी डोळ्याला रूमाल लावत होतीस. तू जाताना आठवणीचा म्हणून एक थेंब घेऊन गेलीस. माझ्या सोबतीला उरला पाऊस इथेच ठेवलास. पण काहीतरी बिनसलंय गं त्याचं.एक थेंब हारवलाय त्याचा.
श्रावणाची हवा पावसाळी कुंद
आपल्यात धुंद थेंब एक
अत्तराची कुपी केवड्याचा गंध
दरवळ मंद थेंब एक
आठवांचा वसा पापणीत बंद
थोडा मुक्तछंद थेंब एक
चातकाला जडो पावसाचा छंद
उरो आत्मानंद थेंब एक
सरींवर सरी कोसळले नभ
कुठे शोधू सांग थेंब एक?
थेंबासाठी एका केला आटापिटा
गालावर तुझ्या सापडला...
Thursday, July 23, 2009
वेदनेची अर्धुके..
का? असं का व्हावं?
मी अस्तित्वाच्या जाणिवेला संवेदनेचा स्पर्श करतो आणि वेदनेची जी वर्तुळे उठतात ती कुठेतरी तुझ्या काठावर पोचतील आणि तिथून उमटणारी प्रतिक्रियेची वर्तुळे एकमेकांत गुंफत परत माझ्यापर्यंत उचंबळून येतील असं मला उगचच वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. ती वेदना तुझ्यापर्यंत पोचतच नाही का तुझ्या संशयाच्या भोवर्यात ती केविलवाणी होत नाहीशी होते कदाचित. मी मधूनच नारायण सुर्व्यांप्रमाणे लेखणीचे बंड उभारून "सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे" च्या थाटात काहीतरी लिहून जातो आणि तुला वाटतं की मी मोझेसचा बुरखा घालून उपदेशाचे दहा खिळे तुझ्य़ा स्वातंत्र्याचा सीमेवर ठोकणार आहे. पण त्या सर्व लिखाणात मी आणि तू असा दुजाभाव राखलेला नसतो. मी काही सांगतोय आणि म्हणून तू ते ऐक अशी अपेक्षाही नसते तिथे. मी फार शहाणा आणि तूच नाठाळ असा भाव त्यामागे नसतो. तो सगळा माझा माझ्याशी चाललेला प्रतिवाद असतो. तरीही मला तो तुझ्यापर्यंत पोचवायचा असतो जसाच्या तसा. कारण तो चालू असताना तुझ्या तिथे असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. तुझ्या सहभागाची अपेक्षा असतेही कधीकधी पण हट्ट मुळीच नसतो. तुझी नुसती मूकपणे दिलेली साक्षही पुरेशी असते. कारण माझे विचार माझ्या भावनांना फितूर होऊन मी माझ्याकडून फसवला जाण्याची भीती मला भावनाशून्य आणि विचारहीन बनवते कधी कधी, तेव्हा दहा मिनिटं थांबून शिळोप्याच्या गप्पा मारायला कोणी तिथे असलं तरी मला चालणारं असतं.
जेव्हा काहीतरी अस्वस्थ करणारं वाचतो, बघतो तेव्हा प्रश्नांचं एक वादळ उठतं जे स्वतःलाच निर्ढावलेला षंढ म्हणून आरोपीच्या पिंजर्यात उभं करतं. त्या रागानेच शब्दांना कधी धार चढते पण त्यात कोणाला दुसर्याला दुखावण्याचा हेतू नसतो आणि तुला तर नाहीच नाही. पण वाटतं कदाचित तुझ्य़ाकडे उत्तरं असतील तर मला परत त्यावर विचार करायची गरज नाही. आणि जर उत्तरं नसतील आणि असे प्रश्न तुझ्याही डोक्यात उठत असतील तर....
प्रश्नांना प्रश्न जोडून त्यांचं अर्धुक इतकं विस्तारावं की आकाशाला नेऊन भिडवावं. मग कदाचित उत्तरं जागोजाग उगवतील झाडाझाडातून अगदी जसं की ग्रेस त्या कवितेत उगवतो- झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया!
जेव्हा आरती प्रभू गाण्यातून ऐकत असतो आपण. आता उशाचा दगड मधे आशाताई असा काही जीवघेणा खर्ज लावते, जो बाळासाहेबांनी अगदी तासून बसवलेला असतो तिथे. आणि तरी गुलजार-पंचमदाचं मेरा कुछ सामान ऐकल्यासारखं फक्त विरहाच्या काठापर्यंतच तुझा प्रवास संपतो तेव्हा मी आक्रंदत असतो ते त्या द्यायचे राहून गेलेल्या नक्षत्राच्या देण्याबद्दल. मी बोलत असतो ते त्या व्यथेबद्दल ज्या का कोण जाणे पोचतच नाहीत तुझ्या पर्यंत. आणि माझ्य़ापाशी उरतात काही कळ्य़ा आणि कोवळी पाने.........
माझी व्यथा वेदनेचं रूप घेऊन येते एखाद्या हळव्या क्षणी पण चिंता होऊन डोक्यावर बसत नाही. कारण ’चिंता करतो विश्वाची’ म्हणत कपाटात स्वतःला बंद करून घ्य़ायचं धाडस नाही माझ्यात. ते ओझं सहन होण्य़ाची कुवत नाही आपल्यात अशी भीती असेलही कुठेतरी पण त्याहीपेक्षा तू मला शोधत दार उघडशील की नाही याची शहानिशा नाही करायची मला. पण मग अशावेळी डोळ्यांनी दगा दिलाच आणि एखादा दर्द गझल न होताच टपकला बाहेर तर तुझ्यासाठी त्याचा तमाशा का व्हावा?
तुला असं का वाटतं की मला विनोद कळत नाही? आठव बरं तूच - असं कधी झालंय का पूर्वी, की चेष्टा-विनोदापासून विडंबनापर्यंत मी कधी टाळ्या पिटलेल्या नाहीत? नाक रंगवून विदूषकी चाळे करायचीही तयारी असते आमची. हं पण माकड बनून मदार्याच्या टिमकीवर नाचण्याचा उपहास नाही सोसत. आता त्याला काही स्वाभिमान वगैरेचं नाव देऊन उगच मोठं करायचं नाही मला. पण काही सवयी जपतोच ना आपण जिवापाड! त्या सवयी म्हणजे स्वाभिमान नसतो काही पण ते जपणं असतं ना त्यालाच स्वाभिमान म्हणत असतील कदाचित.
मला मान्य आहे की हे सगळंच आपल्या कुंपणाबाहेरचं आहे. खिडकीतून हात बाहेर न काढण्याची खबरदारी घेत आपण आपापल्या चौकोनात सुरक्षित आहोत. तू अजाण नाहीस आणि भावनाशून्यही नाहीस. जगरहाटीचं शहाणपणही आहे तुझ्याकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप जास्त. पण काही अंशी .... नाही नाही पूर्णांशी तटस्थ मात्र आपण दोघेही आहोत. पण आपण फक्त सुपात आहोत. जेव्हा वेळ आपल्यावर येईल तेव्हा आत्ता जात्यात असणारे आणि तेव्हा सुपात असणारेही, "राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" असा रोखठोक सवाल उभा करतील. आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल. पण काळजी करू नकोस, तेव्हाही मी तुझीच बाजू घेईन.
आता मी हे असं काहीतरी बोलतो कारण तुझ्याशी बोलताना शब्द मोजून मापून बोलण्याचा ताण नसतो मनावर. आणि बोलून दम लागला की असं मध्यात तोडलं तरी चालतं तुला.
मी अस्तित्वाच्या जाणिवेला संवेदनेचा स्पर्श करतो आणि वेदनेची जी वर्तुळे उठतात ती कुठेतरी तुझ्या काठावर पोचतील आणि तिथून उमटणारी प्रतिक्रियेची वर्तुळे एकमेकांत गुंफत परत माझ्यापर्यंत उचंबळून येतील असं मला उगचच वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. ती वेदना तुझ्यापर्यंत पोचतच नाही का तुझ्या संशयाच्या भोवर्यात ती केविलवाणी होत नाहीशी होते कदाचित. मी मधूनच नारायण सुर्व्यांप्रमाणे लेखणीचे बंड उभारून "सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे" च्या थाटात काहीतरी लिहून जातो आणि तुला वाटतं की मी मोझेसचा बुरखा घालून उपदेशाचे दहा खिळे तुझ्य़ा स्वातंत्र्याचा सीमेवर ठोकणार आहे. पण त्या सर्व लिखाणात मी आणि तू असा दुजाभाव राखलेला नसतो. मी काही सांगतोय आणि म्हणून तू ते ऐक अशी अपेक्षाही नसते तिथे. मी फार शहाणा आणि तूच नाठाळ असा भाव त्यामागे नसतो. तो सगळा माझा माझ्याशी चाललेला प्रतिवाद असतो. तरीही मला तो तुझ्यापर्यंत पोचवायचा असतो जसाच्या तसा. कारण तो चालू असताना तुझ्या तिथे असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. तुझ्या सहभागाची अपेक्षा असतेही कधीकधी पण हट्ट मुळीच नसतो. तुझी नुसती मूकपणे दिलेली साक्षही पुरेशी असते. कारण माझे विचार माझ्या भावनांना फितूर होऊन मी माझ्याकडून फसवला जाण्याची भीती मला भावनाशून्य आणि विचारहीन बनवते कधी कधी, तेव्हा दहा मिनिटं थांबून शिळोप्याच्या गप्पा मारायला कोणी तिथे असलं तरी मला चालणारं असतं.
जेव्हा काहीतरी अस्वस्थ करणारं वाचतो, बघतो तेव्हा प्रश्नांचं एक वादळ उठतं जे स्वतःलाच निर्ढावलेला षंढ म्हणून आरोपीच्या पिंजर्यात उभं करतं. त्या रागानेच शब्दांना कधी धार चढते पण त्यात कोणाला दुसर्याला दुखावण्याचा हेतू नसतो आणि तुला तर नाहीच नाही. पण वाटतं कदाचित तुझ्य़ाकडे उत्तरं असतील तर मला परत त्यावर विचार करायची गरज नाही. आणि जर उत्तरं नसतील आणि असे प्रश्न तुझ्याही डोक्यात उठत असतील तर....
प्रश्नांना प्रश्न जोडून त्यांचं अर्धुक इतकं विस्तारावं की आकाशाला नेऊन भिडवावं. मग कदाचित उत्तरं जागोजाग उगवतील झाडाझाडातून अगदी जसं की ग्रेस त्या कवितेत उगवतो- झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया!
माझी व्यथा वेदनेचं रूप घेऊन येते एखाद्या हळव्या क्षणी पण चिंता होऊन डोक्यावर बसत नाही. कारण ’चिंता करतो विश्वाची’ म्हणत कपाटात स्वतःला बंद करून घ्य़ायचं धाडस नाही माझ्यात. ते ओझं सहन होण्य़ाची कुवत नाही आपल्यात अशी भीती असेलही कुठेतरी पण त्याहीपेक्षा तू मला शोधत दार उघडशील की नाही याची शहानिशा नाही करायची मला. पण मग अशावेळी डोळ्यांनी दगा दिलाच आणि एखादा दर्द गझल न होताच टपकला बाहेर तर तुझ्यासाठी त्याचा तमाशा का व्हावा?
मला मान्य आहे की हे सगळंच आपल्या कुंपणाबाहेरचं आहे. खिडकीतून हात बाहेर न काढण्याची खबरदारी घेत आपण आपापल्या चौकोनात सुरक्षित आहोत. तू अजाण नाहीस आणि भावनाशून्यही नाहीस. जगरहाटीचं शहाणपणही आहे तुझ्याकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप जास्त. पण काही अंशी .... नाही नाही पूर्णांशी तटस्थ मात्र आपण दोघेही आहोत. पण आपण फक्त सुपात आहोत. जेव्हा वेळ आपल्यावर येईल तेव्हा आत्ता जात्यात असणारे आणि तेव्हा सुपात असणारेही, "राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" असा रोखठोक सवाल उभा करतील. आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल. पण काळजी करू नकोस, तेव्हाही मी तुझीच बाजू घेईन.
आता मी हे असं काहीतरी बोलतो कारण तुझ्याशी बोलताना शब्द मोजून मापून बोलण्याचा ताण नसतो मनावर. आणि बोलून दम लागला की असं मध्यात तोडलं तरी चालतं तुला.
Saturday, June 13, 2009
रोता सूरज, जलता सूरज
कोण ते टिळक, गांधी, नेहरू, आझाद, पटेल, आंबेडकर?
आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला लोकशाही दिली
"अरेरे साहेब गेला! तो होता तेच भलं होतं" असं आम्ही चारचौघात म्हणू शकतो इतपतच काय ती आमची लोकशाही-
आम्ही काय मनात येईल ते बोलू शकतो. आणि काहीही न करता बसू शकतो. आणि का नाही? आम्ही रामायणं लिहीत नाही नुसती तर ती घडवतो महाराजा.
बाकी चोर्यामार्यापुरते आम्ही वाल्याचे वारस.
वाल्मिकी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही परंपरेशी नाळ तोडून
आधुनिक म्हणवायला मोकळे- शेपट्या उडवत. कोणाच्या शेपट्या? थांबा थांबा बोलू नका. लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. आजकाल शेपट्यांच्याही वाटण्य़ा झाल्यात. मालकासमोर हालवता झुलवता येत नसतील तर मग नुसत्याच पायात घाला. उरल्याच का तरीही? मग छाटून टाका.
आम्ही खुश होतो. का तर मिलीजुली सरकार... जरा एकमेकांचा वचक राहील. एकाची सद्दी नको बुवा. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ. आता आम्ही खुश येवढ्यासाठीच की एकसंध सरकार आलं. तुकड्या तुकड्याचं नको. पायात पाय अडकून तोंडघाशी पडणं नको. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ.
पण कुठला अनुभव कधी बरा होता? सांगा ना?
कोण दगड? कोण वीट? सांगा ना?
शेवटी आपल्या हाती काय- दगड आणि विटा!
कोणीतरी आपल्या डोळ्यात धूळफेक करायची
आणि मग आम्ही मोकळे एकमेकांवर दगडफेक करायला
तुमचा पक्ष कोणता? तुमचा गट कोणता?
तुमचा कोण? राम, नानक, बुद्ध, अल्ला की येशू?
का या यादीत नसलेले किंवा असलेले कोणी?
आम्ही बुवा शिकलेले.
गट नसलेल्यांच्या गटातले, धर्म नसलेल्यांच्या धर्मातले
आमचा कशाशीच संबंध नाही. आम्ही तटस्थ.
नेरोनी रोममधे माणसं जाळली जिवंत तेव्हा आम्ही तटस्थ होतो
डायरचं जालियनवाला झालं तेव्हाही आम्ही तटस्थ होतो
आणि अशा कित्येक घटना घडून गेल्या मधे
आणि आता कित्येक घडताहेत प्रत्येक दिवशी पण आम्ही तटस्थ
काहीच कसं करत नाही म्हणता?
आम्ही बोलतो ना- संयमाने, संतापाने, पोटतिडकीने
आम्ही लिहीतो ना असं काही तरी- गुळमुळीत, खुसखुशीत आणि जळजळीतही
आणि स्वप्न बघतो हे सगळं बदलण्याची
कायदा आहे ना हे सगळं बदलायला.....
कायदा समाज व्यवस्था बदलू शकत नाही
कारण कायद्याला पळवाटा असतात.
कायदा फक्त समाजव्यवस्था राखत असतो.
त्यामुळे समाज व्यवस्थेमधे जे शिखरावर त्यांच्या हाती कायदा, ते म्हणतील तो कायदा. चाबूक गाडीवाल्याच्या हातात द्या नाहीतर बैलांच्या वळ उठायचे ते उठणारच. कारण ज्याच्या हातात चाबूक तो दिशा ठरवणार. सोय इतकीच की त्यातल्या त्यात आलटून पालटून मार खा आणि दिशा बदलत दिशाहीन वाटचाल करत रहा. त्यातच आम्हाला लोकशाहीचे सार्थक झाल्याचे समाधान
***
सूरजको भी रोते हुए यहाँ हमनें देखा है ।
पहली किरण की मौत होते यहा हमनें देखा है ।।
चांदनीसे झुलस गयी रात कितनी काली है ।
चंदा के माथेपर किसने लिखी हुई एक गाली है ॥१
आधा खाया आधा छोडा बरगद अकेला खडा है ।
भूखा प्यासा काला बादल पत्थर होके पडा है ।।
मधुशालाके बाहर सुस्ताया काला जहरीला सपना है ।
जिसने अपना खून पिया वह समय भी तो अपना है ।।२
लंगडी, अंधी, काली बिल्ली रास्ता रोके खडी है ।
मंदिरसे निकली बूढी चुडैल दीवारोंपर चढी है ।।
रोशनीमे टंगी परछाई सायेसे भी डरती है ।
नसीब बुननेवाली मकडी जाल में फसकर मरती है ।।३
भीष्म-द्रोण की मुंडी काटे दुर्योधन सब झूम रहे हैं ।
दधीचि की हड्डी लेकर पागल कुत्ते घूम रहे हैं ।।
कुरुक्षेत्रका वस्त्र माँगकर सूतपुत्र पछताया है ।
पांचजन्यकी राह देखकर रण में अर्जुन सोया है ।।४
पलकें जलकर राख हो गयी
पडा हुआ था लकडी बनकर ।।
आएगा आएगा गिरिधर
नवजीवन की वर्षा लेकर ।।५
क्षितीज किनारे आँखे डाले कितने ही युग बैठा था ।
बैठा था; बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा.........
.

Saturday, June 06, 2009
आवर रे सावर रे.....
स्निग्ध संधिप्रकाशाच्या आडोशाला लपली होती अभिसारिका रजनी!
वासरांच्या पापण्या मिटू लागल्या तशी ती रात्र मेघांचं अवगुंठन दातांत धरून हलक्या पावलाने पुढे आली. तूही तशीच आलीस सभागारात, शरावतीच्या तरंगांच्या जीवघेण्या संथ लयीत.
इंदीवर कमळासारख्या निळ्या रंगाचं लज्जावस्त्र ओढून. आज म्हणे त्या सुप्रसिद्ध पखवाजियाचा सारा अभिमान आपल्या नृत्यकौशल्यानं उतरवून टाकण्याचा पण केला होतास तू.
’माझ्या वादनाच्या गतीच्या तोलाची नर्तिका अजून जन्मली नाही’
हे त्याचे बोल ऐकलेस तेव्हा खदिरांगार उतरला होता म्हणे तुझ्या डोळ्यांत.
स्वीकारलंस ते आवृत्त आव्हान!
आतल्या अग्निशिखेचा तो दाह शमवायला का गं अशी शीतल निळाई लेवून आली होतीस? सभेला वंदन करण्यासाठी एका लयदार झोक्यात तू ते अंशुक दूर केलंस आणि तुझ्या डोळ्यांतल्या किरणप्रभेनं दीपून गेलो मी.
पण पखवाजावर स्थिरावलेल्या हातांचा स्वामी शांत होता.
एक अभिनिवेशी हास्य त्याच्या चेहर्यावर विसावलं होतं.
कत् धि ट धि ट, धा - ,ग ती ट, ती ट ता -
गम्भीर बोल उमटले त्याच्या मुखातून.
तू हातांचा नागबंध कानाशी नेऊन अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतीस भुवया उंचावून.
धमार!
क्षणैक लवलेली तुझी मान आणि लगोलग सुरू झालेला तो पदन्यास.
एकेका तुकड्यासरशी त्याच्या हातांची गती वाढत होती आणि तुझे पाय सहजपणे त्या गतीवर विहरत होते.
तू कथा सुरू केलीस...
एकपट.
तो भांडून तंटून निघून गेला आहे..ती सुन्न, विमनस्क बसून आहे तरुतळी.
दुप्पट.
थरथर..दाह.. ती उठते..त्यांचं गूज ठाऊक असलेल्या वेलीवेलीला, पानापानांना विचारू लागते..असाकसा निघून गेला तो मला एकटीला टाकून?
चौपट..
वर्तुळाकार घुमणं तिचं..काय करू? कुठे शोधू?..ये ना, सख्या ये ना..सजणा, जिवीच्या जिवलगा.. माझ्या अमृतमय प्राणा, ये ना!
पखवाजियाच्या हातांमध्ये दाहक कली शिरला. त्या शांत मुद्रेवरचं हास्य कधीच विरलं. भरून आले त्याचे डोळे. देवचार अंगात शिरल्याप्रमाणे तांडव सुरू झालं पखवाजाच्या गालांवर.
तुझ्या कपाळी स्वेदबिंदू डबडबलेले. पण तरीही नाचतच होतीस तू धूम्रवेलीसारखी वेगात..वेगात..अजून वेगात!
पण नाही साहवत आता..तिचा चेहरा बोलत होता..नको अंत पाहू..
डोळे मिटण्यापूर्वी एकवार दर्शन दे.. केवळ एकवार!
धूम्रवेल थरथरली..तू आता कोसळणार!
पण समेवर त्या एका क्षणात तुझी त्याच्याशी दृष्टभेट झाली...
तुझ्या डोळ्यांची आभा आणि त्याच्या डोळ्यांचं पाणी
एक इन्द्रधनू प्रकट होताना मी पाहिलं!
पुनश्च एकपट.
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे
स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे
पावसाचे मोती येती गंधवती माती
ओलावला वारा सारा थरारती पाती
दिशा कशा वेड्यापिशा झालेनासे कळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे
आकाशीच्या कपाशीच्या वाती राती निळ्या
अंधाराच्या गंधाराला प्रकाशाच्या कळ्या
पुनवेच्या चांदण्याला पंचमीचे झुले

कोकिळेला गळामिठी मारव्याची खूण
भ्रमराच्या अधरावर मकरंदी ऋण
चंदनाच्या झाडालागी प्राजक्तीची फुले

अधीर तरू मदिर झरे मोहरली काया
रानी वनी जपे कानी आठवांचा फाया
केतकीच्या बनी मनी कस्तुरीचे मळे

..

Tuesday, May 26, 2009
खुशाल आलो घरटे मोडून
सगळं सोडलंस म्हणतोस? अगदी सगळं?
प्रत्येक सूत, प्रत्येक धागा, प्रत्येक नातं, प्रत्येक प्रेम, प्रत्येक द्वेष... सगळं.
मग तो आत्ताचा उसासा......
सगळ्या जगाला माफ केलंस पण स्वतःला केलंस का मुक्त त्या एका अपराधातून? का म्हणूनच घेऊन आलास ते मातृत्वाचं स्वप्न कोणाच्या नकळत? मला माहीत आहे- हा सृजनाचा ध्यास त्याशिवायचा नाहीच मुळी.
नवीन जमीन कसतोयस. नवी सृष्टी स्थापतोयस. नवा कसा वसवतोयस. नव्यानं जगायचं म्हणतोयस- त्या एका अपराधाला कुशीला घेऊन. पेर, पेर ते दुःख प्रत्येक नव्या स्वप्नाच्या मुळाशी. ती तांबडी आई ’नाही’ नाई म्हणायची. सगळं पोटाशी घेईल आणि फक्त आनंद देईल भरभरून. आई अशीच असते रे! ती नाही राग ठेवायची मनात.
तू काय ओळखत नव्हतास तुझ्या आईला? पण कर्तव्य मोठं असतं असंच शिकलास तू. तिनंच तर शिकवलं होतं. त्या कर्तव्यापोटी तर घाव घातलास त्या कल्पद्रुमेवर आणि मग नंतरच्या एका वणव्यात सगळं घरटच जळालं. तू सार्या जगावर रागेजलास. जळालेल्या एकेका काटकीसाठी सूड घेत राहीलास परत परत. जळत राहिलास आतल्या आत. जाळत राहिलास पुन्हा पुन्हा. एकवीस वेळा.
त्या वणव्याचा सूड तर कधीचाच संपला होता घेऊन पण तरी ती आग काही शमत नव्हती. रागाचा भडका उडतच होता आणि परत एकदा त्याचा स्फोट झाला. इतका जिवापाड जपलेला तो शिवांश, तो काय पोरखेळ आहे की खेळायला घ्यावं अन मोडावं. तू परत एकदा विनाश यज्ञाचे आवर्तन आरंभायला सज्ज झालास.
पण तो शाम वर्ण, ते करुणामय डोळे...
काय जादू केली त्याने कोण जाणे? सगळा अंगार शमला. धग शीतल झाली. राखेचा जणू चंदन लेप बनला.
मागे उरलं फक्त त्या एका घावाचं दुःख! सगळ्या संहाराला पुरून उरलेलं दुःख! ते विनाशानं उद्ध्वस्त होणारं नव्हतं, ते अनुतापानं विरघळणारंही नव्हतं. एकच मार्ग होता- सृजनाचा. आणि तू सगळं सोडून इथे आलास या वैराण भूमीत.
हे द्विजरामा, आता थांबू नकोस.
हा सह्याद्री तुझ्या पाठीशी आहे आणि अख्खा समुद्र त्याच्या फेसाळत्या लाटांनी तुझ्या स्वागताच्या गर्जना करतो आहे. आता मागे वळून पाहणे नाही. थकायला उसंत नाही. हे आभाळभर दुःख या भूमीला वहायचं आहे. आता मुक्तीचा हाच एक मार्ग!
जुनाट काळे कुरतडलेले
खुशाल आलो घरटे मोडुन
धुरकट दुबळे चिंधीचिरगुट,
गडवी- मडकी आलो सोडुन
दृष्टीपुढती अभिनव सृष्टी
उधळी मोती अथांग सागर
इंद्रधनूने महिरपलेले
गगन नव्या स्वप्नांचे आगर
भिती कशाला काळोखाची
मनी जागते नित्य ऊषा
खुणवी तारे खुलवी वारे
दाखवी रवी नित् नवी दिशा
धरेस सीमा क्षितिजाची पण
आकाशाला नाही कुंपण
तमा कशाची तन मन माझे
निळ्या निळाईसाठी अर्पण
पोलादाच्या आकांक्षांना
एकच सलते शल्य बोचरे
पंखावरुनी हात फिरविण्या
माझे नाही कुणीच दुसरे

Subscribe to:
Posts (Atom)