Thursday, July 23, 2009

वेदनेची अर्धुके..

का? असं का व्हावं?
मी अस्तित्वाच्या जाणिवेला संवेदनेचा स्पर्श करतो आणि वेदनेची जी वर्तुळे उठतात ती कुठेतरी तुझ्या काठावर पोचतील आणि तिथून उमटणारी प्रतिक्रियेची वर्तुळे एकमेकांत गुंफत परत माझ्यापर्यंत उचंबळून येतील असं मला उगचच वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. ती वेदना तुझ्यापर्यंत पोचतच नाही का तुझ्या संशयाच्या भोवर्‍यात ती केविलवाणी होत नाहीशी होते कदाचित. मी मधूनच नारायण सुर्व्यांप्रमाणे लेखणीचे बंड उभारून "सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे" च्या थाटात काहीतरी लिहून जातो आणि तुला वाटतं की मी मोझेसचा बुरखा घालून उपदेशाचे दहा खिळे तुझ्य़ा स्वातंत्र्याचा सीमेवर ठोकणार आहे. पण त्या सर्व लिखाणात मी आणि तू असा दुजाभाव राखलेला नसतो. मी काही सांगतोय आणि म्हणून तू ते ऐक अशी अपेक्षाही नसते तिथे. मी फार शहाणा आणि तूच नाठाळ असा भाव त्यामागे नसतो. तो सगळा माझा माझ्याशी चाललेला प्रतिवाद असतो. तरीही मला तो तुझ्यापर्यंत पोचवायचा असतो जसाच्या तसा. कारण तो चालू असताना तुझ्या तिथे असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. तुझ्या सहभागाची अपेक्षा असतेही कधीकधी पण हट्ट मुळीच नसतो. तुझी नुसती मूकपणे दिलेली साक्षही पुरेशी असते. कारण माझे विचार माझ्या भावनांना फितूर होऊन मी माझ्याकडून फसवला जाण्याची भीती मला भावनाशून्य आणि विचारहीन बनवते कधी कधी, तेव्हा दहा मिनिटं थांबून शिळोप्याच्या गप्पा मारायला कोणी तिथे असलं तरी मला चालणारं असतं.

जेव्हा काहीतरी अस्वस्थ करणारं वाचतो, बघतो तेव्हा प्रश्नांचं एक वादळ उठतं जे स्वतःलाच निर्ढावलेला षंढ म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतं. त्या रागानेच शब्दांना कधी धार चढते पण त्यात कोणाला दुसर्‍याला दुखावण्याचा हेतू नसतो आणि तुला तर नाहीच नाही. पण वाटतं कदाचित तुझ्य़ाकडे उत्तरं असतील तर मला परत त्यावर विचार करायची गरज नाही. आणि जर उत्तरं नसतील आणि असे प्रश्न तुझ्याही डोक्यात उठत असतील तर....
प्रश्नांना प्रश्न जोडून त्यांचं अर्धुक इतकं विस्तारावं की आकाशाला नेऊन भिडवावं. मग कदाचित उत्तरं जागोजाग उगवतील झाडाझाडातून अगदी जसं की ग्रेस त्या कवितेत उगवतो- झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया!

जेव्हा आरती प्रभू गाण्यातून ऐकत असतो आपण. आता उशाचा दगड मधे आशाताई असा काही जीवघेणा खर्ज लावते, जो बाळासाहेबांनी अगदी तासून बसवलेला असतो तिथे. आणि तरी गुलजार-पंचमदाचं मेरा कुछ सामान ऐकल्यासारखं फक्त विरहाच्या काठापर्यंतच तुझा प्रवास संपतो तेव्हा मी आक्रंदत असतो ते त्या द्यायचे राहून गेलेल्या नक्षत्राच्या देण्याबद्दल. मी बोलत असतो ते त्या व्यथेबद्दल ज्या का कोण जाणे पोचतच नाहीत तुझ्या पर्यंत. आणि माझ्य़ापाशी उरतात काही कळ्य़ा आणि कोवळी पाने.........

माझी व्यथा वेदनेचं रूप घेऊन येते एखाद्या हळव्या क्षणी पण चिंता होऊन डोक्यावर बसत नाही. कारण ’चिंता करतो विश्वाची’ म्हणत कपाटात स्वतःला बंद करून घ्य़ायचं धाडस नाही माझ्यात. ते ओझं सहन होण्य़ाची कुवत नाही आपल्यात अशी भीती असेलही कुठेतरी पण त्याहीपेक्षा तू मला शोधत दार उघडशील की नाही याची शहानिशा नाही करायची मला. पण मग अशावेळी डोळ्यांनी दगा दिलाच आणि एखादा दर्द गझल न होताच टपकला बाहेर तर तुझ्यासाठी त्याचा तमाशा का व्हावा?

तुला असं का वाटतं की मला विनोद कळत नाही? आठव बरं तूच - असं कधी झालंय का पूर्वी, की चेष्टा-विनोदापासून विडंबनापर्यंत मी कधी टाळ्या पिटलेल्या नाहीत? नाक रंगवून विदूषकी चाळे करायचीही तयारी असते आमची. हं पण माकड बनून मदार्‍याच्या टिमकीवर नाचण्याचा उपहास नाही सोसत. आता त्याला काही स्वाभिमान वगैरेचं नाव देऊन उगच मोठं करायचं नाही मला. पण काही सवयी जपतोच ना आपण जिवापाड! त्या सवयी म्हणजे स्वाभिमान नसतो काही पण ते जपणं असतं ना त्यालाच स्वाभिमान म्हणत असतील कदाचित.

मला मान्य आहे की हे सगळंच आपल्या कुंपणाबाहेरचं आहे. खिडकीतून हात बाहेर न काढण्याची खबरदारी घेत आपण आपापल्या चौकोनात सुरक्षित आहोत. तू अजाण नाहीस आणि भावनाशून्यही नाहीस. जगरहाटीचं शहाणपणही आहे तुझ्याकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप जास्त. पण काही अंशी .... नाही नाही पूर्णांशी तटस्थ मात्र आपण दोघेही आहोत. पण आपण फक्त सुपात आहोत. जेव्हा वेळ आपल्यावर येईल तेव्हा आत्ता जात्यात असणारे आणि तेव्हा सुपात असणारेही, "राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" असा रोखठोक सवाल उभा करतील. आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल. पण काळजी करू नकोस, तेव्हाही मी तुझीच बाजू घेईन.

आता मी हे असं काहीतरी बोलतो कारण तुझ्याशी बोलताना शब्द मोजून मापून बोलण्याचा ताण नसतो मनावर. आणि बोलून दम लागला की असं मध्यात तोडलं तरी चालतं तुला.