Tuesday, January 26, 2010

The Champa Flower- IV

सुनीताबाई गेल्या... शनिवार होता तो. ना त्यांच्या प्रकृती-अस्वास्थ्याची बातमी पसरत राहिली ना त्या गेल्या त्याचा काही गाजावाजा झाला. समईच्या वातीसारख्या तेवता तेवता शांत झाल्या. कळलं तेव्हा का कोण जाणे, कोणीतरी अगदी ओळखीतलं अचानक नाहीसं झाल्यासारखी एक पोकळी तयार झाली मनात. राहून राहून त्यांच्या दोन कविता फिरून फिरून ओठांवर येत होत्या. त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेल्या नव्हे पण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या (असे त्यांनीच म्हटले होते)

त्या कविता मी पहिल्यांदा ऐकल्या त्या त्यांनी वाचलेल्या. पु.ल. जाऊन वर्ष झालं तेव्हाच्या ’कवितांजली’ या कार्यक्रमात त्यांनी त्या सादर केल्या अगदी ... शेवटच्या दोन. तो काव्यवाचनाचा कार्यक्रम सुंदर आहेच पण त्या दोन कवितांचं सुनीताबाईंनी केलेलं सादरीकरण हे केवळ अविस्मरणीय आहे. दोन्ही कविता पद्माबाईंच्या आहेत. पण त्या आपल्या कशा झाल्या याचा खुमासदार किस्सा सांगून पुढे त्या कविता सुनीताबाईंनी समोर जिवंत उभ्या केल्या आणि त्या खरंच त्यांच्या झाल्यासारख्या वाटल्या.
कार्यक्रमाचा शेवट केला तो या कवितेने-

आताशा मी नसतेच इथे..
जरी माझी इथे ये जा असली तरी
आताशा मी नसतेच इथे

मला तोपर्यंत माहीत नव्हतं की कविता वाचतानाही रागदारीसारख्या मोक्याच्या जागा घेता येतात आणि ऐकणार्‍याच्या तोंडून आपसूक दाद बाहेर पडते. काही जागा कवीने घेतलेल्या असतात : कविता वाचताना त्या अधिक खुलवून दाखवाव्या लागतात
आणि काही जागा कविता वाचणारा स्वतः निर्माण करत असतो. त्यातून किती तरी नवे अर्थ तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या कवितेत किती तरी जागा अशा होत्या की अंगावर सरसरून काटा यावा..

सोबत ना? आहे की आपल्या त्या यांची...
नावही आहे त्यांना, पण मला ना आता काही आठवतच नाही
किंवा
ते काठाकाठाने जे निर्माल्य वाहताय ना
त्यात आणि त्याच्या ताज्या ताज्या स्वप्ना
किंवा
वस्त्रं कधीचीच गेलीयेत कदंबावर अंतरपाट व्हायला
मी झालीय एक गाणं निळ्या नदीत वाहणारं

ते निळं गाणं थांबलं आता.. ही शांतता हुरहूर लावणारी आहे.
*****

चाफ्याच्या झाडाचं हे सत्र जसं सुरू केलं तेव्हापासून राहून राहून त्या दोनपैकी एका कवितेची आठवण येते आहे. ही कविता पद्मा गोळ्यांची आहे आणि सुनीताबाईंनी आधीच आपला हक्क त्यावर नोंदवला आहे. तरीही या साहित्याचे जे कोण प्रकाशक असतील त्यांची माफी मागून ही कविता इथे नोंदतो आहे. या कवितेखेरीज चाफ्याचा हा दरवळ अधुरा आहे... बाईंनी भरून ठेवलेली ही फुलांची ओंजळ....
यातील
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
इथे सुनीताबाईंनी घेतलेली ’कळतंय ना’ वरची तिहाई... वेदनेत रुतत जाणारी.
आह!

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं
दु:ख उरलं नाही आता मनात

फुलांचा पांढरा पानांचा हिरवा
रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी
मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळखीच्या तालात ओळखीच्या सुरात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं
ओंजळ फुलांनी भरलीय ना
- पद्मा गोळे

Sunday, January 17, 2010

The Champa Flower- III

मी किनै मनोर्‍यांच्या जंगलात रहाते.. उंच.
सगळंच काही निराळं आहे इथे. पण-
आई, कधी घरची आठवण आली ना
की या तेलकट धुरालाही सोनचाफ्याचा वास येतो
छान बहरला असेल नाही तो आता?
दिनूला सांग ते बयोचं घरटं मोडू नकोस
आताशा जाग आली असेल त्यात
त्या चिवचिवाटानं तुझा रितेपणा भरून निघेल थोडा.

पाण्याचा जागता आसरा नसला तरी
घरबसल्या भेटीला येतं नियमित
दुरून आणावं नाही लागत
समुद्र आहे म्हणे इथे
पण शांतपणे पाय पसरायला किनारा नाही बघ.
मिन्टामिन्टाला आगगाडी धावते आणि
सगळे तिच्या मागे धावत असतात
घाई आणि गर्दी मुक्कामालाच असते

मी खूप सुखात आहे.
घरात एक अंगण सोडलं तर कशाला कमी नाही बघ
आई, तुला माहीतेय!
माझ्या खोलीचं एक दार किनै आभाळात उघडतं
घराची छोटीशी फांदी हात बाहेर काढून
आकाशाच्या तळहातावर पसरते
तिथेच मी चार रोपट्यांत माझं अंगण साठवलंय
रात्री दिवे खूप छान दिसतात तिथून

माझं आता काही नाही गं तिकडे
दान एकानं दिलं दुसर्‍यानं घेतलं
पण वेडं आठवणींचं पाखरू येतं अजून तिकडे
दारात वाकलेल्या फांदीवर- घटकाभर
म्हणून म्हणते गं आप्पांना म्हणाव
हौद बांधा की हवा तिथं
पण
तो सोनचाफा तोडायचं तेवढं राहूद्यात...

The Champa Flower- II

परवा पूजा करून चाफ्याकडे निघालेल्या
दिनूला केवढ्यांदा ओरडलीस,
"तुळशीत वाहव ते पाणी, चाफ्याला घालू नकोस!"

तुझी चाफेकळी आता बहराला आलीय.
आई, म्हणून का गं पाखरं घराकडे यायच्यावेळी
तुझ्या डोळ्यात अशी सांज उतरून येते?
तुळशीपुढे दिवा लावताना
रामरक्षेचा तुझा कुटुंबवत्सल सूर कातर होतो आताशा
विचारांना पाय फुटतात आणि त्याच त्याच वळणाशी
परत परत ठेचकाळतात.

तुझ्या चाफ्यावर वसंत उतरला यावेळी
सोनपाकळ्या आभाळभर झाल्या
तशी तू अस्वस्थ झालीस
पावसाआधीच वैशाखात तू कधी नव्हे ते
परसाला कुंपण घालवलंस.

भर पावसात स्वतःचं म्हणून तांब्याभर पाणी घालणार्‍या
तुझी छाती भरून येते अभिमानाने
जेव्हा नवी पालवी फुटते दरवेळी -
पण अवेळी आलेल्या मुक्तछंद वार्‍यावर
पानं झुलू लागतात, फुलं खुलू लागतात तशी
तुझी सारी काळजी एकवटून टपकतो एखादा थेंब!

तुझ्या गालावरून ओघळलेला तो थेंब
जन्मभरासाठी जाणिवेचं गोंदण झालाय गं
अंगणात ही मुळं खोलवर गेलीयेत
काही झालं तरी
आई,
तुझ्या चाफ्याचं निर्माल्य नाही होऊ देणार मी

****

The Champa Flower- I या रवींद्रनाथांच्या कवितेच्या स्वैर अनुवादात आलेलं नातं- आई आणि मुलीचं.
त्या कवितेतून जन्माला आलेली ही कविता. जसं वय वाढतं तसं प्रत्येक नात्यातील रंग बदलत जातात. आधीच्या निरागस नात्याला सामजस्याचा आलेला हा निराळा रंग. यात रवींद्रनाथांच्या अनुकरणाचा प्रयत्न नाही. कारण या कवितेची धाटणीही वेगळी आहे आणि माझी तशी योग्यताही नाही.