Monday, February 01, 2010

रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना...

भाषाशास्त्रात चवीनं चर्चिलेलं एक वाक्य- colorless green ideas sleep furiously. या वाक्याने अर्धवट झोपमोड झालेल्या काही स्वप्नाळू कल्पना.... यांना जोडणारा काही एक धागा आहेच असे काही खात्रीने नाही सांगता येणार. याला सुरूवात आणि शेवट नाही. गढूळलेलं नितळ होत गेलं तसा थांबलो.. इतकंच!
****

स्वातंत्र्याला झाली पन्नास वर्ष. मग तो रंग दे बसंती वाला रंग गेला कुठे? स्वातंत्र्याचं स्वप्न होतं आणि सगळ्याच स्वप्नात एक झिंग असते.. झोपेची झिंग. पण मग ती झिंग उतरली, झोप उडाली की नुसताच रंग उडाला? आम्हाला काय हवं होतं हे जर इतकं आम्हाला काय नको आहे यावर आवलंबून होतं तर नको असलेल्या झोपेत कितीही हवंहवंसं वाटणारं स्वप्न असलं तरी काय टिकवण्याची धडपड करायची- झोप की स्वप्न?
आमच्या स्वतंत्र राष्ट्रात आम्हाला जागायची सक्ती नाही, जगायची सक्ती नाही. मरणाची झोप मनापर्यंत झिरपलेली.. त्या निर्बुद्ध बधिरपणाचं स्वातंत्र्य. सायलेन्सर फुटलेल्या कर्कश्य अ-, ब-, क- कारणावर मात करणारी झोप.
पण
उसनवारीनं घेतलेल्या स्वप्नांना मेहनतीनं लावलेल्या चकमकत्या किनारी, गिरवून गिरवून झिजलेली वेलबुट्टी, या मातीतून उगवलेल्या हिरव्या स्वप्नांना केलेलं झोपेचं कलम,
कधीतरी असह्य होऊन शांत होतं सार काही.
उचकटलेली विस्कटलेली खडबडीत जाग येते झोपेला.

जागेपणी स्वप्नांना गुंगी येते... उरतो एक रंगहीन संताप
****

"माझाही रंग हिरवा होता" ती झोपेतच पुटपुटली.
मग आता काय झालं त्याचं? आणि बाकी सगळ्यांचं?
पलंगाच्या पायाशी चुरगाळलेला रंग तर नक्कीच हिरवा नव्हता आणि ती उमटलेली कोकमकळी- तीही!
पण मग.. काही वेळापूर्वी कदाचित काही वर्षांपूर्वी ती समुद्रकिनारी चालता चालता अचानक थांबली होती आणि माझ्या गालावरील ओरखाडा एकटक न्याहाळत तिनं विचारलं होतं..
सांग माझा रंग कुठला?
सूर्यास्ताचा तांबूस रंग तिच्या रापलेल्या गालांवर उतरला होता. खरपूस वासाचा तो रंग कोणता? तिच्या निळट ओढणीवर झिरपून जांभळ्या पाण्यासारखा रंग, तो कोणता?
’गुलाबी’ मी बोलून गेलो. खडूच्या पेटीत नसलेल्या त्या एकाच रंगाचं नाव मला नक्की माहिती होतं.
ती खळखळून हसली. उत्तर पटलं नाही तरी ते देतानाचा माझा गोंधळ आवडला तर ती तशी हसते. मग गळ्यात हात टाकून म्हणाली, " खुळ्या खुळखुळ्या, माझा रंग विचारते मी. माझ्या कपड्यांचा नाही"
माणसाला रंग असतो का? माझा प्रश्न न विचारताच तिला कळतो.
माझं अज्ञान लपवण्यासाठी मी तिला एक मिठी मारतो.
त्या ओलसर गोलसर स्पर्शात सारे प्रश्न खोचून ठेवतो तात्पुरते. वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा काढून गिरवायला.

तेव्हाचा तिचा रंग हिरवा होता का? पण मग त्याचं काय झालं? आणि बाकी सगळ्याचं?
****

पण काहीतरी लिहायला हवं. काहीतरी लिहायला हवंच.. त्यांच्या हिरवेपणाला साजेसं असं काहीतरी.
पणं काय ते सुचत नाही. तो न हसणारा चष्मेवाला मुलगा परवा म्हणाला, " तू लिहीत जा. चांगला लिहितोस. काय ते कळत नाही पण वाचावंसं वाटतं. उगच सुविचार लिहिल्यासारखं लिहू नकोस. निरर्थक असलं तरी खरं खरं लिहीतोस ते मला आवडतं"
मला कळलं नाही की त्याच्या बोलण्याचा मला आनंद व्हावा का?
मग ती हिरवी स्वप्नं? त्यालाही पडत असतील का? पण मी त्याला काहीच विचारलं नाही.
तो कधी कधी डोक्यात जातो माझ्या... उगीचच.
एकाच वेळी त्याला मुस्काटात मारावी की मिठी मारावी कळेना. एकच क्रियापद असलं तरी क्रियेचा गोंधळ उडालेला.
झक मारली आणि याला चहा पाजला.

आजचा चहा महागात पडला!
****

तू असं म्हणलासच कसं?
असं काय म्हणालो मी?
पण तिला संतापाने बोलवेना पुढे. ती हिरवी झाली.
लोक रागाने लाल होतात पण ती हिरवी होते. निदान मला तरी तसंच वाटतं दरवेळी.
आताशा रागाचं एक खातं तिनं माझ्याकडेही उघडलंय.
तिच्या रागाची हिरवट नशा चढते तिला आणि मग उतरत जाते हळूहळू. मग नंतरचा तो रंगहीन होत जाणारा अबोला.
आजचा साडे अकरा तास अठ्ठेचाळीस सेकंद चाललेला,
काल सतरा मिनिटात ती विरघळली होती.
आज कदाचित मी काहीतरी विसरतोय...
रंग संपलेत, आणायला हवेत.
कदाचित त्या चित्राबद्दल... बरं झालयस वाटतंय?

भिंतीच्या चित्रावर सगळेच रंग खुलून दिसतात पण हाताला लागलेला हिरवा रंग जाता जात नाही आणि कडू पण लागत राहतो चवीला.
***

पोटाची खळगी भरायला हवी. जगायला कोणाची ना नाही आणि आपली आडचण होत नाही जगण्यात तोवर हरकत नाही खात रहायला. भाताचा तो पिवळा ढीग खाता खाता तो विचार करत होता. फक्त खाताना त्याचे विचार त्याचं ऐकतात.
बाजूलाच ती आळणी काहीसं खातीय. तिला सोसत नाही जास्त तिखट.

तिच्या त्या चारांपैकी एकाचे तरी बाप आपण असण्याची शक्यता आहे किंवा चारांचेही.
पण तिनं कधीच तसा उल्लेख केलेला नाही. तशी ती पहिल्यापासूनच स्वतंत्र विचारांची आहे.
कधी कधी बरं असतं समोरचा अशा विचारांचा असला की!
अचानक आलेला तो मिठाईचा वास... किमान तीन आठवड्यांपूर्वीची असावी. एकदम तोंडाला पाण्याची धार सुटली. पण तो रंग...
त्याला मिठाईत खोटा रंग घातलेला मुळीच खपत नाही. खायचा असला तरीही. जीभ हिरवी होते त्यानी आणि मग विचारही हिरवटतात. सगळ्या जेवणाचा बेरंग...
त्यानं मोठ्या खुशीनं तो तिच्याकडे सारला.
तिला त्याच्या सगळ्य़ाच सवयी माहितीच्या. तिनं चेहर्‍यावरचे तुसडे भाव न बदलता तो उचलून पोरांसमोर टाकला. तिघांनी तो चिवडला थोडावेळ. एक कुरकुरत बाजूला झालं... तोंड वाकडं करून
"बापावर गेलय कार्ट" या अर्थाची तिनं नजर फेकली एक.
तो बाजूला जाऊन मुटकुळं करून आपलीच शेपटी हुंगत पडून राहिला.
’चला, निदान ते काटकुळं पोर तरी आपलं असणार,
जगवायला हवं.’

रंगहीन आयुष्यात तेवढाच एक हिरवा कोपरा...
****

"काय सायब, काय पेशल बेत?" बाबूनं पान बनवता बनवता विचारलं.
असंच काहीसं पण खूप जास्त ठसठसणारं शब्बोनंही विचारलं होतं घरातनं निघतानाच. कितीदा सांगितलं तिला की निकलते वक्त असं टोकायचं नाही म्हणून. पान खायच्या आधीच त्यानं मनातल्या मनात बाबूच्या प्रश्नावर एक पिंक टाकली. बाबूनं विषय न वाढवता पानाला शेवटची दुमडी घालून रेहमानच्या हातात टेकवलं.
हा बाबू बरा. त्याला कळतं कुठं थांबायचं ते. येवढं जरी शब्बोला कळलं असतं तर...
तर चंद्रीची आणि त्याची भेट नसतीच झाली. आहे तेच बरं आहे.
आज तो त्याचा चकचकीत कुडता घालून आला होता वर जरीवाला जाकीट. ठरवून आला होता की- आज विचारायचं चंद्रीला.. निकाह करशील? येताना चंद्रीसाठी मस्जीदच्या बाहरची चुनरी घेऊन आला होता.. चंद्रीला तो हराभरा रंग खूब पसंत होता.
"चंद्री तो कोठेवाली..." मी तरी कुठे अल्लाघरचा पाक बंदा आहे!

दारातच जुम्मन वाट आडवून उभा होता.

त्यालाही गालावर शब्बोसारखा मस्सा होता. त्याला एखादा सिगरेटचा चटका द्यावा असं त्याला परत एकदा वाटून गेलं. गोडघट्ट वासाचा एक भपकारा आला त्याच्या भडक कपड्यातून.
"पंछी तो गेला उडून मिया..."
?
"अच्छी नोकरी मिळाली तिच्या आदमीला. गेली ती.
परत नाही यायची."

...
डोक्यात विचारांची अन तोंडात विड्याची अडचण एकदमच.
पचक!
त्याच्या जखमी स्वप्नांचे शिंतोडे त्याने जिन्याच्या कोपर्‍यात उडवले.

त्या रंग उडल्या भिंतीवर अशा कित्येक स्वप्नांच्या गोवर्‍या झाल्या होत्या
****

तुझं बरंय रे! काही झालं तरी तुला झोपेची वेळ झाली की झोप येते. माझं नाही ना तसं. माझा विचार सुरू होतो तोच मुळी झोपेच्या चिंधड्या उडवत. प्रश्न जितका गहन तितकी तुझ्या घोरण्याची आवर्तनं उत्तुंग होत जातात.
तू नेहमी म्हणतोस की तू झोपेत विचार करतोस. पण उठतोस तेव्हा तुला फक्त प्रश्न नीट कळलेला असतो फारतर. त्याची उत्तरं तू कायमच माझ्यावर सोडतोस. संताप संताप होतो माझा. सगळंच कसं रंगहीन, नीरस वाटायला लागतं अशावेळी. तुझ्या झोपेला सुरूंग लावण्याची एकच कल्पना येते डोक्यात. हिंस्त्र कल्पना...
त्या कल्पनेचीही नखं बोथट होतात कारण तू गालात हासत असतोस झोपेत.
कमाल आहे तुझी. अशातही तुला स्वप्नं पडतात?
मला वाटायचं निदान स्वप्नात तरी आपण सोबत चालतोय एकमेकांच्या. असूही... पण स्वप्नांनी डिवचलय झोपेला आताशा.

सकाळ होईल आता, तू उठशील आणि स्वप्नाळू डोळ्यांनी माझ्या तारवटलेल्या डोळ्यात बघत राहशील. माझा सारा संताप पिऊन कानाची पाळी लाल होईल तुझी. सगळेच प्रश्न, सगळेच विचार वाहू लागतील वाट फुटेल तसे. झोप येईल मुरत गेल्यासारखी माझ्या डोळ्यांवर.
आता घाई करून उठवू नकोस मला. मी खूप थकलेय रे.
असंच तुझ्या कुशीत शिरून राहू दे.
नको जागं करूस मला.
थोपटत राहूदे मला डोळे मिटून-

रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना...
****