Saturday, June 06, 2009

आवर रे सावर रे.....

स्निग्ध संधिप्रकाशाच्या आडोशाला लपली होती अभिसारिका रजनी!
वासरांच्या पापण्या मिटू लागल्या तशी ती रात्र मेघांचं अवगुंठन दातांत धरून हलक्या पावलाने पुढे आली. तूही तशीच आलीस सभागारात, शरावतीच्या तरंगांच्या जीवघेण्या संथ लयीत.
इंदीवर कमळासारख्या निळ्या रंगाचं लज्जावस्त्र ओढून. आज म्हणे त्या सुप्रसिद्ध पखवाजियाचा सारा अभिमान आपल्या नृत्यकौशल्यानं उतरवून टाकण्याचा पण केला होतास तू.
’माझ्या वादनाच्या गतीच्या तोलाची नर्तिका अजून जन्मली नाही’
हे त्याचे बोल ऐकलेस तेव्हा खदिरांगार उतरला होता म्हणे तुझ्या डोळ्यांत.
स्वीकारलंस ते आवृत्त आव्हान!
आतल्या अग्निशिखेचा तो दाह शमवायला का गं अशी शीतल निळाई लेवून आली होतीस? सभेला वंदन करण्यासाठी एका लयदार झोक्यात तू ते अंशुक दूर केलंस आणि तुझ्या डोळ्यांतल्या किरणप्रभेनं दीपून गेलो मी.

पण पखवाजावर स्थिरावलेल्या हातांचा स्वामी शांत होता.
एक अभिनिवेशी हास्य त्याच्या चेहर्‍यावर विसावलं होतं.
कत्‌ धि ट धि ट, धा - ,ग ती ट, ती ट ता -
गम्भीर बोल उमटले त्याच्या मुखातून.

तू हातांचा नागबंध कानाशी नेऊन अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतीस भुवया उंचावून.
धमार!
क्षणैक लवलेली तुझी मान आणि लगोलग सुरू झालेला तो पदन्यास.
एकेका तुकड्यासरशी त्याच्या हातांची गती वाढत होती आणि तुझे पाय सहजपणे त्या गतीवर विहरत होते.
तू कथा सुरू केलीस...
एकपट.
तो भांडून तंटून निघून गेला आहे..ती सुन्न, विमनस्क बसून आहे तरुतळी.
दुप्पट.
थरथर..दाह.. ती उठते..त्यांचं गूज ठाऊक असलेल्या वेलीवेलीला, पानापानांना विचारू लागते..असाकसा निघून गेला तो मला एकटीला टाकून?

चौपट..
वर्तुळाकार घुमणं तिचं..काय करू? कुठे शोधू?..ये ना, सख्या ये ना..सजणा, जिवीच्या जिवलगा.. माझ्या अमृतमय प्राणा, ये ना!
पखवाजियाच्या हातांमध्ये दाहक कली शिरला. त्या शांत मुद्रेवरचं हास्य कधीच विरलं. भरून आले त्याचे डोळे. देवचार अंगात शिरल्याप्रमाणे तांडव सुरू झालं पखवाजाच्या गालांवर.
तुझ्या कपाळी स्वेदबिंदू डबडबलेले. पण तरीही नाचतच होतीस तू धूम्रवेलीसारखी वेगात..वेगात..अजून वेगात!
पण नाही साहवत आता..तिचा चेहरा बोलत होता..नको अंत पाहू..
डोळे मिटण्यापूर्वी एकवार दर्शन दे.. केवळ एकवार!
धूम्रवेल थरथरली..तू आता कोसळणार!
पण समेवर त्या एका क्षणात तुझी त्याच्याशी दृष्टभेट झाली...
तुझ्या डोळ्यांची आभा आणि त्याच्या डोळ्यांचं पाणी
एक इन्द्रधनू प्रकट होताना मी पाहिलं!
पुनश्च एकपट.

आवर रे, सावर रे मन तुझे खुळे
स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

पावसाचे मोती येती गंधवती माती
ओलावला वारा सारा थरारती पाती
दिशा कशा वेड्यापिशा झालेनासे कळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

आकाशीच्या कपाशीच्या वाती राती निळ्या
अंधाराच्या गंधाराला प्रकाशाच्या कळ्या
पुनवेच्या चांदण्याला पंचमीचे झुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

कोकिळेला गळामिठी मारव्याची खूण
भ्रमराच्या अधरावर मकरंदी ऋण
चंदनाच्या झाडालागी प्राजक्तीची फुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

अधीर तरू मदिर झरे मोहरली काया
रानी वनी जपे कानी आठवांचा फाया
केतकीच्या बनी मनी कस्तुरीचे मळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

..

3 comments:

चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar said...

तू अरे असं लिहतोस की ज़णू काही तू शब्दांवाटे एक चित्रपटच दिग्दर्शित करतोस. काय ज़मलंय अरे हे! मी कल्पना करतो की ज़र तू असं ज़रा अज़ून दीर्घ लिहायला लागलास तर एक भयाण रसमय दीर्घ कादंबरीच निर्माण करशील किंवा प्रदीर्घ न लिहता असंच रूपकात्मक छोटं छोटं लिहायला लागलास तरी असं घोटीव ललित, रूपक फारच मस्त असेल!

तुझ्या या सहित्यप्रकाराला आणि अशा लेखनयात्रेला शुभेच्छा!

चिनू।

Shibika said...

Kharach prasad...tu ase kase lihtos: ).apratim...tuzi shaili mala nehmi stabda karte...asech lihat raha...mazya manapasun shubecha...

Mandar Gadre said...

वाह! असेच कस्तुरीचे मळे फुलवत राहा :-)