
आधारवेल आठ एक वर्षापूर्वी लिहून झाले.
लिहून झाल्यावर माझे मलाच वाचताना फारच कृत्रिम वाटायला लागले.
म्हणून त्याचा थोडा हिस्सा इथे टाकला तर काही जणांना आवडला.
या आधी ४ भागांत आधारवेल हे लिखाण वेगळ्या वेगळ्य़ा स्वरूपात होतं.
पण त्याचा शेवट मात्र अधुराच होता. आता मात्र ते पूर्ण लिखाण एकत्र एकाच ठिकाणी देत आहे.
**********
आधारवेल मी कोण आहे? कोण आहे मी?
एक चैतन्यरहीत अस्तित्व!
मी एक खुरटलेला वड आहे.
वठलेला, थकलेला, कंबरेत वाकलेला,
पानन पान पिकलेला, पारंब्या सुकलेला
मी एक खुरटलेला वड आहे.
मी ऋणाईत आहे या आकाशाचा, या मातीचा.
याच मातीत रुजलो, अंकुरलो, पालवलो, बहरलो
याच मातीने मझ्या असण्याला
अर्थ दिला, आकार दिला
आहार दिला, आधार दिला.
सामर्थ्याचा साक्षात्कार दिला याच मातीने.
जमिनीच्या कुशीतून पहिल्यांदा जेव्हा बाहेर डोकावलो
नजरेत सामावलं हे अथांग निळंशार आकाश
थेट इथपासून तिथपर्यंत पसरलेलं
मला आव्हान देणारं.......भव्यतेचं.
बस्स! स्विकारलं.
कारण तेव्हा आकांक्षा होती आभाळाला भिडण्याची,
आभाळ चिरत जाण्याची,
आभाळ झुकवण्याची.
अन आस वेडी चांदण्या वेचण्याची.
मी क्षणा क्षणाने वाढत होतो,
फांदीफांदीनं बहरत होतो,
पानोपानी उमलत होतो.
उठत होतो, चढत होतो, ध्येयामागे पळत होतो.
आता उजळणारा पहिला किरण माझं मस्तक कुरवाळत होता.
घाबरत होता वारा माझ्या अंगाशी झोंबायला.
पान्हवलेला झरा माझंच गीत गात होता
आणि पहुडली होती धरती माझ्या शांत शीतल सावलीत.
साऱ्या सृष्टीलाच जणू कौतुक वाटत होतं
आपणचं निर्मिलेल्या या काष्ठशिल्पाचं.
कारण माझ्यात सामर्थ्य होते.
सामर्थ्य होते पडणारे आभाळ पेलण्याचे
सामर्थ्य होते कोसळणारा पाऊस झेलण्याचे
सामर्थ्य होते घोंघावणारे वादळ आडवण्याचे
आणि
सामर्थ्य होते ग्रीष्माच्या आगीत हसत हसत होरपळण्याचे.
मी स्वयंभू होतो
मी समर्थ होतो
मी स्वाभिमानी होतो
मी स्वयंपूर्ण होतो
पण मी का होतो?............ हेच मला माहित नव्हतं.
अर्थात मला त्याची चिंताही नव्हती
कारण माझं असणंच माझ्यासाठी पुरेसं होतं
पण......
आठवतो तो एक स्पर्श
वज्रतनू माझी रोमांचीत करणारा, सामर्थ्याला माझ्या अगतिक करणारा.
आठवतो तो क्षण
पूर्णत्वातील अधुरेपण जाणवून घेण्याचा,एका स्पर्शाने असणे माझे भारावून जाण्याचा.
आठवतो तो क्षणएका स्पर्शात माझं मी पण विरण्याचा,आभाळा येवढं मोठेपणं एका स्पर्शानं हारण्याचा.
मी खाली पाहिलं तर
एक नाजूकशी वेल थोडा आधार शोधत होती,
हात पुढे करून मोठ्या विश्वासानं बघत होती.
ज्या विस्तीर्ण आकाशात सामावून जाण्याचा मला अभिमान वाटत होता.
ते किती सहजतेनं तिच्या नजरेत सामावलं होतं.
मी अनाहूत पणे हात पूढे केला.तो नाजूकसा हात माझ्या हातावर स्थिरावला.
माझ्या हाताचा कंप मला जाणवत होता आणि जाणावत होता तिचा दृढ स्पर्श.
मी पुढे केलेला हात विजय होता तिचा आणि माझी अगतीकता.
म्हणा यात काहीच अयोग्य नव्हतं, अप्रिय तर नव्हतंच नव्हतं.
मला कळे कळे तो तिने मला व्यापून टाकले
व्यापून टाकला माझा विशाल विस्तार- फांदीफांदीनं जपून वाढवलेला.
तिने नुसतं मलाच नाही तर माझं सारं विश्व व्यापून टाकलं.
मी होतो तिच्या अस्तित्वाचा आधार
अन ती अस्तित्व माझ्या अस्मितेचं.
तिने डोळे उघडले की सूर्य उगवायचा.
ती थकली, दमली की रात्र यायची पाय न वाजवता, चंदेरी दुलई घेऊन.
ती लाजली की लाली अवतरायची नभाच्या गालावर.
ती गुणगुणू लागली की ताल धरायचा झरा खळाळणारा
अन
वाराही नाचायचा फुलपाखरांबरोबर फेर धरून.
ती रागावली की सारं आभाळ जणू भरून यायचं तिच्या नजरेत.
कसं अगदी दाटून यायचं.
आणि अचानक रिमझिम रिमझिम बरसू लागायचं.
तिचा एक मुका अश्रू सारं सारं सांगून जायचा अगदी सारं काही.
जे सांगायला नभाने कोण अटापीटा करावा -
आदळआपट,
विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट
आणि वर ओतू गेल्यागत कोसळणं.
पण तिला पाऊस आवडायचा,
खूप खूप आवडायचा.
तिची चटकन कळी खुलायची.
मग ती चिंब भिजायची सरसरणाऱ्या सरींमधे.
विरघळून जायचं तिचं मन पावसाच्या थेंबात
आणि मग मुग्ध अन मुक्त होऊन ती थरथरत राहायची
हारवून जायची वातावरणात.
अशा वेळी कितीतरी दूर पोहोचलेली असायची ती.
तिच्या पासून दुरावण्याची एक तीव्र कळ उठायची ह्रदयात.
नुसत्या त्या विचारांनीच सरसरून काटा यायचा अंगावर.
पण दुसऱ्याच क्षणी
ती तिचं मस्तक माझ्या छातीवर घुसळायची.
ठिबकणारे थेंब पानात झेलून ते माझ्या अंगावर उडवण्यात तिला भारी मौज वाटायची.
होणाऱ्या गुदगुल्यांमुळे मी खदखदून हासायचो.
मग माझ्या फांदीपानांवरलं पाणी पावसासारखं बरसायचं.
आणि आधीच पावसात चिंब भिजलेली ती
मीच तिला भिजवलं म्हणून माझ्यावर रागवायची.
अगदी खोटं खोटं!
साऱ्या सृष्टीवर तिचं प्रेम होतं
अनंत निळ्या आकाशावर, बोटभर खळाळत्या झऱ्यावर,
शरदातील चांदव्यावर, अंधारातील काजव्यावर,
क्षितिजावरल्या डोंगरवर, डोंगरवरील चंद्रावर,
पानांवर, फुलांवर, पाखरांवर, फुलपाखरांवर,
साऱ्या सजीव निर्जीवांवर ती प्रेम करायची सारख्याच कौतुकाने.
मला कधीच नाही जमलं तिच्यासारखं सगळ्यांवर प्रेम करणं.
कारण लहानांबरोबर लहान होणं मला शक्य नव्हतं
आणि मोठ्यांचं मोठेपण मला मान्य नव्हतं.
मला राग यायचा तो त्या फुलपाखरांचा
जरी फुलपाखरांमुळे रंगलेली ती छान दिसायची
तरीही मला त्यांचा राग यायचा
एक तर ती तिला सोडायची नाहीत आणि माझ्या अंगावर कधीच बसायची नाहीत.
मी अंग घुसळून त्यांना उडवायला जावं तर ती तिला अधिकच बिलगून बसायची.
आताशा तो झराही मला घाबरेनासा झाला होता
कारण त्याला तिचा शह होता ना!
मी तसं तिला म्हणालो तर ती हासून बोलली
"सहाजीकच त्याला तुझ्या मोठेपणाचं काय कौतुक?
तो पुढे जाऊन महाकाय फेसाळणारा समुद्र बघतो.
त्याच्या पोटात म्हणे सारं आकाशही सामावतं"
तो उनाड झरा अन येणारे चारदोन उपरे पक्षी
कुठून तिच्या डोक्यात असले उलटे सुलटे भरून द्यायचे देव जाणे.
"पण मला मात्र आहे बरं तुझं कौतुक.
कौतुक करायला आपलं जवळचं कुणी असावं लागतं"
ती असं म्हणाली की माझा राग कुठल्या कुठे पळून जायचा.
मला माझ्या शक्तीचा फार अभिमान होता.
पण मी जर कोणाशी भांडू लागलो तर ती मला थांबवून म्हणायची
"सामर्थ्य लढण्यासाठी दवडण्यापेक्षा जगण्यासाठी साठवावं, जगवण्यासाठी वापरावं."
पण आपण कमीपणा का म्हणून घ्यायचा? आपला मोठेपणा सिद्ध करायला नको?
"पण लढण्यासाठी मोठेपणा लागतच नाही मुळी आणि सिद्ध तर मुळीच होत नाही.
जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो
तेव्हा एखादा लहानसा जीवही निकराची झुंज देतो.
तिथं त्याच्या आकाराला महत्व नसतं ना सामर्थ्याला.
महत्वाची असते त्याची भावना, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती.
इतरवेळी लढण्यापेक्षा क्षमा करण्यातचं अधिक मोठेपणा असतो.
त्याला सिद्ध करण्याची गरज नसते. मोठेपणा कसा निर्विवाद असावा."
मला तिचं हे बोलणं फारसं पटत नसे. निव्वळ भित्रेपणा!
एकदा असच मी तिला म्हणलो की मला खूप सामर्थ्यवान व्हायचं आहे.
इतके की हे आकाश खाली झुकवता येईल.
त्यातल्या चांदण्या वेचता येतील आणि
तुला देता येतील - भेट म्हणून.
ती प्रसन्न हासली. म्हणली,
"आपलं सामर्थ्य बाह्यरूपाने इतरांना दाखवायची गरज नसते.
ते अगदी आतून आपल्या मनाला जाणवलं तरी पुरेसं असतं"
तिच्या या गूढ बोलण्याचा विचार करतच मी झोपी गेलो.
आणि सकाळी...................
चकित झालो, आवाक झालो.......
क्षणभर वाटलं मी स्वप्नात तर नाही ना?
रात्रीच्या आकाशातील साऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या
भर दिवसा अंगाखांद्यावर लेऊन ती लाजत लाजत उभी होती.
जणू आभाळाने त्याचा सारा खजिना गोळा करून
तिच्याजवळ सांभाळायला दिला होता.
त्या चांदण्या एका अनामिक सुगंधाने न्हालेल्या होत्या.
ते ओंजळभर आश्चर्य तिनं माझ्या अंगावर उधळलं
आणि म्हणाली-
"माझ्यातर्फे तुला भेट"
आनंदाने भारून गेलो.
आज पहिल्यांदा जाणवलं तिचं मोठेपण
आज मला तिची नव्यानेच जाणीव होत होती आणि माझ्या अव्यक्त भावना ती ही मुक्यानेच जाणून घेत होती
त्या दिवशी गळून पडलं माझं अहंकाराचं आवरण
अगदी हलकं हलकं वाटलं
क्षणभर वाटलं, त्या फुलांमधे उतरून त्यातील मध प्यावा
अन् आज पहिल्यांदा मला माझ्या विस्तीर्ण शरिराची लाज वाटली
त्या झय्रालाही मी माझ्या आनंदात सामील करून घेतलं
सारा दिवस आम्ही हासण्या गाण्यात घालवला.
आता दिवस कसे जात होते मला कळत नव्हतं. मी ते मोजणं कधीच सोडून दिलं होतं.
आश्चर्य म्हणजे माझ्या विस्ताराकडे मी पूर्णत: दुर्लक्ष करूनही तो अधीक जोमाने वाढत होता.
त्या दिवशी सकाळीच तिचा तो समुद्रावरून उडणारा मित्र आला. तिच्याशी आणि झर्याशी थोड्यावेळ गप्पा मारून तो वेगाने उडून गेला. पण का कोण जाणे घाबरल्यासारखा वाटला. ती मात्र आज फार शांत शांत होती आपल्य़ातच हारवल्यासारखी.
मी मऊ रेषमी वार्यामधे नुसताच सैलावला होतो.
ती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली, " मी खूप खूप आनंदात आहे अशा क्षणी म्रुत्यू जरी आला तरी......."
असं काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, शुद्धीत तर आहेस ना?
"दुःखी कष्टी दीनवाणं मरण येण्यापेक्षा समाधानाने हसत त्याला सामोरं जाणं चांगलं नाही का?"
आपण एखाद्या चांगल्या विषयावर बो-
"तुला एक गंमत सांगू? मला आवडेल तुझ्यासारखं मोठा व्रुक्ष व्हायला. असं आधाराने जगण्यापेक्षा ताठ मानेनं जगणं आवडेल मला.
तुझ्यासारखा आधार दर वेळी मिळणार आहे थोडाच?"
खरच आवडेल तुला माझ्यासारखं व्हायला?
पण मला जर का देवाने विचारलं तर मीही सांगेन-
मला अशाच सुंदर वेलीच्या जन्माला घाल मग मी घेईन तुझा आधार. देशील ना?
ती अगदी मनापासून हासली.
काय गं तुझा तो आकाशयात्री एवढं काय सांगून गेला?
ती एकदम गंभीर झाली, म्हणाली "तुला सांगणारच होते. तो आला होता संकेत द्यायला - वादळाचा.
एक प्रचंड वादळ समुद्रावरून रोरांवत आपल्याच बाजूला येतय. कदाचित दुपारपरयंत ते इथे येऊन पोहोचेल!"
हे सांगतानाच ती शहारली. माझ्याही अंगावर काटा आला. ती घाबरली होती पण मी...
मी मनॊमन आनंदलो. उल्हासीत झाल्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले.
आज कित्येक दिवसांनी माझ्या पुरुषार्थाला आव्हान मिळ्णार होतं.
मी अतीशय अधीर झालो होतो. अशी कित्येक वादळं मी आत्तापर्यंत लोळवली होती आणि आता
या ही वादळाची गुर्मी मला उतरवायची होती.
मी माझा अंदाज घेतला मी पुरेपूर बळकट होतो.
आता मी सज्ज होतो येणार्या संकटासाठी
भर दुपारी त्या वादळाने दुरूनच त्याच्या येण्याची वर्दी दिली. काही वेळातच अंधारल्यासारखं दाटून आलं आणि ते विघ्नसंतोषी गरगरत, गडगडत माझ्या समोर येऊन उभं ठाकलं. त्याच्या एका तडाख्यात तो झरा त्याचा मार्ग सोडून भेलकांडत माझ्या अंगावर येऊन आदळला. त्या स्पर्शाने एक थंडगार शीरशीरी गेली माझ्या मस्तकापर्यंत. पण दुसरयाच क्षणी मी सावरलो.
उभा राहीलो - आक्रमक पवित्रा घेऊन.
आणि मग सुरू झालं एक जीवघेणं थरारनाट्य.
हे वादळ आधीच्या वादळांपेक्षा बलाढ्य होतं अशातला भाग नव्हता पण याचे डावपेच मात्र भेदक होते.
कधी चहुबाजूंनी एकदम चालून यायचं. कधी सर्व जोर एकवटून एकाच बाजूनी धडक द्यायचं
अन् अचानक गिरकी घेऊन दुसर्या बाजूनी मुसंडी मारायचं. माझ्या काही फांद्या मोडकळीस आल्या होत्या.
एकदोन पारंब्या उखडल्य़ा गेल्या होत्या.
पण मीही काही असा तसा नव्हतो. सगळीकडूनच मी त्याला भारी पडत होतो. ते पार नामोहरम झालं होतं
आणि अखेरीस त्याने पूर्ण शरणागती पत्करली. माझा विजय झाला होता. मी जिंकलो होतो.
आणि अचानक सारं आकाश लकाकलं. प्रकाशमय झालं. दिपून गेलो मी त्या तेजाने. क्षणात सारं काही लक्षात आलं माझ्या पण फार उशीर झाला होता. जाताजाता त्याने टाकलेला शेवटचा डाव मी ओळखू शकलो नव्हतो. एक तेजाळलेली लहर माझ्या आरपार गेली. कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज घुमला चहुदिशांतून. माझ्या सर्वांगाचा थरकाप उडाला आणि त्यात माझ्या सर्व जाणीवा विरघळून गेल्या. माझ्या समोर भरून राहिला एक असह्य प्रकाश आणि भविष्याचा अनिश्चित अंधःकार. माझ्या श्रुति लोप पावत होत्या. माझ्या घट्ट मिटलेल्या डोळ्यांसमोर मला फक्त ती दिसत होती.... फक्त ती दिसत होती....ती दिसत होती....
वर्षानुवर्षाच्या प्रदीर्घ झोपेनंतर जाग यावी तसा मी जागा झालो. मधे किती काळ लोटला कोणास ठाऊक?
मी हळूहळू डोळे उघडले. मावळत्या सूर्याची तांबूस उबदार किरणे माझ्याभोवती रेंगाळ्त होती.
अखेरीस वादळाच्या शेवटच्या आघातालाही मी पुरून उरलो होतो.
प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देऊन मी जीवंत होतो.
या विजयाच्या जल्लोशात आम्ही दोघे.........
....
...
..
..
..
.
.
.
.
.
ती?
.
.
मी झर्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं.
तो मुकाच राहिला.
.
.
एक अस्वस्थ शांतता पसरली आणि तीच सारं काही बोलून गेली.
सारं काही संपलं होतं
सारं सारं..
मी स्वयंभू होतो
मी समर्थ होतो
मी स्वाभिमानी होतो
मी स्वयंपूर्ण होतो
पण मी का होतो?...........
माझ्या असण्याचं कारण मला कळलं पण केव्हा..
जेव्हा मी ते गमावून बसलो.
ती होती म्हणून मी होतो, तिला आधार म्हणून मी होतो.
आता माझ्या असण्याचं प्रयोजनच उरलं नव्हतं.
पानापानानी घडलो होतो आता फांदीफांदीनं सुकत चाललोय
उरल्यात फक्त तिच्या आठवणी
खुळी फुलपाखरं अजून माझ्या भोवताली भिरभिरत तिला शोधत असतात
माझं मनही त्यांच्यापठोपाठ तिला शोधत भरकटत राहतं
सूर्य रोज उगवतो, रात्र होता होता डोक्यावर गोधडी घेऊन झोपी जातो
झरा त्याचं गाणं गातच असतो
उन्हाळ्यात सूर्य आग ओकत राहतो
पाऊस त्याची वेळ आली की बरसून जातो
थंडी गोठवून टाकते सगळ्या हालचाली
सगळंकाही चालू आहे पूर्वीसारखच
मी मात्र कशातच भाग घेत नाही
आज मला ते दिसलं. कुतुहलभरल्या नजरेनं आजुबाजूला पहात होतं.
त्या सानुल्याच्या डोळ्यातून ओसांडत होतं अफाट सामर्थ्य,
अचाट आत्मविश्वास -
आभाळाला भिडण्याचा,
आभाळ चिरत जाण्याचा,
आभाळ झुकवण्याचा.
अन प्रयत्न वेडा चांदण्या वेचण्याचा.
माझा आधार माझ्यासमोर पानापानाने बहरत होता.
आता मी वाट बघतॊय पुढच्या वादळाची
ही शेवटची निकराची झुंज.
मला झुंजायचय पण जिंकायचं नाही.
अर्थात या विजयासाठी त्याला आणि मला दोघांनाही फारसं झगडावं लागणार नाही.
कारण शेवटी
मी एक खुरटलेला वड आहे.
वठलेला, थकलेला, कंबरेत वाकलेला,
पानन पान पिकलेला, पारंब्या सुकलेला
मी एक खुरटलेला वड आहे
मी एक खुरटलेला वड आहे.....