Monday, November 03, 2008

पुन्हा तेच

सूर्याचे ते नीत्याचे
येणे जाणे
रंगीत गाणे
अन चंद्राचे महिनाभर
लहान मोठे
खरे खोटे
वैषाखाची दर वर्षी
लाही लाही
काही बाही
अन पावसाचा मागोमाग
कस्ला जोर
नस्ता घोर
फलाटाच्या जीन्याखाली
खाणे पिणे
मुके घेणे
अन लोकलच्या डब्यामधे
वाजे टाळ
शीवी गाळ
इराण्याच्या पावावर
कमी भाव
मारी ताव
अन बंदराची खारी बोंबील
ओली सुकी
सारी भुकी

तोच दिवस तीच वेळ
तीच मिसळ तीच भेळ
तोच घाम तीच व्हाण
तेच काम तीच घाण
जुनेच पाप जुनाच गुन्हा
तेच तेच पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा तेच तेच
तेच तेच पुन्हा पुन्हा

Sunday, September 14, 2008

सवंगडी- २

"चल बंड्या जातो. आज घरी जरा लवकर जायचं आहे." केसामधून कंगवा फिरवत झोंबी थंडपणे म्हणाला. त्याच्या आवाजात कुठेही घाईचा लवलेश नव्हता. बंड्यालाही तितक्याच घाईनं घरी जायचं होतं. म्हणजे ते दोघे अजून पुढचा अर्धा तास तरी त्याच ठिकाणी (रस्त्याच्या कडेला पोस्टाच्या पेटीपाशी) त्याच स्थितीत असणार. त्याच स्थितीत म्हणजे विलंबासनात- एक पाय जमिनीवर, एक पेडल वर आणि बुडाने सायकलच्या दांडीचा आधार दिला घेतलेला; ज्या स्थितीमधे बसल्याने घरी जाण्यास कायम विलंब होतो: इति झोंबी. आज त्याना येऊन १५ मिनीटे होवून गेली तरी कोणीच पत्ता विचारायला आले नाही. कसलं बोअरींग....
"चल बंड्या जातो"
"का रे तुला पहायला मुलीकडचे येणारेत का?" खिशावरचा शाईचा डाग दप्तराच्या बंदाने कसा लपवता येईल या प्रयत्नात जराही खंड न पडू देता बंड्याने मराठीच्या पाध्ये सरांच्या आवाजात विचारले.
"आरे छट! मामा येणार आहे."
"म्हण्जे तसच काहीसं"
"बंड्या दात घशात घालीन."

"इथे खुन्या मुरलीधराचे मंदीर कुठेशी आहे?" समोरून आलेल्या बकर्याने भांबावलेल्या चेहर्याने विचारले.
बंड्याने टारगटपणे झोंबीकडे बघीतले. झोंबी अतिशय निरागस चेहरा करून म्हणाला, " असेच सरळ जा पैसे खाऊ एकबोट्यांचा मोठा बोर्ड लागेल, मग उजवीकडे आणि दोनदा डावी कडे वळा म्हणजे पोलीस चौकी लागेल. तिथे विचारा कोणालाही. कालच कोणाला तरी पकडलं आहे रस्त्यावर पत्ता विचारणार्याचा खून केला म्हणून."
तो अजूनच भांबावला आणि पुढे चालायला लागला.
तेवढ्यात पाठीमागून आलेल्या मारूतीने शिमगा केला. बंड्या उगचं कलल्यासारखा झाला. परत होर्न वाजला. हे दोघे काही हालेनात बघून गाडीच्या खिडकीतून एक डोकं बाहेर आलं. " रस्ता काय तुमच्या बापाचा आहे होय रे!"
बंड्याने थंडपणे हात वर करून लोकशाही वाचवण्यासाठी मतांचं आवाहन करणारं पोस्टर फाडलं आणि त्या खालचा एकेरी वाहतूकीचा फलकाकडे हात दाखवला. मारूतीवाला स्वतःशीच चिडचिड करत निघून गेला.

"काय रहमतचाचा, आज उशीर झाला?"
"आज रस्त्यात बंदर जास्त भेटले"
"झोंबी कुल्फी खाणार काय?"
गाडीवरची घंटा वाजवायचं थांबून झोंबीनं नाक मुरडलं. "नको सर्दी झालीय"
"चाचा दो के दो देना" आणि बंड्यानं खिशातून चार रूपये काढून दिले. एक कुल्फी झोंबीच्या हातात कोंबली
"खा साल्या फुकटची कुल्फी बाधणार नाही" यावर दोघेही हासत सुटले. चाचानी पण घंटेच्या आवाजाची साथ दिली.
तेवढ्यात आगीचा एक बंब चौकातून ठणाणा करत पुढे गेला. दोघांनीही घाईनं कुल्फी संपवली. काड्या पोस्टाच्या पेटीत टाकल्या आणि जीव खाऊन सायकल हाणत आगीच्या बंबाच्या मागे कानात वारं शिरल्यागत सुसाट सुटले.
*******************

ही गोष्ट नाही कारण याला सुरुवात, मध्य आणि शेवट नाही. फारतर याला शब्दचित्र म्हणता येईल. एखादा चित्रकार एखाद्या जागी बसून landscape चितारतो. तसचं काहीतरी. camera च्या भाषेत सांगायचं तर एक shot. याला पुढचा मागचा भाग नाही. प्रत्येक कडी स्वतंत्र आहे. त्यातली पात्रे, स्थान, घटना आणि संदर्भ वेगवेगळे आहेत. पण तरीही एका धाग्य़ने त्याना बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बघू कितपत यशस्वी होतो ते.

Friday, August 22, 2008

सवंगडी- १

"यडचॅपच आहेस!"
"गेलीस उडत कोंबडी चोंबडी"
"आम्ही नाही बोलत जा"
"रडूबाई कुठली"
"चिडका बिब्बा"
रागानं लाल झालेलं नकटं नाक कानापर्यंत वाकड करत ती गर्रकन वळली.
ओठांवरून आत डोकावणार्या शेंबडाचा खारवा जीभेला झोंबताच त्यानं फुर्रर करत तो घशापर्यंत ओढला.
लंगड्या पिंपळापाशी गेलेली ती.., आगलाव्या मुंगळ्याची रांग दिसताच खाली वाकली. तोंडात थुंकी गोळा करून ती नेम धरून थुंकली. रांग फिसकली. सैरवैर मुंगळे गोलगोल फिरून परत रांगेला लागले.
खुळ्खुळ खुळखुळ
कंबरेला सुतळीने बांधलेली वाढत्या मापाची चड्डी वर ओढत त्याने हातातल्या गोट्यांचा अंदाज घेत सराईत पणे गोट्या रणांगणात पसरल्या.
परकराचा कासोटा मारून ती पुढे सरसावली. गलीपाशी अंगठा रोवत तिने बोटाला ताण दिला आणि मनातल्या मनात पारावरच्या भूताला कौल लावला.
त्याचा श्वास डोळ्यात बुबुळापाशी गोळा झाला. ओढ्यावरची टिटवी कर्कश्य आवाज करत उडून गेली.
आईने घाईनं घरी बोलावलं आहे- यमी सांगून गेल्याला अर्धा तास होत आला होता
सू.. खटाक
परत एक डाव मांडावा लागणार!
*******************

ही गोष्ट नाही कारण याला सुरुवात, मध्य आणि शेवट नाही. फारतर याला शब्दचित्र म्हणता येईल. एखादा चित्रकार एखाद्या जागी बसून landscape चितारतो. तसचं काहीतरी. camera च्या भाषेत सांगायचं तर एक shot. याला पुढचा मागचा भाग नाही. प्रत्येक कडी स्वतंत्र आहे. त्यातली पात्रे, स्थान, घटना आणि संदर्भ वेगवेगळे आहेत. पण तरीही एका धाग्य़ने त्याना बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बघू कितपत यशस्वी होतो ते.

Saturday, July 12, 2008

उशीर

रविंद्रनाथांबद्दल बरेच काही ऐकून होतो. पाठ्यपुस्तकातून त्यांचे धडेही होते आम्हाला. त्यांना मिळालेले नोबेल (जे आता चोरीला गेलेले आहे)- त्याचा अभिमानही कायमचा. त्यांचे शांतिनिकेतन, बिनभिंतींची शाळा, प्रत्यक्ष पाहिली तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यांची पेंटींग्ज, कविता, नाटके, कथा, भाषणे जे जे जसे जसे मिळत गेले तसा तसा वाचत गेलो. ते साहित्य वाचताना आपण अनंत निळ्या आकाशाखाली उभे आहोत, समोर फेसाळणारा समुद्र पसरलेला आहे, खारा वारा लाडीकपणे आपल्या आजूबाजूला घोटाळतो आहे आणि बघता बघता त्यात आपण विरघळून जात आहोत - आपल्या आकाश होण्याचा आनंद सोहळा आपणच लाटालाटांमधून साजरा करत आहोत असा काहीसा अनुभव येत राहतो.
त्यांच्या साहित्याशी माझी पहिली गाठ पडली कधी तरी महाविद्यालयात. घरातल्या आजोबांच्य़ा जुन्या लोखंडी ट्रंकेमधे एक छोटेसे पुस्तक सापडले. हार्ड बाऊंड, मळकट रंगाचे कापडाचे कव्हर. कधीकाळी ते सुंदर आकाशी रंगाचे असावे. त्यावर वेगवेगळे डाग पडलेले, पिवळी पडलेली पाने आणि काही कीटकांनी सहयोगाने बनवलेली ठिपक्यांची कलाकॄती. मला जास्त गंमत वाटली ती त्यावरची किंमत वाचून. किंमत फक्त दोन रूपये. कव्हरवर Trajan च्या देखण्या अक्षरात पुस्तकाचे नाव लिहिलेले- Crescent Moon.
वेळ रात्रीची दोनची. (परीक्षा जवळ आलेली असली की असे अभ्यासाव्यतिरिक्तचे उद्योग मी रात्री सगळे झोपले की करायचो.) मी ते पुस्तक वाचायला घेतले. एकेका कवितेने मला वेड लावायला सुरूवात केली. काही कविता तर मी परत परत चार चारदा वाचल्या. एकेक करत मी साडेतीनच्या सुमारास वाचन संपवले. त्यानंतर माहीत नाही मी किती वेळ तसाच स्तब्ध बसून होतो. तोच अनुभव आकाशात विरघळून जाण्याचा तरीही कणन्‌ कण नाचतोय लाटांवर. लहान मुलांचे काहीही वाचताना त्यात माझे हरवून जाणे आता नित्याचेच. मग ते तोतोचान असो वा डेंजर स्कूल, प्रिय बाईस किवा दिवास्वप्न. पण तो माझा पहिलाच अनुभव.
नंतर कुठेतरी वाचलेला एक प्रसंग असा-
रविंद्रनाथ आपल्या मित्राकडे लंडनमधे उतरले होते. त्यांच्या मित्राने त्यांच्या काव्यवाचनाचा छोटासा कार्यक्रम योजिला. काही मोजक्या इंग्लिश मित्रमैत्रिणींना आमंत्रण धाडले. घरातल्या दिवाणखान्यात तीस चाळीस लोक जमले होते. टागोरांनी Crescent Moon मधल्या कवितांचे वाचन केले. दीडएक तासाचा कार्यक्रम संपला. लोक आपापल्या घरी परतले. टागोरांच्या मित्राला फार वाईट वाटले. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत, कोणी कौतुकाची दाद दिली नाही, नंतर थांबून कोणी काही बोलले नाही. रविंद्रनाथ मात्र शांत होते. पण दुसर्‍या दिवशीपासून जो पत्रांचा रतीब सुरू झाला. तिथे आलेला प्रत्येक जण इतका भारावला होता की प्रतिक्रिया देण्यासाठी काही शब्द नव्हते.
असाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीतही झाला. मग बर्‍याच वर्षांनी काहीतरी लिहिले गेले पण त्याचे मूळ कुठेतरी त्या crescent moon मधे असावे. त्याला कविता म्हणावे की नाही इतपत त्याच्या दर्जाची मला शंका आहे पण तरीही .........
*****************

खरच सांगतो आई मी लवकर येणार होतो
तुझी शपथ मी अगदी लवकर येणार होतो

किनार्‍यावरचा खेळ संपवून मी वेळेवर निघालोच होतो
तर एक मोठी लाट फेसाळत माझ्या पायाशी आली
गुदगुल्या करायला
आणि हे बघ!
काय सुंदर सुंदर शंख शिंपले देऊन गेली
तिथेच थांबला कनू
गोळा करायला शंख
अजून पुढच्या लाटेनं येणारे
पण मी मात्र निघालो येवढेच घेऊन... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई मी लवकर येणार होतो
तुझी शपथ मी अगदी लवकर येणार होतो

निघालो तर सूर्य तिथे समुद्रात बुडत होता
काय लालबुंद झाला होता
अगदी तुझ्या या कुंकवासारखा
मग समुद्रही काय मागे राहणार होता
त्यानेही बदलला रंग- तांबूस केशरी थोडसा अबोली
अगदी तुझ्या त्या साडीसारखा
मी झोपल्यावर जी तू हळूच मला पांघरतेस
बघायचं होतं मला पाणी कसं रंगीत होतं ते
पण मी मात्र तसाच निघालो काही न बघता ..... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

समुद्रही झाकून घेत होता लाटांनी त्याचा रुपेरी किनारा
अगदी जशी तू लपवतेस तुझी पावलं बसल्याबसल्या
आत्तासारखी
येताना वाटेत फक्त वेणूकडे गेलॊ
ती देणार होती ना मला
काचेचे निळेशार मणी या शंखांच्या बदल्यात
तिने खूप शोधले पण मिळालेच नाहीत
मी मात्र तसाच निघालो मणी न घेताच... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

कबूल मला जरा उशीरच झाला
अगदी अंधार पडला काळाकुट्ट
पण मी घाबरलो नाही काई
खरंखरं सांग आहे की नाही मी शूर
कालच्या गोष्टीतल्या राजपुत्रासारखा
चांदोमामा सुद्धा कित्ती मोठा दिसत होता
विचारायचं होतं त्याला
म्हणजे मीही झालो असतो बाबांएवढा मोठ्ठा
अगदी पंधरा दिवसात
पण मी मात्र तसाच निघालो काही न बोलता ... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

मला वाटलंच तू आता रागावली असणार
अगं वळणावरचा विजेचा दिवासुद्धा लागला
मी येते होतो धावत तर एक गंमतच झाली
दिव्यापासची लहानशी सावली
पुढे आलो तर माझ्याहूनही मोठी झाली
मी कितीदा मागे गेलोन्‌ आलो
तरी मला कळलंच नाही
माझीच सावली कधी लहान कधी मोठी होते तरी कशी?
पण मी मात्र तसाच निघालो कळलं नाही तरी ... तुझ्यासाठी
खरच सांगतो आई .................

पण दाराशी आलो तर सावली येवढी मोठी झाली
आणणार होतो तुला दाखवायला
पण ती दारातनं मावेच ना
तू लवकर चल उंबर्‍याशी दाखवतोच तुला
हे काय गं आई,
मगा रागावलीस अन आता हासतेस काय?
उगीच हासतं का कुणी असं वेड्यासारखं?
आणि लवकर मला काहीतरी खायला दे
मला खूप खूप भूक लागलीय
आलो ना आता मी घरी ... तुझ्यासाठी

Thursday, July 03, 2008

शोध

वेड पाखरू पाखरू कुठं संसार मांडेना
किती एकटं एकटं तरी सोबत सांधेना
आला वीणीचा हंगाम पक्षी नवनवे येती
झाली खोपटी सुंदर जन्म गोजीरेही घेती
गतकाळातील स्मृती किती जपशील वेड्या
सखा नवा साद घाली तोड भावनेच्या बेड्या
असा वासंती आग्रह कसा मोडशील आता
सृष्टी उधळीत आहे रसगंध येता जाता
नाही संगत सोबत नुस्ती नजरांची भेट
अशी दुनियेनिराळी कशी जुळली रे प्रीत
नाही परत भेटणे निरोप ना कुणा हाती
कुठे शोधायाला जावे अन् शोधावेही किती
सार्या भिजल्या या वाटा तुझ्या ओल्या नजरेत
आणि थरारे आकाश तुझ्या अधीर श्वासात
रुतू आले अन् गेले नाही काळाची गणती
सुन्न अंधारात जळे मंद प्रांणांची पणती
मन प्रतिक्षे जळाले ऊरी ज्योत मावळली
नाही समाधी स्मारक तान्ही वेल पालवली
सानी वेल फोफावते निघे धरा व्यापायाला
वाट पाहणे संपले आता शोध सुरू झाला
आता शोध सुरू झाला......

Friday, June 13, 2008

म्हातारबोवा

गेल्या ऊन्हाळ्यात सोलापूरला जाणे झाले. सोलापूरपासून जवळ यमगरवाडी येथे एक पारधी मुलांसाठी शाळा आहे. ती पाहण्याचा योग अखेरीस जुळून आला होता. गिरीश प्रभूण्यांचे पालावरचे जीणं मनात कुठेतरी घर करून होते. पण तिथे पोहोचण्यापुर्वीच डोक्यावरच्या तडकत्या ऊन्हाने तिथल्या खडतर आयुष्याची कल्पना दिली.
रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली उभे होतो आणि तो हळू हळू चालत आमच्या दिशेने आला. त्याच्या सुरकुतलेल्या चेहर्यावरून त्याने अनेक उन्हाळे पाहीले असल्याचा दाखला दिला. पण नजर मात्र अशी करकरीत की जणू आरपार जावी. त्याच्याकडे बघताना सारा उन्हाळा मूर्तीमंत समोर उभा असल्याचा भास झाला. झाडाची वितभरच का होइना पण होती नव्हती ती सावली सोडून उन्हातच तो दोन पायांवर बसला. खिशातून तंबाखूची पूडी काढली. डोळे किलकिले करत माझ्याकडे नजर वळ्वली अन म्हणाला "काय पाव्हणं तम्हाकू खाणार का?" मी हसूनच नकारर्थी मान हालवली. त्या आधीच त्यानं ती पुरचुंडी सदर्याआड केली होती. त्याला माझ्या नकाराची खात्री असावी. "कुणीकडलं म्हणायचं?" मुंबई म्हणालो तसे त्याचे डोळे चमकले. "शिनेमावालं का" मी नाही म्हणलो तसे तंबाखूचा बार तोंडात कोंबून तो मौनाला बसला.
**************

"म्हातारबोवा, म्हातारबोवा, श्वास उडाला धाप लागली"
वेशीवरली गोजीरवाणी, अवघडलेली चिंच बोलली
"त्रागा सोडा, टेका वाईच
कुठे निघाला घाई घाई"

सोडून करपट उष्ण उसासा बसे अजोबा बापुडवाणा
चंची उघडी डबी चुन्याची तंबाखूचा भरी बकाणा
डोक्याचे ते कातीव टक्कल खुरुट सफेदी औडक चौडक
चुरगट धोतर, विरकट सदरा, चिरचिरणारी वहाण फत्तड
चिकचिकती घामाची रेघ
टाचेवरची दुखरी भेग

नाकावरती डोळे टांगून लटाटणारी मान तरंगे
शुष्क नजर ती शोध कुणाचा खंत जागते डोळ्यामागे
थंडीवरती पचक थुंकूनी सुर्व्यापाशी बसला येऊन
आळसलेली राख फुंकूनी त्यास भडकवी सरपण घालून
छातीच्या भात्याची फुरफुर
उरात उठतो भलता काहूर

पर्णफुलांची काढून नक्षी वसंत बेटा गेला निघूनी
म्हातार्याची पेटे भट्टी डोळ्यालाही नुरले पाणी
मिटुन निळा अस्मानी डोळा तलाव सारा झोपी गेला
तळाटलेली हिरवी स्वप्ने उन्हात पडली वाळायाला
पाण्यासाठी दाही दिशा
चिवचिव चिमण्या वेड्यापिशा

दूर ढगांची गडबड मस्ती तडक वीजेने भरली तंबी
अवखळ वारा सैरावैरा, अंगलट नस्ती झोंबाझोंबी
"म्हातारबोवा, म्हातारबोवा, पाऊस आला, भट्टी विझली"
वेशीवरली लेकुरवाळी, गजबजलेली चिंच बोलली
"वय झालं, त्रागा सोडा
सुखरूप जा पण चिठ्ठी धाडा"

आणि आजोबा काठी टेकत
पुढे निघाला पाठ शेकत...

**********

Saturday, June 07, 2008

पाऊस पडून गेल्यावर....

निळं विशाल आभाळ, त्याची नितळ निळाई
ढग नीळ्या पटावर काळी सांडलेली शाई
वारा वादळी लहरी, त्याचा जोरही आफाट
शांत झुळूक नाजूक कधी रागात मोकाट
काळ्या तळ्याच्या डोळ्यात निळ्या नभाचं कौतुक
अंतरंगात तरंगे नक्षी शेवाळी सुबक
दाढी सोडून पाण्यात उभा वड काठावर
रूप पाही थकलेले पालवत्या लाटांवर
पाती इवली सानुली सारी नाचती डोलती
साठवले पावसाचे मोती जीवाने जपती
शुभ्र चांदणे सुगंधी पांघरली रानजाई
निवडुंगाचे रोपटे ओठ रंगवून येई
सारे रान हारपले नव्या रंगात ढंगात
वेडे मन सामावले ओल्या मातीच्या गंधात
*************

मुंबईचा पाऊस अखेरीस सुरू झाला..........
टप टप टप टप टप टप टप टप
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
धो धो धो धो धो धो धो धो
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप रिप रिप रिप
रिप रिप रिप रिप रिप

Friday, April 18, 2008

कांक्रीट पोएट्री

रविंद्रनाथ म्हणतात "artists are angles of surplus".
भाषा ही माणसाची गरज होती- संवाद साधण्यासाठी. खाणाखूणा पुरेनाशा झाल्या. तू तू मी मी पासून ते वाद, संवाद, विवाद, प्रतिवादापर्यंत अनेक शब्द बनले. प्रत्येक काळात प्रत्येक समाजात काही मंडळी असतात ज्याला त्याला शिस्त लावणारी. अशांनी मग व्याकरण बनवले. भाषा वाहती झाली समाज संवादी झाला. angles of surplus शब्दांच्या महिरपी बांधू लागले आणि कवितेचा जन्म झाला. शिस्तीचे पुरस्कर्ते तिथेही पुढे सरसावले. कविता व्रुत्तबद्ध झाली. तिच्यात सूर मिसळले आणि गाणं पालवलं. प्रथम फक्त तीन सूर नि, सा, रे. सिंधूच्या तीरी वेदरूचांचे गायन सुरू झाले. ते गंगेपाशी येई येई तो तिच्यात अजून दोन सूर मिळाले. कविता गाती झाली.

मंदाक्रांता, मंदारमाला, शार्दूलविक्रीडीत, प्रुथ्वी, भुजंगप्रयात, दिंडी, ओवी अशी अनेकविध व्रुत्तालंकारांनी सजलेली लेकुरवाळी कविता एकोणीसावं शतक येता येता पुन्हा एकदा गर्भार राहीली. ते अवघडले पण अंगोपांगी वागवत ती प्रसवेच्या वेदनेपर्यंत आली आणि मुक्तछंद - पुन्हा कविता ओघवती झाली. पण हा शिस्तभंग तिथेच थांबला नाही. नविन जमानाच समाधानी राहीला नव्हता. 'deconstruction' ची लाट आली. नियम बदलले, नियम मोडले गेले. भटाची शेंडी वरवंट्याला अन वड्याचं तेल वांग्यावर असे सगळे प्रयोग करून झाले.
कवितेचं यमक का जुळावं?
कवितेत गण, मात्रा का असाव्यात?
कवितेवर अर्थ वाहण्याची सक्ती का?
कोणी सांगितलं कवितेत शब्द असावेत?

मग चित्रांची कविता (visual poetry), आवाजाची कविता (sound poetry) अशाही विवीध रूपात कविता समोर आली. या उंच टाचांच्या चपला घालून, शरीराच्या नेमक्या वळणांपाशी तंग होणारा पोशाख केलेल्या या कवितेने बर्याच नजरांचा ताबा घेतला. तिला लोकांनी नाव दिलं 'concrete poetry'

Thursday, April 17, 2008

कल्पवृक्ष कन्येसाठी .........

सुमन रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरात रमली होती. तो तिचा एक छंद होता आणि विरंगुळाही. साडे बारा वाजले. दारावरून दप्तरांचा एक थवा चिवचिवत नुकताच पुढे सरकला.
"पोरी तुझ्या हाताला चव आहे गं !" आई तिला नेहमी म्हणायची. "मग मीठाबरोबर थोडं गाणंही घालायला लागतय की भाजीत" तिला एकदम भिमाक्का आठवली.

"जीवलगा ऽऽ आऽऽ
राहीले रे दूर घर माझे एऽऽऽ....
"


आईऽऽ गं ! तो रेडीओ दुरुस्तीला द्यायचा राहीला. ती हळहळली. किती प्रेमाने ताईंनी तो दिला होता. पंधरा दिवस होत आले तो बंद पडलाय. ती निघाली तेव्हा हळ्व्या झाल्या, "पोरी जिवनात कधी सूर गमावू नकोस. दुःखात त्यांनी तुला साथ दिली, सुखात तू त्यांना दे."

"पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे.
जीवलगा ऽऽऽ......."
पण आज हे गाणं......

सर्जेराव तालुक्याला गेलाय. आज घरात ते दोघंच. ती आणि सूरज.
"च्या मायला शंकर्या काय भुसकाट बोलींग करतोय?" सूरजचा आवाज येत होता.
काय करावं या पोराला? रोज नवीन शिव्या शिकून येतो. सर्जेरावाला सांगायला हवं.

"काय सर्ज्या, करतोस का पोरीशी लग्न?
गाण्यात रमलीय तशीच संसारात रमेल तुझ्या."
केवढ्याने दचकली ती! तो ही दचकला. ती गाण्यात दंग, तो तिला पाहण्यात. बाबांचा असा अचानक प्रश्न आला तशी ती लाजली. बाबांना कसं हळू आवाजात बोलणं माहीतच नाही. ती आनंदवनात आली तेव्हा आठ वर्षाची होती. सुरवातीला बाबांच्या आवाजाला फार घाबरायची. तिच्या बापाचा आवाज तिनं आठवायच्या प्रयत्न केला. पण कित्येक वर्षात तो काही बोललाच नव्ह्ता. त्यांची बोटं जशी वेदना विसरली तशी बहुतेक जीभही भाषा हारवून बसली. सू... सू.... करत आलेला दगड आईनं आपल्या आंगावर झेलला. मारणार्या हातावर राखी च्या धाग्याचा गुलाबी रंग अजून निलाजर्यासारखा तसाच होता. तेव्हा आईचं कपाळ फुटलं आणि तिचा बाप मुका झाला. नंतर ते तिघेही इथे आले.

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तीमिरी बुडला

तिनं तव्यावरच्या भाकरीवर पाण्याचा हात फिरवला. भाकरीवर उमटलेले तिच्या बोटांचे ठसे दिसेनासे झाले. दोन चार धांदरट थेंब तिच्या मनगटावरून तव्यावर उतरले. चर्रर् करत विरून गेले. तिचं मन हूरहूरलं. समोरच्या बोरीच्या सावलीशी रोज दंगा घालणार्या चिमण्या आज अजून का बरं नाही आल्या? तिला उगाचच उदास वाटून गेलं. दुसर्या भाकरीसाठी तिनं पिठ एकसारखं केलं. थप थप थप थप,
थप थप थप थप, थप थप थप थप ती त्या लयीत बुडून गेली. चूलीच्या ऊबदार श्वासाने लालबुंद झालेल्या तिच्या नाकाच्या शेंड्यावर घामाचा एक थेंब थरथरत येऊन स्थिरावला. उजव्या गालावर आलेली चुकार बट त्याच एकठाय लयीत - थप थप थप थप, थप थप थप थप. तिनं तवा उचलून भाकरी निखार्यावर ठेवली. छान खरपूस वास घमघमला. तिचा चेहरा उजळला त्या आठवणीच्या वासानं.
भिमाक्का भाकरी भाजायची त्यावेळी ती चुलीशी बसून मन भरेस्तोवर वास घ्यायची. त्यातच तिचं पोट भरायचं. भिमाक्का लाडानं पाठीत दणका घालत म्हणायची, "जा पळ बाहेर. उगा सकाळधरन मांजरीसारखं ऊबेला बसलीय!"

राहीले रे दूर घर माझे एऽऽऽ....

भाकरी छान टम्म फुलली. सूरज डोळे मोठ्ठे करून तिच्याकडे बघत होता.
"आय, मला बी शिकव की"
"काय? भाकरी करायला!"
"नाही त्यात हवा कशी भरतेस ते"
तिला हासू आवरेना झालं. "मी आण्णांना तुझं नाव सांगणारे"
तो चिडून बाहेर पळाला. सर्जेराव येईतो सूरज हे विसरूनही जाईल. तिनं चूलीवरनं भाकरी उतरवली. थप थप थप थप, थप थप थप थप.... त्या नादात ती परत भूतकाळात शिरली.

भिमाक्का आणि गोदुमावशी भाकरीला बसायच्या. कितीतरी भाकर्या करव्या लागत रोज. जेवणारी तोंडच तेवढी होती. तिला आठवत होतं तसं आनंदवनात कायमच येवढी लोकं. ती ऐकून होती की बाबा आजारी पडल्य़ापासनं पै पाहुण्यांचा राबता फारच वाढलाय. ताई अगदी शीणून जात असणार. जाईच्या वेली सारखी नाजूक ताई पण कामाला भिडल्य़ा की भल्या भल्यांना लाजवतील. बाबांचा कामाचा दबदबा मोठा. पाच पंचवीस लोकांना हाताशी धरणार, स्वतःही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून कामावर तुटून पडणार. त्यांच्या सहवासात आलेला माणूस झपाटला नाही तरच नवल. ताई त्यांची सावली जणू. एखादा मायाळू झरा. दोघांनाही आनंदवनातील जीवन फुलवण्याचा एकसंध ध्यास. तव्यावरची भाकरी भाजायला म्हणून तिनं उलथण्यावर घेतली तशी तीची सय मोडली आणि केविलवाणी होतशी तव्यावर पसरली. ती अस्वस्थ झाली. भींतीवरची पाल सहानभूतीने दोनदा चुकचुकली.

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमीरी बुडला
मिटले दरवाजे.............

धडाम् !!
बाहेर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. तिचं काळीज धपापलं. सूरजच्या विचारानं ती धडपडत उठली आणि कशीबशी दाराशी आली. सर्जेरावाची थोराड फटफटी आडवी तिडवी पडली होती. तिचं धूड आऽ वासून तिच्याकडे खुनशी नजरेनं बघत होतं. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सूरज त्या गाडीखाली...
तितक्यात शेजारी उभा असलेला गजानन तिला दिसला अन त्यानं बखोटीला धरलेला सूरज - एक पाय हवेत एक पाय खाली, भेदरलेला. ती काय ते समजली. सूरज धावत येउन तिला बिलगला.
"अगदी वेळेवर आलास भाऊ !"
गजानन इथेच पोस्ट्मन म्हणून काम करणारा- आनंदवनात वाढलेला- माहेरचा माणूस. तो काहीच बोलेना.
"भाकरी खाणार?"
पण तो जागचा हाललादेखिल नाही.

"बाबा गेले.... सकाळी" तो वळला आणि निघून गेला.

"जीवलगा ऽऽ ........
तिचं गाणं संपलं तेव्हा डोळ्याच्या कडा पुसत बाबा म्हणाले होते " तुझ्या गळ्यात जादू आहे बेटा. सुखी रहा."
या आशिर्वादाला पुरता महीना देखिल झाला नाही. ते शब्द अजूनही तिच्या कानात आहेत.

"पोरी तुझ्या हाताला चव आहे गं !" आई तिला नेहमी म्हणायची.
तिच्या बापाची काळजी करत करत आई झिजून मेली. तिचा मुका बाप तब्बल बारा वर्षांनी पहिलं वाक्य बोलला, " आता मी तरी कशाला जगू?" आणि परत मुका मुका झाला. त्यानी त्याचं खरं केलं आणि महिन्याभरातच तो महारोगाला सोडून चालला गेला. ती एकटी मागे राहीली सार्या आनंदवनाची झाली.
आज मात्र ती पोरकी .....


घरभर शांतता पसरली. तिच्या ओझ्यानं सुमनला गुदमरायला झालं. गजानन वळणावर दिसेनासा झाला तशी ती वळली. ती पाय ओढत चूलीशी आली. पोरगं म्हणालं "आई, भाकरी जळली की गं"
तिच्या पायातलं सारं अवसानच गेलं. ती मटकन खाली बसली. जळ्क्या भाकरीचा वास खोलीभर पसरला. आणि बांध फुटल्याप्रमाणे ती मुसमुसून रडायला लागली. सूरज कावराबावरा होऊन तिच्या पोटाला लगडला. तिची आसवं ओघळून त्याच्या कुरळ्या केसांत विरघळत होती.
बोरीच्या सावलीशी चिमण्या दंगा घालत होत्या.
..
..
..
"आई बाबा मेला का गं?"

"नाही बेटा, बाबा मरेल कसा? तो तर आभाळभर झालाय"





**********
मी नुकताच आनंदवनात जाऊन आलो आणि तीनच महिन्य़ात बाबा आमटे गेले. आमचं नशीब थोर. बाबांचं दर्शन झालं. साधनाताई भेटल्या. इतर आमटे कुटुंबीय भेटले. बाबा प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे ’भेटू’ शकले नाहीत. माझ्या बरोबरचे एक जण म्हणाले "काय करणार? नुसतं त्यांना बघण्यात समाधान मानावं लागणार." पण ते खरे नाही. बाबा ही आता व्यक्ती उरलेली नाही. तिथे प्रत्येक माणसाला भेटताना बाबा भेटत होते. आनंदवनात सगळीकडे बाबाच तर होते!
प्रवास वर्णन आणि आपलं फारसं जमत नाही. ठिकाणं, तारखा लोकांची नावं आपल्या काही लक्षात रहात नाही. पण माणसांचे चेहरे आणि त्या मागच्या कहाण्या हे मात्र कुठे तरी कोरून ठेवल्यासारख्या आठवणीत राहतात.

मी जाऊन आल्यावर चारू, गायत्री, केदार सगळे म्हणाले अनुभव कळव. केदारने तर टाईप देखिल करायची तयारी दाखवली.
बरेच दिवस झाले ते राहूनच गेले. आजूनही कच्चा मजकुरच देत आहे त्या वर काम करायला कधी वेळ मिळेल कोणास ठाऊक?

ही कथा काल्पनिक आहे. पूर्णतः माझ्या अनुभवावर आधारीत. तरी इतिहास संशोधकांनी आपापली भिंगे बाजूला ठेवावीत.

Monday, April 14, 2008

तो, ती आणि एक घर

तो, ती आणि एक राहतं घर

घर, जिथे आकाश डोकावतं येता जाता, न विचारता
वा~या पावसाला घाबरत नाही
त्यांचाही त्याच्यावर तितकाच हक्क
कदाचित जास्तच..

आलेल्याला येऊ द्यायचं, गेलेल्याला जाऊ द्यायचं
नेऊन नेऊन नेणार काय?
तीन दगडांची एक चूल, फाटक्या झोळीत एक मूल
चिंधीचिंधीत साठवलेली अब्रू
जी झाकली जात नाही, जी विकली जात नाही
लुटली जाते कधीमधी

शिका ! शिका ! खूप शिका !
साक्षरता वर्गात बसा
”पूरबसे सूर्य उगा । फैला उजियारा।”

जळता सूर्य जरी पुढ्यात ठेवला
तर ती आधी भाकरी भाजेल
तो अर्धी विडी शिलगावेल
आणि आजचाही दिवस जर उपवासाचाच असेल
तर सूर्यावरती अंधार शिंपडून
दोघेही पडून राहतील
आतल्या आत जळत

तो,
ती
आणि
एक राहतं घर.......

Friday, April 11, 2008

आधारवेल -पूर्ण


आधारवेल आठ एक वर्षापूर्वी लिहून झाले.
लिहून झाल्यावर माझे मलाच वाचताना फारच कृत्रिम वाटायला लागले.
म्हणून त्याचा थोडा हिस्सा इथे टाकला तर काही जणांना आवडला.
या आधी ४ भागांत आधारवेल हे लिखाण वेगळ्या वेगळ्य़ा स्वरूपात होतं.
पण त्याचा शेवट मात्र अधुराच होता. आता मात्र ते पूर्ण लिखाण एकत्र एकाच ठिकाणी देत आहे.
**********

आधारवेल

मी कोण आहे? कोण आहे मी?
एक चैतन्यरहीत अस्तित्व!

मी एक खुरटलेला वड आहे.
वठलेला, थकलेला, कंबरेत वाकलेला,
पानन पान पिकलेला, पारंब्या सुकलेला

मी एक खुरटलेला वड आहे.

मी ऋणाईत आहे या आकाशाचा, या मातीचा.

याच मातीत रुजलो, अंकुरलो, पालवलो, बहरलो
याच मातीने मझ्या असण्याला
अर्थ दिला, आकार दिला
आहार दिला, आधार दिला.
सामर्थ्याचा साक्षात्कार दिला याच मातीने.

जमिनीच्या कुशीतून पहिल्यांदा जेव्हा बाहेर डोकावलो
नजरेत सामावलं हे अथांग निळंशार आकाश
थेट इथपासून तिथपर्यंत पसरलेलं

मला आव्हान देणारं.......भव्यतेचं.

बस्स! स्विकारलं.
कारण तेव्हा आकांक्षा होती आभाळाला भिडण्याची,
आभाळ चिरत जाण्याची,
आभाळ झुकवण्याची.
अन आस वेडी चांदण्या वेचण्याची.

मी क्षणा क्षणाने वाढत होतो,
फांदीफांदीनं बहरत होतो,
पानोपानी उमलत होतो.
उठत होतो, चढत होतो, ध्येयामागे पळत होतो.

आता उजळणारा पहिला किरण माझं मस्तक कुरवाळत होता.
घाबरत होता वारा माझ्या अंगाशी झोंबायला.
पान्हवलेला झरा माझंच गीत गात होता
आणि पहुडली होती धरती माझ्या शांत शीतल सावलीत.
साऱ्या सृष्टीलाच जणू कौतुक वाटत होतं
आपणचं निर्मिलेल्या या काष्ठशिल्पाचं.

कारण माझ्यात सामर्थ्य होते.
सामर्थ्य होते पडणारे आभाळ पेलण्याचे
सामर्थ्य होते कोसळणारा पाऊस झेलण्याचे
सामर्थ्य होते घोंघावणारे वादळ आडवण्याचे
आणि
सामर्थ्य होते ग्रीष्माच्या आगीत हसत हसत होरपळण्याचे.

मी स्वयंभू होतो
मी समर्थ होतो
मी स्वाभिमानी होतो
मी स्वयंपूर्ण होतो
पण मी का होतो?............ हेच मला माहित नव्हतं.
अर्थात मला त्याची चिंताही नव्हती
कारण माझं असणंच माझ्यासाठी पुरेसं होतं

पण......

आठवतो तो एक स्पर्श
वज्रतनू माझी रोमांचीत करणारा, सामर्थ्याला माझ्या अगतिक करणारा.
आठवतो तो क्षण
पूर्णत्वातील अधुरेपण जाणवून घेण्याचा,एका स्पर्शाने असणे माझे भारावून जाण्याचा.
आठवतो तो क्षणएका स्पर्शात माझं मी पण विरण्याचा,आभाळा येवढं मोठेपणं एका स्पर्शानं हारण्याचा.

मी खाली पाहिलं तर
एक नाजूकशी वेल थोडा आधार शोधत होती,
हात पुढे करून मोठ्या विश्वासानं बघत होती.
ज्या विस्तीर्ण आकाशात सामावून जाण्याचा मला अभिमान वाटत होता.
ते किती सहजतेनं तिच्या नजरेत सामावलं होतं.
मी अनाहूत पणे हात पूढे केला.तो नाजूकसा हात माझ्या हातावर स्थिरावला.
माझ्या हाताचा कंप मला जाणवत होता आणि जाणावत होता तिचा दृढ स्पर्श.
मी पुढे केलेला हात विजय होता तिचा आणि माझी अगतीकता.
म्हणा यात काहीच अयोग्य नव्हतं, अप्रिय तर नव्हतंच नव्हतं.

मला कळे कळे तो तिने मला व्यापून टाकले
व्यापून टाकला माझा विशाल विस्तार- फांदीफांदीनं जपून वाढवलेला.
तिने नुसतं मलाच नाही तर माझं सारं विश्व व्यापून टाकलं.

मी होतो तिच्या अस्तित्वाचा आधार
अन ती अस्तित्व माझ्या अस्मितेचं.

तिने डोळे उघडले की सूर्य उगवायचा.
ती थकली, दमली की रात्र यायची पाय न वाजवता, चंदेरी दुलई घेऊन.
ती लाजली की लाली अवतरायची नभाच्या गालावर.
ती गुणगुणू लागली की ताल धरायचा झरा खळाळणारा
अन
वाराही नाचायचा फुलपाखरांबरोबर फेर धरून.
ती रागावली की सारं आभाळ जणू भरून यायचं तिच्या नजरेत.
कसं अगदी दाटून यायचं.
आणि अचानक रिमझिम रिमझिम बरसू लागायचं.
तिचा एक मुका अश्रू सारं सारं सांगून जायचा अगदी सारं काही.
जे सांगायला नभाने कोण अटापीटा करावा -
आदळआपट,
विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट
आणि वर ओतू गेल्यागत कोसळणं.

पण तिला पाऊस आवडायचा,
खूप खूप आवडायचा.
तिची चटकन कळी खुलायची.
मग ती चिंब भिजायची सरसरणाऱ्या सरींमधे.
विरघळून जायचं तिचं मन पावसाच्या थेंबात
आणि मग मुग्ध अन मुक्त होऊन ती थरथरत राहायची
हारवून जायची वातावरणात.
अशा वेळी कितीतरी दूर पोहोचलेली असायची ती.
तिच्या पासून दुरावण्याची एक तीव्र कळ उठायची ह्रदयात.
नुसत्या त्या विचारांनीच सरसरून काटा यायचा अंगावर.

पण दुसऱ्याच क्षणी
ती तिचं मस्तक माझ्या छातीवर घुसळायची.
ठिबकणारे थेंब पानात झेलून ते माझ्या अंगावर उडवण्यात तिला भारी मौज वाटायची.
होणाऱ्या गुदगुल्यांमुळे मी खदखदून हासायचो.
मग माझ्या फांदीपानांवरलं पाणी पावसासारखं बरसायचं.
आणि आधीच पावसात चिंब भिजलेली ती
मीच तिला भिजवलं म्हणून माझ्यावर रागवायची.
अगदी खोटं खोटं!

साऱ्या सृष्टीवर तिचं प्रेम होतं
अनंत निळ्या आकाशावर, बोटभर खळाळत्या झऱ्यावर,
शरदातील चांदव्यावर, अंधारातील काजव्यावर,
क्षितिजावरल्या डोंगरवर, डोंगरवरील चंद्रावर,
पानांवर, फुलांवर, पाखरांवर, फुलपाखरांवर,
साऱ्या सजीव निर्जीवांवर ती प्रेम करायची सारख्याच कौतुकाने.
मला कधीच नाही जमलं तिच्यासारखं सगळ्यांवर प्रेम करणं.
कारण लहानांबरोबर लहान होणं मला शक्य नव्हतं
आणि मोठ्यांचं मोठेपण मला मान्य नव्हतं.
मला राग यायचा तो त्या फुलपाखरांचा
जरी फुलपाखरांमुळे रंगलेली ती छान दिसायची
तरीही मला त्यांचा राग यायचा
एक तर ती तिला सोडायची नाहीत आणि माझ्या अंगावर कधीच बसायची नाहीत.
मी अंग घुसळून त्यांना उडवायला जावं तर ती तिला अधिकच बिलगून बसायची.
आताशा तो झराही मला घाबरेनासा झाला होता
कारण त्याला तिचा शह होता ना!
मी तसं तिला म्हणालो तर ती हासून बोलली
"सहाजीकच त्याला तुझ्या मोठेपणाचं काय कौतुक?
तो पुढे जाऊन महाकाय फेसाळणारा समुद्र बघतो.
त्याच्या पोटात म्हणे सारं आकाशही सामावतं"
तो उनाड झरा अन येणारे चारदोन उपरे पक्षी
कुठून तिच्या डोक्यात असले उलटे सुलटे भरून द्यायचे देव जाणे.
"पण मला मात्र आहे बरं तुझं कौतुक.
कौतुक करायला आपलं जवळचं कुणी असावं लागतं"
ती असं म्हणाली की माझा राग कुठल्या कुठे पळून जायचा.
मला माझ्या शक्तीचा फार अभिमान होता.
पण मी जर कोणाशी भांडू लागलो तर ती मला थांबवून म्हणायची
"सामर्थ्य लढण्यासाठी दवडण्यापेक्षा जगण्यासाठी साठवावं, जगवण्यासाठी वापरावं."
पण आपण कमीपणा का म्हणून घ्यायचा? आपला मोठेपणा सिद्ध करायला नको?
"पण लढण्यासाठी मोठेपणा लागतच नाही मुळी आणि सिद्ध तर मुळीच होत नाही.
जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो
तेव्हा एखादा लहानसा जीवही निकराची झुंज देतो.
तिथं त्याच्या आकाराला महत्व नसतं ना सामर्थ्याला.
महत्वाची असते त्याची भावना, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती.
इतरवेळी लढण्यापेक्षा क्षमा करण्यातचं अधिक मोठेपणा असतो.
त्याला सिद्ध करण्याची गरज नसते. मोठेपणा कसा निर्विवाद असावा."
मला तिचं हे बोलणं फारसं पटत नसे. निव्वळ भित्रेपणा!

एकदा असच मी तिला म्हणलो की मला खूप सामर्थ्यवान व्हायचं आहे.
इतके की हे आकाश खाली झुकवता येईल.
त्यातल्या चांदण्या वेचता येतील आणि
तुला देता येतील - भेट म्हणून.
ती प्रसन्न हासली. म्हणली,
"आपलं सामर्थ्य बाह्यरूपाने इतरांना दाखवायची गरज नसते.
ते अगदी आतून आपल्या मनाला जाणवलं तरी पुरेसं असतं"
तिच्या या गूढ बोलण्याचा विचार करतच मी झोपी गेलो.
आणि सकाळी...................
चकित झालो, आवाक झालो.......
क्षणभर वाटलं मी स्वप्नात तर नाही ना?

रात्रीच्या आकाशातील साऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या
भर दिवसा अंगाखांद्यावर लेऊन ती लाजत लाजत उभी होती.
जणू आभाळाने त्याचा सारा खजिना गोळा करून
तिच्याजवळ सांभाळायला दिला होता.
त्या चांदण्या एका अनामिक सुगंधाने न्हालेल्या होत्या.
ते ओंजळभर आश्चर्य तिनं माझ्या अंगावर उधळलं
आणि म्हणाली-
"माझ्यातर्फे तुला भेट"

आनंदाने भारून गेलो.
आज पहिल्यांदा जाणवलं तिचं मोठेपण
आज मला तिची नव्यानेच जाणीव होत होती आणि माझ्या अव्यक्त भावना ती ही मुक्यानेच जाणून घेत होती
त्या दिवशी गळून पडलं माझं अहंकाराचं आवरण
अगदी हलकं हलकं वाटलं
क्षणभर वाटलं, त्या फुलांमधे उतरून त्यातील मध प्यावा
अन् आज पहिल्यांदा मला माझ्या विस्तीर्ण शरिराची लाज वाटली
त्या झय्रालाही मी माझ्या आनंदात सामील करून घेतलं
सारा दिवस आम्ही हासण्या गाण्यात घालवला.
आता दिवस कसे जात होते मला कळत नव्हतं. मी ते मोजणं कधीच सोडून दिलं होतं.
आश्चर्य म्हणजे माझ्या विस्ताराकडे मी पूर्णत: दुर्लक्ष करूनही तो अधीक जोमाने वाढत होता.

त्या दिवशी सकाळीच तिचा तो समुद्रावरून उडणारा मित्र आला. तिच्याशी आणि झर्याशी थोड्यावेळ गप्पा मारून तो वेगाने उडून गेला. पण का कोण जाणे घाबरल्यासारखा वाटला. ती मात्र आज फार शांत शांत होती आपल्य़ातच हारवल्यासारखी.
मी मऊ रेषमी वार्यामधे नुसताच सैलावला होतो.
ती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली, " मी खूप खूप आनंदात आहे अशा क्षणी म्रुत्यू जरी आला तरी......."
असं काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, शुद्धीत तर आहेस ना?
"दुःखी कष्टी दीनवाणं मरण येण्यापेक्षा समाधानाने हसत त्याला सामोरं जाणं चांगलं नाही का?"
आपण एखाद्या चांगल्या विषयावर बो-
"तुला एक गंमत सांगू? मला आवडेल तुझ्यासारखं मोठा व्रुक्ष व्हायला. असं आधाराने जगण्यापेक्षा ताठ मानेनं जगणं आवडेल मला.
तुझ्यासारखा आधार दर वेळी मिळणार आहे थोडाच?"
खरच आवडेल तुला माझ्यासारखं व्हायला?
पण मला जर का देवाने विचारलं तर मीही सांगेन-
मला अशाच सुंदर वेलीच्या जन्माला घाल मग मी घेईन तुझा आधार. देशील ना?
ती अगदी मनापासून हासली.
काय गं तुझा तो आकाशयात्री एवढं काय सांगून गेला?
ती एकदम गंभीर झाली, म्हणाली "तुला सांगणारच होते. तो आला होता संकेत द्यायला - वादळाचा.
एक प्रचंड वादळ समुद्रावरून रोरांवत आपल्याच बाजूला येतय. कदाचित दुपारपरयंत ते इथे येऊन पोहोचेल!"
हे सांगतानाच ती शहारली. माझ्याही अंगावर काटा आला. ती घाबरली होती पण मी...
मी मनॊमन आनंदलो. उल्हासीत झाल्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले.
आज कित्येक दिवसांनी माझ्या पुरुषार्थाला आव्हान मिळ्णार होतं.
मी अतीशय अधीर झालो होतो. अशी कित्येक वादळं मी आत्तापर्यंत लोळवली होती आणि आता
या ही वादळाची गुर्मी मला उतरवायची होती.
मी माझा अंदाज घेतला मी पुरेपूर बळकट होतो.
आता मी सज्ज होतो येणार्या संकटासाठी

भर दुपारी त्या वादळाने दुरूनच त्याच्या येण्याची वर्दी दिली. काही वेळातच अंधारल्यासारखं दाटून आलं आणि ते विघ्नसंतोषी गरगरत, गडगडत माझ्या समोर येऊन उभं ठाकलं. त्याच्या एका तडाख्यात तो झरा त्याचा मार्ग सोडून भेलकांडत माझ्या अंगावर येऊन आदळला. त्या स्पर्शाने एक थंडगार शीरशीरी गेली माझ्या मस्तकापर्यंत. पण दुसरयाच क्षणी मी सावरलो.
उभा राहीलो - आक्रमक पवित्रा घेऊन.
आणि मग सुरू झालं एक जीवघेणं थरारनाट्य.
हे वादळ आधीच्या वादळांपेक्षा बलाढ्य होतं अशातला भाग नव्हता पण याचे डावपेच मात्र भेदक होते.
कधी चहुबाजूंनी एकदम चालून यायचं. कधी सर्व जोर एकवटून एकाच बाजूनी धडक द्यायचं
अन् अचानक गिरकी घेऊन दुसर्या बाजूनी मुसंडी मारायचं. माझ्या काही फांद्या मोडकळीस आल्या होत्या.
एकदोन पारंब्या उखडल्य़ा गेल्या होत्या.
पण मीही काही असा तसा नव्हतो. सगळीकडूनच मी त्याला भारी पडत होतो. ते पार नामोहरम झालं होतं
आणि अखेरीस त्याने पूर्ण शरणागती पत्करली. माझा विजय झाला होता. मी जिंकलो होतो.

आणि अचानक सारं आकाश लकाकलं. प्रकाशमय झालं. दिपून गेलो मी त्या तेजाने. क्षणात सारं काही लक्षात आलं माझ्या पण फार उशीर झाला होता. जाताजाता त्याने टाकलेला शेवटचा डाव मी ओळखू शकलो नव्हतो. एक तेजाळलेली लहर माझ्या आरपार गेली. कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज घुमला चहुदिशांतून. माझ्या सर्वांगाचा थरकाप उडाला आणि त्यात माझ्या सर्व जाणीवा विरघळून गेल्या. माझ्या समोर भरून राहिला एक असह्य प्रकाश आणि भविष्याचा अनिश्चित अंधःकार. माझ्या श्रुति लोप पावत होत्या. माझ्या घट्ट मिटलेल्या डोळ्यांसमोर मला फक्त ती दिसत होती.... फक्त ती दिसत होती....ती दिसत होती....

वर्षानुवर्षाच्या प्रदीर्घ झोपेनंतर जाग यावी तसा मी जागा झालो. मधे किती काळ लोटला कोणास ठाऊक?
मी हळूहळू डोळे उघडले. मावळत्या सूर्याची तांबूस उबदार किरणे माझ्याभोवती रेंगाळ्त होती.
अखेरीस वादळाच्या शेवटच्या आघातालाही मी पुरून उरलो होतो.
प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देऊन मी जीवंत होतो.
या विजयाच्या जल्लोशात आम्ही दोघे.........
....
...
..
..
..
.
.
.
.
.
ती?
.
.
मी झर्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं.
तो मुकाच राहिला.
.
.
एक अस्वस्थ शांतता पसरली आणि तीच सारं काही बोलून गेली.
सारं काही संपलं होतं
सारं सारं..

मी स्वयंभू होतो
मी समर्थ होतो
मी स्वाभिमानी होतो
मी स्वयंपूर्ण होतो
पण मी का होतो?...........
माझ्या असण्याचं कारण मला कळलं पण केव्हा..
जेव्हा मी ते गमावून बसलो.
ती होती म्हणून मी होतो, तिला आधार म्हणून मी होतो.
आता माझ्या असण्याचं प्रयोजनच उरलं नव्हतं.
पानापानानी घडलो होतो आता फांदीफांदीनं सुकत चाललोय
उरल्यात फक्त तिच्या आठवणी
खुळी फुलपाखरं अजून माझ्या भोवताली भिरभिरत तिला शोधत असतात
माझं मनही त्यांच्यापठोपाठ तिला शोधत भरकटत राहतं
सूर्य रोज उगवतो, रात्र होता होता डोक्यावर गोधडी घेऊन झोपी जातो
झरा त्याचं गाणं गातच असतो
उन्हाळ्यात सूर्य आग ओकत राहतो
पाऊस त्याची वेळ आली की बरसून जातो
थंडी गोठवून टाकते सगळ्या हालचाली
सगळंकाही चालू आहे पूर्वीसारखच
मी मात्र कशातच भाग घेत नाही


आज मला ते दिसलं. कुतुहलभरल्या नजरेनं आजुबाजूला पहात होतं.
त्या सानुल्याच्या डोळ्यातून ओसांडत होतं अफाट सामर्थ्य,
अचाट आत्मविश्वास -
आभाळाला भिडण्याचा,
आभाळ चिरत जाण्याचा,
आभाळ झुकवण्याचा.
अन प्रयत्न वेडा चांदण्या वेचण्याचा.
माझा आधार माझ्यासमोर पानापानाने बहरत होता.

आता मी वाट बघतॊय पुढच्या वादळाची
ही शेवटची निकराची झुंज.
मला झुंजायचय पण जिंकायचं नाही.
अर्थात या विजयासाठी त्याला आणि मला दोघांनाही फारसं झगडावं लागणार नाही.
कारण शेवटी

मी एक खुरटलेला वड आहे.
वठलेला, थकलेला, कंबरेत वाकलेला,
पानन पान पिकलेला, पारंब्या सुकलेला
मी एक खुरटलेला वड आहे
मी एक खुरटलेला वड आहे.....

Wednesday, April 09, 2008

हिवाळा

मुंबईमधे थंडी वाजणे आणि मुलगी लाजणे या गोष्टी दुर्मिळ. पु लं नी सांगीतल्या प्रमाणे इथे फक्त उन्हाळा आणि पावसाळा. वसंत इथे फक्त बाल्कनीतील फुलझाडापुरता येतो. "तीच्यासाठी मी आज ७.३५ ची लोकल चुकवली!" मुंबैकराला इतपतच रोमांटीक होणं परवडतं. नारायण सूर्व्यांचा मुंबईकर भाकरीचा चंद्र शोधण्याच्या वंचनेत असतो. बाकी मलाबार, कुलाब्याची मराठीशी नाळ कधीच तुटली. इथल्या गर्दीत बोरकर, करंदीकर, शिरवाडकर असे कुठल्याही करांना पाय ठेवायला जागा नाही. नाही म्हणायला तळणीच्या जळक्या कढईमधे जगण्याची गाज जागवणारे मर्ढेकर मात्र या गर्दीत लीलया मिसळून गेले आणि तितक्याच सहजतेने मुंबईकर त्यांना विसरला. पण त्यांच्या दादाईझमचा साक्षात्कार मुंबई पदोपदी देत असते. भींतीवर चढून पाला खाणारी बकरी, भोळीभाबडी मालगाडी, अबोल फलाटदादा, पिपातले उंदीर हे सारे वाचण्यासाठी डोळे बंद करावे लागत नाहीत किंबहूना डोळे लख्ख उघडावे लागतात. त्यांची कविता कल्पनेत रमत नाही पण जरा जपून ..... वरवर बघायला गेलात तर अर्थ हारवून बसाल. ”भंगूदे काठीण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे’’ म्हणणारा हा कवी रोम्यांटीसीझम पासून कायम लांब राहीला आणि कदाचीत त्याचमुळे प्रसिद्धीपासून.
पण त्यांची प्रत्येक कविता जणू सुचवत असते--
"आम्हास आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा"

मर्ढेकरांची आठवण काढण्याचे प्रयॊजन हे की गेल्या महीन्यात कधीतरी एक कविता लिहीली गेली. नंतर वाचताना माझे मलाच जाणवले की मर्ढेकरांची ’पितात सारे गोड हिवाळा’ कुठेतरी त्यात झिरपली आहे. कदाचित माझा भ्रमही असेल, कदाचित मुंबई हाच एक दुवा असेल. काहीही असो पण मुंबईत रहायला आलो नसतो तर मला मर्ढेकर कळले नसते हे मात्र खरं!
आणि हो इतके दिवस ही कविता एका वहीच्या एका कोपर्यात औडकचौडक उतरवली होती ती इथे आली ते गायत्रीच्या कविते मुळे. तिथला हिवाळा आणि इथला यातील विसंगती गमतीशीर वाटली.

हो कुणीतरी धक्का दिल्याखेरीज अस्मादिकांकडून काहीही होत नाही................

********

मुंबईची कसनुसली थंडी, शेकोटी ना मफलर स्वेटर
धबधब पाऊस चिक चिक ऊन अर्धेमुर्धे त्यातील अंतर
लोकलच्या फांदीफांदीवरती पानांची ही झुंबड गर्दी
सेंट्रल, टी.टी, व्ही. टी, वाशी पडसे कायम शिंका सर्दी
बिल्डींगांची धक्काबुक्की गुदमरलेले पाडे वाड्या
दीड वितीची गल्ली कलली त्यात रांगती मोटर गाड्या
भुकी राहुनी मुकी झोपली फुटपाथाची ठिगळी झोळी
पिचल्या टाचेच्या भेगातून थंडी भरली चोळीमोळी
क्वचित् उठतो इथे शहारा आणि गारवा जातो चाटून
विझती चिमणी निजते वेळी पिते हिवाळा फुंकर मारून
पाच दहाची लोकल पकडून सकाळ येते पहाटवेळी
धुकट धुराच्या काचेवरती गतरात्रीची आठवण ओली
मुंबईची कसनुसली थंडी, शेकोटी ना मफलर स्वेटर
वसंतवेडे स्वप्न तांबडे उबवित थरथरतो गुलमोहर