Sunday, September 14, 2008

सवंगडी- २

"चल बंड्या जातो. आज घरी जरा लवकर जायचं आहे." केसामधून कंगवा फिरवत झोंबी थंडपणे म्हणाला. त्याच्या आवाजात कुठेही घाईचा लवलेश नव्हता. बंड्यालाही तितक्याच घाईनं घरी जायचं होतं. म्हणजे ते दोघे अजून पुढचा अर्धा तास तरी त्याच ठिकाणी (रस्त्याच्या कडेला पोस्टाच्या पेटीपाशी) त्याच स्थितीत असणार. त्याच स्थितीत म्हणजे विलंबासनात- एक पाय जमिनीवर, एक पेडल वर आणि बुडाने सायकलच्या दांडीचा आधार दिला घेतलेला; ज्या स्थितीमधे बसल्याने घरी जाण्यास कायम विलंब होतो: इति झोंबी. आज त्याना येऊन १५ मिनीटे होवून गेली तरी कोणीच पत्ता विचारायला आले नाही. कसलं बोअरींग....
"चल बंड्या जातो"
"का रे तुला पहायला मुलीकडचे येणारेत का?" खिशावरचा शाईचा डाग दप्तराच्या बंदाने कसा लपवता येईल या प्रयत्नात जराही खंड न पडू देता बंड्याने मराठीच्या पाध्ये सरांच्या आवाजात विचारले.
"आरे छट! मामा येणार आहे."
"म्हण्जे तसच काहीसं"
"बंड्या दात घशात घालीन."

"इथे खुन्या मुरलीधराचे मंदीर कुठेशी आहे?" समोरून आलेल्या बकर्याने भांबावलेल्या चेहर्याने विचारले.
बंड्याने टारगटपणे झोंबीकडे बघीतले. झोंबी अतिशय निरागस चेहरा करून म्हणाला, " असेच सरळ जा पैसे खाऊ एकबोट्यांचा मोठा बोर्ड लागेल, मग उजवीकडे आणि दोनदा डावी कडे वळा म्हणजे पोलीस चौकी लागेल. तिथे विचारा कोणालाही. कालच कोणाला तरी पकडलं आहे रस्त्यावर पत्ता विचारणार्याचा खून केला म्हणून."
तो अजूनच भांबावला आणि पुढे चालायला लागला.
तेवढ्यात पाठीमागून आलेल्या मारूतीने शिमगा केला. बंड्या उगचं कलल्यासारखा झाला. परत होर्न वाजला. हे दोघे काही हालेनात बघून गाडीच्या खिडकीतून एक डोकं बाहेर आलं. " रस्ता काय तुमच्या बापाचा आहे होय रे!"
बंड्याने थंडपणे हात वर करून लोकशाही वाचवण्यासाठी मतांचं आवाहन करणारं पोस्टर फाडलं आणि त्या खालचा एकेरी वाहतूकीचा फलकाकडे हात दाखवला. मारूतीवाला स्वतःशीच चिडचिड करत निघून गेला.

"काय रहमतचाचा, आज उशीर झाला?"
"आज रस्त्यात बंदर जास्त भेटले"
"झोंबी कुल्फी खाणार काय?"
गाडीवरची घंटा वाजवायचं थांबून झोंबीनं नाक मुरडलं. "नको सर्दी झालीय"
"चाचा दो के दो देना" आणि बंड्यानं खिशातून चार रूपये काढून दिले. एक कुल्फी झोंबीच्या हातात कोंबली
"खा साल्या फुकटची कुल्फी बाधणार नाही" यावर दोघेही हासत सुटले. चाचानी पण घंटेच्या आवाजाची साथ दिली.
तेवढ्यात आगीचा एक बंब चौकातून ठणाणा करत पुढे गेला. दोघांनीही घाईनं कुल्फी संपवली. काड्या पोस्टाच्या पेटीत टाकल्या आणि जीव खाऊन सायकल हाणत आगीच्या बंबाच्या मागे कानात वारं शिरल्यागत सुसाट सुटले.
*******************

ही गोष्ट नाही कारण याला सुरुवात, मध्य आणि शेवट नाही. फारतर याला शब्दचित्र म्हणता येईल. एखादा चित्रकार एखाद्या जागी बसून landscape चितारतो. तसचं काहीतरी. camera च्या भाषेत सांगायचं तर एक shot. याला पुढचा मागचा भाग नाही. प्रत्येक कडी स्वतंत्र आहे. त्यातली पात्रे, स्थान, घटना आणि संदर्भ वेगवेगळे आहेत. पण तरीही एका धाग्य़ने त्याना बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बघू कितपत यशस्वी होतो ते.