Tuesday, January 26, 2010

The Champa Flower- IV

सुनीताबाई गेल्या... शनिवार होता तो. ना त्यांच्या प्रकृती-अस्वास्थ्याची बातमी पसरत राहिली ना त्या गेल्या त्याचा काही गाजावाजा झाला. समईच्या वातीसारख्या तेवता तेवता शांत झाल्या. कळलं तेव्हा का कोण जाणे, कोणीतरी अगदी ओळखीतलं अचानक नाहीसं झाल्यासारखी एक पोकळी तयार झाली मनात. राहून राहून त्यांच्या दोन कविता फिरून फिरून ओठांवर येत होत्या. त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेल्या नव्हे पण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या (असे त्यांनीच म्हटले होते)

त्या कविता मी पहिल्यांदा ऐकल्या त्या त्यांनी वाचलेल्या. पु.ल. जाऊन वर्ष झालं तेव्हाच्या ’कवितांजली’ या कार्यक्रमात त्यांनी त्या सादर केल्या अगदी ... शेवटच्या दोन. तो काव्यवाचनाचा कार्यक्रम सुंदर आहेच पण त्या दोन कवितांचं सुनीताबाईंनी केलेलं सादरीकरण हे केवळ अविस्मरणीय आहे. दोन्ही कविता पद्माबाईंच्या आहेत. पण त्या आपल्या कशा झाल्या याचा खुमासदार किस्सा सांगून पुढे त्या कविता सुनीताबाईंनी समोर जिवंत उभ्या केल्या आणि त्या खरंच त्यांच्या झाल्यासारख्या वाटल्या.
कार्यक्रमाचा शेवट केला तो या कवितेने-

आताशा मी नसतेच इथे..
जरी माझी इथे ये जा असली तरी
आताशा मी नसतेच इथे

मला तोपर्यंत माहीत नव्हतं की कविता वाचतानाही रागदारीसारख्या मोक्याच्या जागा घेता येतात आणि ऐकणार्‍याच्या तोंडून आपसूक दाद बाहेर पडते. काही जागा कवीने घेतलेल्या असतात : कविता वाचताना त्या अधिक खुलवून दाखवाव्या लागतात
आणि काही जागा कविता वाचणारा स्वतः निर्माण करत असतो. त्यातून किती तरी नवे अर्थ तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या कवितेत किती तरी जागा अशा होत्या की अंगावर सरसरून काटा यावा..

सोबत ना? आहे की आपल्या त्या यांची...
नावही आहे त्यांना, पण मला ना आता काही आठवतच नाही
किंवा
ते काठाकाठाने जे निर्माल्य वाहताय ना
त्यात आणि त्याच्या ताज्या ताज्या स्वप्ना
किंवा
वस्त्रं कधीचीच गेलीयेत कदंबावर अंतरपाट व्हायला
मी झालीय एक गाणं निळ्या नदीत वाहणारं

ते निळं गाणं थांबलं आता.. ही शांतता हुरहूर लावणारी आहे.
*****

चाफ्याच्या झाडाचं हे सत्र जसं सुरू केलं तेव्हापासून राहून राहून त्या दोनपैकी एका कवितेची आठवण येते आहे. ही कविता पद्मा गोळ्यांची आहे आणि सुनीताबाईंनी आधीच आपला हक्क त्यावर नोंदवला आहे. तरीही या साहित्याचे जे कोण प्रकाशक असतील त्यांची माफी मागून ही कविता इथे नोंदतो आहे. या कवितेखेरीज चाफ्याचा हा दरवळ अधुरा आहे... बाईंनी भरून ठेवलेली ही फुलांची ओंजळ....
यातील
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
इथे सुनीताबाईंनी घेतलेली ’कळतंय ना’ वरची तिहाई... वेदनेत रुतत जाणारी.
आह!

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं
दु:ख उरलं नाही आता मनात

फुलांचा पांढरा पानांचा हिरवा
रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी
मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळखीच्या तालात ओळखीच्या सुरात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं
ओंजळ फुलांनी भरलीय ना
- पद्मा गोळे

6 comments:

Saee said...

Wah! Aprateem.
I have been having similar feelings about a lot of people and things back home. Some of them are somewhat intangible. You cannot put them into words. You can only write so much as to create an aura of the feeling. I think this post is from that unreachable yet incredibly beautiful place. :)
Beautiful. :)
Keep writing!!

क्रांति said...

Surekh! khoop sahaj sundar lihilay lekh!

kshipra said...
This comment has been removed by the author.
kshipra said...

काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
इथे सुनीताबाईंनी घेतलेली ’कळतंय ना’ वरची तिहाई... वेदनेत रुतत जाणारी.
आह!

अगदी मनातलं बोललास. ही कविता ऐकताना अनेक विसरायच्या ठरवलेल्या गोष्टी हळूच वर येऊन डोळ्यांवाटे झरु लागतात. मग एक आवंढा गिळून तर्जनी वर करुन कणखर स्वरात सुनिताबाई जणू स्व:तलाच बजावतात

"चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
हसून सजवायच ठरलय ना?"

Samved said...

सुरेख! काय जमून आलय!! साधंच पण असं वाटतं रेशमी वस्त्रांनी कुणी तरी गळा आवळतच जातय. दुखण्यातलं सुख म्हण हवं तर...

Unknown said...

प्रसाद,
सुनिताबाईंच्या प्रेमात पडले "आहे मनोहर तरी" वाचल्यानंतर, त्यानंतर जे जे साहित्य प्रकाशित होत होते
ते वाचल्यावर ते प्रेम वाढतच गेले. पु. ल.व सुनिताबाई ही दॆवत होती.कित्येकदा वाटे त्यांना पत्र लिहावे पण कधी धीर
झाला नाही.त्या दोघांच्या जाण्याने एकप्रकारचे पोरकेपण जाणवले मला.वय वाढले की दु:ख सुध्दा व्यक्त करताना मर्यादा
पडतात माणसाला.काल तुझा ब्लौग वाचताना खपली निघाली जखमेवरची, खुप रडले मी पण त्यानंतर खुप हलके वाटले मला.फार सुंदर लिहिले आहेस तू,तुझ्या पुढील आयुष्यात असेच सोबती तुला लाभोत या शुभेच्छा.
आई.