Wednesday, October 13, 2010

पुन्हा एकदा...

दिवसाचा उडला टवका सरपटती मिटती जाग
क्षितिजाशी उठला मागे रात्रीचा काळा डाग

आकाश कोंडले जागी पक्ष्यांची विरली गाणी
ती सतेज नाव किनारी तांबूस गढूळले पाणी

हे झाड उभे दारात फांदीत शोधते छाया
चुळबुळती कण्हती पाने देठांशी सुकली माया

असवांना फुटती कोंभ पायात सरकते वाळू
अस्वस्थ उमटली साद हुंदका उठे अळुमाळू

उडणारे शोधित पंख उबदार उशाशी घरटे
डोळ्यात पेटले पाणी तरि एक पापणी झुरते

तो वत्सल हात फिरावा ती मिठी निरागस व्हावी
त्या दुधाळ बोलफुलांना केशरी खुमारी यावी

पुन्हा एकदा...

3 comments:

Bipin said...

bhaari!
maja aali!

Mandar Gadre said...

आह, सुरेख! खूप आवडली आर्त संध्याकाळ. किती सुंदर नाद आहे तिला. ग्रेसांच्या ’निळ्या चंद्रओवीत डुलणा-या संध्ये’ची आठवण झाली. इथेही तिची कातर निळाई (blues!) उमटलीये :)

a Sane man said...

कवितेची चित्रमयता नि ओघ आवडला.