Thursday, November 25, 2010

The Champa Flower- V

परवाच केशव येऊन गेला
फारा दिवसांनी आला होता
का रे? आला नाहीस इतक्यात?
म्हणाला- कामात होतो
आठवतं याच्या मुंजीच्या वेळी...
आठवणींच्या पाखरांनो
दमला असाल गाता गाता
मधाळ गाणं पुरे आता
आता तरी जाऊ द्या
आभाळ होऊन पाहू द्या
सुमीच्या लग्नात तिच्या मावस नण्देची ओटी भरायची राहून गेली
देणी घेणी जिथली तिथे
हात रिते मन रिते
उणीदुणी राहू द्या
निर्मळ गंगा वाहू द्या
भाऊ, माझ्या चाफ्याला तेवढं पाणी घाल बाबा नेमाने
चाफ्याच्या झाडा,
तुला एकदा पहायचं होतं
एकदा रडून घ्यायचं होतं
वसंत कधी खुलला होता
जीव कधी भुलला होता
गुपित तसंच राहू दे
राख होऊन जाऊ दे
चिमखडी राधा सकाळी फुलं देऊन गेलीय
फुलदाणीत ठेवायला हवीत
ओंजळ थकलीय, फुलांनी वाकलीय,
फुलंही सुकलीयत,
औषधांचा वास येतोय त्यांनाही...

***
The Champa Flower चं सत्र सुरू केल्याला बरेच दिवस झाले. हे त्यातलं पाचवं फूल आणि शेवटचं. अजून थोडं लिहीता आलंही असतं पण काही चाफ्याच्या कळ्या न उमलता तश्याच राहू दे. रवींद्रनाथांच्या एका कवितेच्या स्वैर अनुवादातून या सत्राची सुरुवात झाली आणि मग चाफ्याच्या झाडाचं बदलत जाणारं नातं उलगडत नेण्याचा प्रयत्न करून पाहिला.  ही त्यातली शेवटची कविता.

ही कविता वाचून सखी म्हणाली, "एकदम अर्ध्यात खुडल्यासारखी वाटते आहे". पण तेच मला अपेक्षीत आहे. त्या वयात आणि त्या परिस्थितीत सगळ्या आठवणी आणि इच्छा सोडायच्याही असतात आणि धरायच्याही असतात. त्यात सुसूत्रता नसते आणि एकवाक्यताही नसते.

आठवणींचा गोफ विणला जात असतो; मधेच वर्तमानाची सतर्कता डोकावून जाते आणि मधेच औषधांची गुंगी आपला हक्क बजावत असते. तसेच काहीसे आहे इथेही. ही कविता परिस्थितीचं पूर्ण वर्णन करत नाही तर काही तुकडे समोर मांडते आहे.

हा प्रवास संपत नाही, तर परत आणून सोडतो पहिल्या कवितेशी जिथे आपण सुरुवात केली होती.